प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना अंतर्गत 'स्वनिधी से समृध्दी' (विस्तारीत टप्पा ५) कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे महापालिकेला आदेश द्यावेत , विक्रेत्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करावे तसेच हे सर्वेक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत अतिक्रमणविरोधी कारवाई थांबवावी,अशी मागणी जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघाने केंद्रीय सहकार, नागरी उड्डान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे. आमदार सुनिल कांबळे, जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघाचे संस्थापक संजय आल्हाट,सरचिटणीस रणजीत सोनवळे,रोहित जसवंते,उपाध्यक्ष बंडू वाघमारे, के. सी. पवार, अभिजीत पाटील उपस्थित होते.
पथ विक्रेता राष्ट्रीय धोरण अस्तित्वात आल्यावर पुणे पालिकेने दहा वर्ष अंमलबजावणी केलेली नाही.गेली दहा वर्ष पथविक्रेता योजनेच्या कुटुंबियांचे सर्वेक्षण प्रलंबित आहे. केंद्र सरकारच्या योजनांचा पथ विक्रेत्यांना लाभ मिळवून देणेकामी व जोपर्यंत पथारी विक्रेत्यांचे बायोमॅट्रिक सर्वेक्षण २०२४ पर्यंत होत नाही तोपर्यंत पथारी विक्रेत्यावरील कारवाई थांबवावी, असे पत्र यासंदर्भात जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघाने २६ फेब्रुवारी २०२४ रोजी दिले होते.त्यावर आयुक्तांकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही ,दुसरीकडे पथारी विक्रेत्यांवर अन्यायकारक कारवाई केली जात आहे. पथारी विक्रेत्यांना एकत्रितपणे या योजनेची माहिती देऊन मार्गदर्शन करणे गरजेचे आहे, असे यावेळी संजय आल्हाट यांनी सांगितले.