महाड येथील नदीपात्रात बुडून महाबळेश्वर मधील तीन पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू

 स्थानिक रेस्क्यू टीमने एका तासात मृतदेह काढले पाण्याबाहेर

प्रेस मीडिया लाईव्ह :

सातारा:---सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या गवळी मोहल्ला येथून पर्यटनासाठी महाड तालुक्यातील सव येथील गरम पाण्याचे कुंड व दर्ग्याच्या दर्शनासाठी येथे आलेल्या दिलावर शहाबुद्दीन नालबंद मुनावर शहाबुद्दीन नालबंद व जाहीद जाकीर पटेल हे तीनजण सव नदीपात्रात बुडून मृत्युमुखी पडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

  महाड तालुक्यातील सव गावात गरम पाण्याचे झरे आणि एक दर्गा आहे. मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या सव गावाजवळ गरम पाण्याच्या कुंडात स्नान केल्यानंतर महाबळेश्वरमधील हे तिघे तरुण शेजारी असलेल्या जेट्टीवर गेले. येथे नदीच्या पाण्यात हातपाय धूत असताना एकाचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी त्याचा सख्खा भाऊ खाली उतरला तो देखील बुडू लागल्याने त्याचा सोबत असलेला मित्र पाण्यात उतरला. 


   एकमेकांना वाचवण्याच्या धावपळीत तिघेही बुडाले.ही घटना रविवारी घडली.यामध्ये तिन्ही जणांचा मृत्यू झाला आहे.या संदर्भात संबंधितांकडून स्थानिक प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर आपत्कालीन यंत्रणा सक्रिय होऊन त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांनी यासंदर्भात संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.  त्यानुसार स्थानिक रेस्क्यू टीमकडून करण्यात आलेल्या तातडीच्या कार्यवाहीमुळे या तिन्ही मृत इसमांचे मृतदेह घटनास्थळाजवळ पाण्यातून बाहेर काढण्यात जवळपास एक तासाच्या प्रयत्नानंतर यश आले

  मृतदेहांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी महाडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

   यासंदर्भात संबंधित पर्यटकांच्या नातलगांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी ही तीन कुटुंबे महाबळेश्वर येथून महाड तालुक्यातील खाडीपट्टा येथे असलेल्या सव गरम पाण्याच्या कुंडामध्ये पोहण्यासाठी आली होती. त्यानंतर नदीपात्रात जाण्याचा त्यांचा निर्णय झाला असे सांगण्यात आले. मात्र त्या ठिकाणी एकापाठोपाठ एक तीन जण पहिल्याला वाचवण्याच्या प्रयत्नात बुडून मृत्युमुखी पडल्याचे सांगण्यात येते. 

    केवळ एक ते दीड तासांमध्ये घटना घडल्यानंतर स्थानिक रेस्क्यू टीमकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत असून, अशा तातडीच्या रेस्क्यू टीम संदर्भात शासनाने कायमस्वरूपी धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांची सुव्यवस्था करावी अशी मागणी केली जात आहे.

   तीनही मृतदेहांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्यांना महाडच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती स्थानिक पोलीस प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. 

   या ठिकाणी कायदेशीर कार्यवाही केल्यानंतर मृतदेह संबंधितांच्या ताब्यात देण्यात येतील असे प्रशासनाने स्पष्ट केले. घडलेल्या या दुर्दैवी घटनेबद्दल परिसरातील नागरिकांमधून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. 

   दरम्यान महाबळेश्वर येथील गवळी मोहल्ला येथे ही बातमी समजताच या परिसरातील नागरिकांना या घटनेची हळहळ व्यक्त करून महाबळेश्वर येथील नातेवाईक व युवक घटनास्थळी रवाना झाले असून या घटनेमुळे महाबळेश्वर पाचगणी येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

   दरम्यान महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, उपनगराध्यक्ष आनंद जाधव व रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हनुमंत जगताप यांनी तातडीने घटनास्थळी व उपजिल्हा रुग्णालयात महाड येथे भेट देवून नातेवाईकांना धीर देवून सांत्वन केले.

Post a Comment

Previous Post Next Post