प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे शहराला गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. पावसामुळे पथ विभागाच्या निष्कृष्ट दर्जाच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. रस्त्यांवर मोठ मोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यावर पुणेकरांकडून संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. परंतु हॉटमिक्स प्लॉटवरील खडीमध्ये पावसामुळे ओलावा असल्याने खड्डे बुजविण्यास मर्यादा येत असल्याचे कारण देत खड्डे बुजविण्याचे काम लांबणीवर टाकण्याची नामुष्की महानगरपालिकेच्या पथ विभागावर आली आहे.
रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवर बाबत नागरिकांनी तक्रार केल्यानंतर भर पावसात खड्डे बुजवता येत नाहीत, असे कारण एरवी पथ विभागाकडून दिले जाते. मात्र, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी निर्देश दिल्यानंतर महानगरपालिका खड्डे बुजवण्याच्या कामासाठी झोपेतून जागी झाली. त्यानंतर भर पावसात आणि रस्त्यावर पाणी वाहात असताना रस्त्यावर डांबर टाकले जात होते. तसेच पॅचवर्कदेखील करण्यात आले आहे. भर पावसात केलेले काम कितपत टिकाव धरेल, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जाऊ लागला होता. परंतु पथ विभागानेच या सलग पावसाच्या कालावधीत केवळ कोल्ड मिक्स मालाद्वारे खड्डे बुजविण्यात येत असल्यामुळे सदर कामास मर्यादा येत असल्याचे मान्य केले.
तसेच सद्यस्थितीत सलगरित्या पाऊस पडत असल्याने महापालिकेच्या हॉटमिक्स प्लॉटवरती खडीमध्ये ओलावा असल्याने, गरम डांबरी मालाची निर्मिती होत नाही. त्यामुळे पावसाची उघडीप मिळाल्यानंतर दिवसपाळी व रात्रपाळी अशा दोन्ही टप्प्यांमध्ये शहरातील खड्डे तातडीने बुजविण्यात येतील, असे जाहीर केले आहे. भर पावसात केलेले काम आता कितपत टिकेल, की पुन्हा पुणेकरांचे कर पैसे वाया जातील याकडे लक्ष लागून राहिलेले आहे.