महाविकास आघाडीकडून उद्या महाराष्ट्र बंदची घोषणा


प्रेस मीडिया लाईव्ह :

 बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना घडली होती या घटनेच्या निषेधार्थ आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात  शनिवार 24 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट आणि काँग्रेसने या बंदमध्ये सहभागी होण्याचे जनतेला आवाहन केले आहे. या बंदमुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. अनेक सेवांवर त्यांचा परिणाम दिसून येईल. चाकरमान्यांना या बंदचा फटका बसू शकतो.

सार्वजनिक दळणवळणावर परिणाम

राज्यातील एसटी महामंडळ आणि रेल्वे सेवेवर या बंदचा परिणाम दिसू शकतो. मुंबईत लोकल सेवेवर परिणाम दिसण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी बंद दरम्यान एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक झाल्याने नुकसान झाले होते. तर बदलापूरकरांनी आंदोलन करत रेल्वे रोको केला होता. खबरदारी म्हणून या सेवांना राज्यात काही ठिकाणी फटका बसण्याची शक्यता आहे. बंदच्या माध्यमातून विरोधक ताकद दाखवण्याची शक्यता आहे.

हा राजकीय बंद नसल्याचे अगोदरच महाविकास आघाडीने स्पष्ट केले आहे. उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा बंद राहण्याची शक्यता आहे. भाजीपाला मार्केट, इतर दुकाने बंद असतील. दूध विक्री, भाजीपाला विक्री आणि किराणा सामानाची दुकानं, हॉटेल्स बंद राहण्याची शक्यता आहे.


Post a Comment

Previous Post Next Post