प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणेकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी ससुन रुग्णालय परिसरातील एक मुख्य जलवाहिनी फुटली आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. या जलवाहिनीमुळे आजुबाजूच्या परिसरातील पाणी पुरवठ्यावर परिमाण झाला आहे. शहरातील काही भागात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मिळालेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालय परिसरातील फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी केले जाणार आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशन आणि आजूबाजूच्या परिसराचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 17 ऑगस्ट रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे आता पुढील काही दिवस पुणेकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.
या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार
या जलवाहिनीची दुरुस्ती शुक्रवारी केली जाणार आहे. त्यामुळे शुक्रवारी, पुणे रेल्वे स्थानक परिसर, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, गारपीर वस्ती, पांढरा गणपती परिसर, सोमवार पेठ पोलीस वसाहत, बरके आळी, सारस्वत कॉलनी, घोडमळा परिसर, जेधे पार्क, ससून रुग्णालय, गणेशखिंड रस्त्यावरील संचेती रुग्णालय ते मोदीबाग पर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा परिसर, जुना पुणे-मुंबई रस्ता, संगम पूल ते मुळा रस्तापर्यंतच्या दोन्ही बाजूंचा परिसर, ताडीवाला रस्ता झोपडपट्टी आणि जुना बाजार या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे व पाण्याचा योग्य साठा करावा असे आवाहन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
जुन्या जलवाहिन्या बदलण्याची गरज
पुणे शहरातील अनेक जलवाहिन्या जुन्या झाल्या आहेत, त्यामुळे त्या फुटण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच अनेक भागातील जलवाहिन्या लिक झालेल्या आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. तसेच अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे अशा तक्रारीही वारंवार येत आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.