प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे. : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीच्या (अमृत) लक्षित गटातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवकांना संगणक कौशल्यात विकसित व प्रशिक्षित करण्याकरीता अमृत आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.
अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी, विशेष कार्यकारी अधिकारी उदय लोकापल्ली, एमकेसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक वीणा कामत, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे, वरिष्ठ महाव्यवस्थापक अमित रानडे आदी यावेळी उपस्थित होते.
या करारानुसार एमकेसीलएमार्फत राबविण्यात येणाऱ्या निवडक प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या युवकांना निवडीनंतर लाभ देण्यात येणार आहे. कोणत्याही विभाग, संस्था, महामंडळाच्यामार्फत लाभ मिळत नसलेल्या युवकांना आवश्यक कौशल्य, ज्ञान आणि पाठबळ देऊन सक्षम करणे, तसेच उद्योगाभिमुख रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्यांनी स्वावलंबी करणे हे या प्रशिक्षण योजनेचे उद्दिष्ट आहे.
अमृततर्फे प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या युवकांना महामंडळाच्या नियमानुसार सुरुवातीस सुरक्षा शुल्क स्वतः भरावयाचे आहे. योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्या प्रशिक्षणाचे शैक्षणिक शुल्क अमृतसंस्थेमार्फत महामंडळाला परस्पर दिले जाणार आहे. याबाबत अधिक माहितीकरीता https://www.mahaamrut.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, अमृतच्या लक्षित गटातील अधिकाधिक युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेच्या निबंधक प्रिया देशपांडे यांनी केले आहे.