प्रेस मीडिया लाईव्ह :
पुण्यात अधूनमधून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पुण्यातील काही भागात पाणी तुंबण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. मुसळधार पावसामुळे पुण्याच्या मार्केट यार्ड, चंदननगर, खराडी, येरवडा भागात पाणी साचलंय. रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहनचालकांना पाण्यातून वाट काढताना कसरत करावी लागतेय.रस्त्यावर पाणी साचल्यानं अनेक दुचाकी, चारचाकी वाहनं तसच रिक्षा बिघडल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पुणे स्टेशन परिसरातही पाणी साचलंय.
संध्याकाळी झालेल्या पावसाने नागझरी ओढ्याला पुर आला आहे. त्यामुळे पुण्यातील टिंबर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचं मोठं नुकसान झालं आहे. जवळपास एक ते दीड तास पावसाने पुणे शहराला झोडपले अनेक भागात रस्ते पाण्याखाली गेले होते. काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.
हवामान विभागाकडून अलर्ट जारी
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच आज राज्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 4 ते 5 दिवस राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे, पालघर वगळता संपूर्ण राज्याला आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.