"लाडके डोंगर योजना" राबवून हिंगण्याचे वायनाड होण्याचे थांबवा - पर्यावरणप्रेमींची पालकमंत्र्यांना साद

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे  - पुण्यातील हिंगणे भागातील तळजाई टेकडीचा मागचा भाग अनधिकृतपणे फोडून भूमाफियांकडून या परिसराचे सपाटीकरण जोरात सुरु आहे. यामध्ये हा भाग धोकादायक झालेला असून येथे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पुणे महानगरपालिका व वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. वायनाड सारखी दुर्घटना याठिकाणी घडण्याची भीती असून यासंदर्भात पर्यावरणप्रेमी अनंत घरत यांनी तक्रारीचे पत्र महापालिका आयुक्त आणि तहसीलदार हवेली यांना पाठविले आले आहे. तसेच पालकमंत्री अजितदादा पवार यांस पत्र पाठवून लाडकी बहीण योजनेसारखे ‘लाडका डोंगर योजना” आखून पुणेकरांचे, पर्यावरणाचे व पुण्याला लागून असलेल्या सह्याद्री पर्वतरांगांचे रक्षण करावे अशी विनंती केली आहे . 


अनंत घरत म्हणाले की, पुण्यातील टेकड्यांवर बीडीपी आरक्षण असताना अनाधिकृतपणे प्लॉटिंग करून सामान्य जनतेची व प्रशासनाची मोठी फसवणूक भूमाफिया करत आहेत. हिंगणे खुर्दमधील अथर्व नगर जवळील विकास आराखड्यात असलेला नैसर्गिक ४० फुटी नाला भूमाफियांनी बुजविला आहे. तसेच तळजाईच्या डोंगरातून येणारे धबधबे, जिवंत झरे, प्रवाह यांचे डोंगर फोडकरुन नुकसान केले आहे. डोंगरफोडीतून गौणखानिज मुरूम उत्खनन करुन शेकडो ट्रक विकले गेले आहे. त्याला जबाबदार असलेल्यांवर प्रशासनाकडून कोणतेही कारवाई केली जात नाही. महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार टेकड्यांवर अनधिकृत बांधकाम व प्लॉटिंगची माहिती महापालिकेला देण्यासाठी बीट ऑफिसर नेमले आहेत, परंतु ते त्यांची जबाबदारी निभावताना दिसत नाहीत. अशा टेकड्या फोडून बेकायदेशीर प्लॉटिंग केली जात आहे. सदर प्लॉटिंग करत असताना जागा मालक व विकसक यांनी तळजाई टेकडीच्या वन विभागाच्या भिंतीपासून टेकडी फोडून पूर्णपणे सपाटिकरण केले आहे. त्यामुळे जास्त पाऊस झाला तर वनविभागची भिंत कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही वर्षांपूर्वी माळीण गाव जसे उत्खननामुळे पूर्ण गाव दरड कोसळल्यावर दरड खाली झाकून गेले होते तशी परिस्थिती हिंगण्यामध्ये होईल. तसेच काही वर्षांपूर्वी कात्रज घाटा पलीकडील शिंदेवाडी मध्ये अशीच प्लॉटिंग केली असता तिथे मोठा अपघात झाला होता. त्या अपघातात निष्पापांचे बळी गेले होते. आजची वायनाड दुर्घटना ह्याप्रकारे पुण्यामध्ये हिंगणे खुर्द येथे होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे घरत म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post