(माझे मत ) देशाच्या व्यापारी तुटीकडे गांभीर्याने पाहावे

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार जुलै २०२४ अखेर भारताची व्यापारी तूट २३.५ अब्ज डॉलर झाली आहे. जुलै महिन्यात आयात ७.४५ टक्के वाढून ५७.४८ अब्ज डॉलर झाली. कच्च्या खनिज तेलाच्या म्हणजे क्रूड ऑइलच्या मागणीत वाढ झाल्यामुळे तसेच चांदी व इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मागणी वाढल्यामुळे ही आयात वाढली आहे. कच्च्या खनिज तेलाची आयात १७.४४ टक्के वाढून १३.८७ अब्ज डॉलरवर गेली. चांदीची आयात ४३९टक्के वाढून १६५.७४ दशलक्ष डॉलरवर गेली आहे. जून २४ मध्ये २१ अब्ज डॉलर असणारी व्यापारी तूट जुलै २४ अखेरीस २३.५ अब्ज डॉलर झाली आहे. गेल्या वर्षी ही व्यापारी तूट १९.३ होती. म्हणजेच गेल्या एक वर्षात देशाची व्यापारी तूट ४.२ अब्ज डॉलरने वाढली आहे. 


एखाद्या देशाच्या वस्तू आणि सेवांची आयात निर्यातीपेक्षा जास्त असते तेव्हा व्यापार तूट निर्माण होते. यामुळे देशांतर्गत चलनाचा विदेशी बाजारांमध्ये जादा प्रवाह होतो. तर परकीय चलनाचा ओघ तुलनेने कमी राहतो. या असंतुलनाला सामान्यतः व्यापाराचे नकारात्मक संतुलन असे संबोधले जाते. वरील आकडेवारी जाहीर होताच केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील वर्धमाल म्हणाले 'सध्याच्या व्यापाराच्या स्वरूपानुसारच निर्यातीची वाटचाल सुरू आहे. अमेरिका, युरोप,चीन यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर निर्यात होणाऱ्या आफ्रिका खंडात भारतीय निर्यात वाढवण्याचा मंत्रालय प्रयत्न करत आहे .त्यामुळे आर्थिक वर्ष अखेर वस्तू आणि सेवा यांच्या समावेश असलेली देशाची एकूण निर्यात ७७८ अब्ज डॉलरचा मागील आर्थिक वर्षातील निर्यातीचा टप्पा ओलांडले.' ते म्हणतात तसे झाले तर उत्तम आहे. पण आज व्यापारी तूट मोठी आहे हे ध्यानात घेण्याची गरज आहे.


व्यापारी तुटीचे अनेक परिणाम, फायदे ,तोटे सांगितले जातात. मात्र त्याबाबत पुस्तके ज्ञानापेक्षा व्यावहारिक वास्तव लक्षात घेण्याची गरज असते.व्यापारी तुटीमुळे काही जणांच्या राहणीमानाचा दर्जा वाढतो कारण त्यांना आयात उत्पादने वापरता येतात. पण जर व्यापारी तूट कायम राहिली तर आपले स्थानिक चलन कमकुवत होत जाते. भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेत सातत्याने घसरत आहे त्याचे हेही एक कारण आहे. अधिक आयातीमुळे देशांतर्गत रोजगाराच्या संधी कमी होत असतात. तसेच स्थानिक वस्तूंची मागणी घटते व लहान मोठे उद्योग संकटात सापडत असतात. तसेच आयात अधिक झाली तर चलनवाढ होते आणि वित्तीय तूट वाढते. विकसनशील देशांना त्याचा मोठा फटका बसू शकतो. आपण अर्थव्यवस्थेचा मोठा फुगीर आकार सांगत असताना व्यापारी तुटीकडे सुद्धा म्हणजेच आयात -निर्यात धोरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.


प्रसाद माधव कुलकर्णी 

इचलकरंजी

Post a Comment

Previous Post Next Post