जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत टेक महिंद्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न

 प्रारूप मतदार यादीतील नावे तपासून घेण्याचे कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवाहन

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या यादीत टेक महिंद्रा कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांची नावे तपासून घ्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले. 

पुणे येथील टेक महिंद्राच्या कार्यालयात पुणे तसेच मुंबई, नागपूर (दूरदृश्य प्रणालीद्वारे) येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी तथा स्वीपच्या समन्वयक अर्चना तांबे, टेक महिंद्राचे नितीन कानडे, राजेंद्र केंभवी, वृंदा पिसारोडी, संजय सिंग, विल्सन डान्टस आदी उपस्थित होते. 

डॉ. दिवसे म्हणाले, प्रारुप यादीत नाव नसल्यास अर्ज क्र. ६ भरावा. यादीतील नावात बदल असल्यास अर्ज क्र. ८ अर्ज भरावा. याकरीता वोटर हेल्पलाईन ॲप किंवा  https://voters.eci.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येईल. तसेच नजीकच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येईल, असे त्यांनी सांगितले.  हे अर्ज कशाप्रकारे भरावेत याविषयी मार्गदर्शनही त्यांनी केले.

बाहेरील जिल्ह्यातील जुने एमटी सिरीजचे कृष्णधवल मतदार ओळखपत्र असलेल्या आणि जिल्ह्याच्या मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांनी मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात सहभागी व्हावे, मतदार यादीत नाव, पत्ता, छायाचित्रात दुरुस्ती करावयाची असल्यास तशी दुरूस्ती करुन मतदार ओळखपत्र बदलून घ्यावे, असे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी टेक महिंद्राच्या अधिकाऱ्यांनी याकामी प्रशासनास सहकार्य करण्याबाबत आश्वासन दिले.


Post a Comment

Previous Post Next Post