‘माझी लाडकी बहीण योजना’ कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून आढावा

 


प्रेस मीडिया लाईव्ह

पुणे, दि. ९ : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ हस्तांतरणाच्या १७ ऑगस्ट रोजी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी शासकीय विश्रामगृह येथे आढावा घेतला. 

यावेळी महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त कैलास पगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, उपायुक्त वर्षा लड्डा-उंटवाल, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे, आदी उपस्थित होते.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, राज्यात एकूण १ कोटी ४२ लाख महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान ३ लाख महिलांनी नोंदणी केली आहे. राज्यात सर्वाधिक नोंदणी पुणे जिल्ह्यात झाली असून त्याखालोखाल नाशिक, कोल्हापूर, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यात नोंदणी झाली आहे. 

त्या म्हणाल्या, योजनेचा लाभ हस्तांतर करण्यासाठी महिलांचे बँकखाते आधार संलग्न असल्याची खात्री करा. पावसाची शक्यता लक्षात घेऊन कार्यक्रमाचे नियोजन करा, लाभार्थींसाठी छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, बैठक व्यवस्था, पार्किंग, स्वच्छतागृहाची व्यवस्था आदी व्यवस्था करण्याच्या सूचना देऊन नोंदणीसाठी काम करणाऱ्या आशासेविका, ग्रामसेवक, उमेद, माविम, अंगणवाडी सेविका अशा सर्वच घटकांचा कार्यक्रमात समावेश करा, असे त्यांनी सांगितले. 

योजनेच्या अंमलबजावणीसाठी काही कारणास्तव जिल्हास्तरीय समिती स्थापन झाली नसेल अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना याद्या पाठविण्याबाबतही शासन निर्णयात बदल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. १७ ऑगस्ट रोजीच्या कार्यक्रमासाठी १५ हजाराहून अधिक लाभार्थींना प्रातिनिधीक स्वरुपात कार्यक्रमाला बोलावण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आयोजित करण्याचे ठरविण्यात आले, असेही त्या म्हणाल्या. 

प्रारंभी आयुक्त डॉ. नारनवरे यांनी योजनेंतर्गत राज्यात १ कोटी ४० लाख महिलांनी ॲपवर नोंदणी झाली असून ९७ टक्के काम पूर्ण झाले असल्याचे सांगितले. पुणे जिल्ह्यात ९ लाख ७३ हजार २५५ भगिनींनी पोर्टलवर नोंदणी केली असल्याचे सांगितले. 

यावेळी महिला व बालविकास विभागाने महिलांसाठी तयार केलेल्या ‘स्त्रीशक्ती- आपले व्यासपीठ आपली शक्ती’ व ‘यशस्वीनी’ ॲपच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. बैठकीला महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद, महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. 


Post a Comment

Previous Post Next Post