प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे :एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे हे प्रकरण पुणे ग्रामीणच्या दौंड तालुक्यामधील एका शाळेतील आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली असून या घटनेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी शाळेतील मुख्यधापकालाही ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय शिक्षकाने १३ वर्षीय विद्यार्थिनीला व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठवून मुलीला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गुरुवारी या घटनेची स्वत:हून दखल घेतली आणि वस्तुस्थितीची पडताळणी करण्यासाठी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मुलीच्या गावाला भेट दिली.पीडितेच्या आई-वडिलांची औपचारिक तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला, असे पुणे ग्रामीण पोलिसांचे एसपी पंकज देशमुख यांनी सांगितले.
विद्यार्थ्याच्या वडिलांनी शाळेत घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना न दिल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापकालाही ताब्यात घेण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.मुलीच्या वडिलांना असे आढळून आले की, आरोपी शिक्षकाने १५ ऑगस्टपूर्वी आपल्या मुलीला कथितपणे अश्लील मेसेज पाठवले होते. याबाबत मुलीच्या वडिलांनी मुख्याध्यापकांशी संपर्क साधला असता त्यांनी याप्रकरणाकडे दुर्लक्ष केले. यामुळे पोलिसांनी मुख्याध्यापकालाही ताब्यात घेतले आहे.