कुलगुरू हे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे राखणकर्ते आहेत की ...


प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठातील तब्बल १० एकर जागा पुण्यातील नामांकित उद्योगपतीला देण्याच्या हालचाली सुरू आहेत. कुलगुरू हे विद्यापीठाचे राखणकर्ते आहेत की पूनावालांच्या व्हिन्टेज कार्सचे, असा संतप्त सवाल विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला आहे.

विद्यापीठाला सध्या अद्ययावत होस्टेल, आंतरराष्ट्रीय दर्जाची लॅबोरेटरी आणि सेंट्रल किचनची गरज आहे. असे असताना तब्बल ४०६ एकरचे क्षेत्रफळ असलेल्या या विद्यापीठातील गर्द झाडी असलेल्या मध्यवर्ती ठिकाणी सायरस पूनावाला कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर थोड्या अंतरावर असलेल्या भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागील जागेत सदर कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याचे प्रस्तावित आहे. या प्रस्तावाला विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद आणि सिनेट सदस्यांसह विद्यार्थी संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी (सीएसआर) फंडातून १०० कोटी रुपये खर्चून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जागतिक दर्जाची लॅबोरेटरी उभारण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या बंद पडलेल्या कार्यालयाच्या मागील जागेची पाहणीही करण्यात आली होती. परंतु ती जागा पसंत न पडल्यामुळे अखेर मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील १० एकर जागा अंतिम करण्यात आली. त्या ठिकाणी सुमारे एक लाख स्क्वेअर फुटांचे बांधकाम होणार आहे. येथे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्व्हेन्शन हॉल उभारण्यात येणार आहे. सोबतच पंचतारांकित गेस्ट हाऊसदेखील बांधण्यात येणार आहे. या कन्व्हेन्शन सेंटरसाठी १०० ऐवजी २०० कोटी रुपये देण्याची तयारी पूनावाला यांनी दर्शवली आहे.तसेच पूनावाला यांच्या जागतिक दर्जाच्या व्हिन्टेज कार्सचे म्युझियमदेखील असणार आहे. राज्यपालांकडे याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. ''पूनावाला यांच्याकडे अनेक व्हिन्टेज कार जमा झाल्या आहेत. त्या ठेवायला त्यांना जागा अपुरी पडत असल्यामुळे विद्यापीठात व्हिन्टेज कार्सचे म्युझियम करण्यात येणार आहे का,'' अशी खरमरीत टीका पीएचडी संशोधक आणि विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष राहुल ससाणे यांनी केली आहे 

नेमकी मालकी  कोणाची...?

आमचा मूळ मुद्दा असा आहे की, राज्यपालांच्या अखत्यारित असलेली विद्यापीठाची जमीन किती किमतीला हस्तांतरित करणार? प्रस्तावित प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याची मालकी ही विद्यापीठाकडे असणार की संबंधित उद्योगपतीकडे? या सर्व प्रकाराबाबत राज्यातील विद्यापीठांचे कुलपती असलेले नवनियुक्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना कुलगुरूंनी कल्पना दिली आहे का, असे कळीचे प्रश्न विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केले आहेत.

सायरस पूनावाला कन्व्हेन्शन सेंटरमध्ये काय असणार...?

२०० कोटी रुपयांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सब्लिटी (सीएसआर) फंडातून उभारणार कन्व्हेन्शन सेंटर

१० एकर जागेत होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायरस पूनावाला कन्व्हेन्शन सेंटर

एक लाख स्क्वेअर फुटांचे होणार बांधकाम

आंतरराष्ट्रीय दर्जाचा कन्व्हेन्शन हॉल

गेस्ट हाऊस

दर्जाचे व्हिन्टेज कार म्युझियम

हस्तांतराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

आयुका, टाटा इन्स्टिट्यूटच्या धर्तीवर स्वतंत्र कंपनीची स्थापना करण्याचे विचाराधीन

राजभवनाकडे याबाबतचा अंतिम प्रस्ताव लवकरच पाठविण्यात येणार आहे. कुलगुरू 

डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडून व्यवस्थापन परिषदेला प्रकल्पाची माहिती नुकतीच देण्यात आली..

Post a Comment

Previous Post Next Post