प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर शहरातील विकासकामे गतीने आणि दर्जेदार पध्दतीने झाली पाहिजेत. त्यासाठी आज खासदार धनंजय महाडिक यांनी, महापालिका प्रशासनाबरोबर सुमारे दीड तास चर्चा केली. आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्यासह अन्य अधिकार्यांकडून, खासदार महाडिक यांनी सध्या सुरू असणार्या आणि प्रलंबित असणार्या कामांचा आढावा घेतला. सर्व विकासकामे वेगाने मार्गी लावण्याची सूचना, खासदार महाडिक यांनी केली. त्यासाठी आवश्यक तो निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून उपलब्ध करून देवू, अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली..
कोल्हापूर शहरातील रस्ते दुरूस्तीसाठी शंभर कोटी रूपयांचा निधी आल्याचा मोठा गाजावाजा होत आहे. पण अजुनही शहरातील रस्ते खड्डेमय आहेत. थेट पाईपलाईन योजनेसाठी घेतलेला वीज पुरवठा अव्यवहार्य आहे. शिवाय विभागीय क्रीडा संकुल, आयटी पार्क, शहरातील वाढती अतिक्रमणे, ई बस प्रकल्प, पार्कींगचा बोजवारा, कचरा उठाव, श्री अंबाबाई तिर्थक्षेत्र विकास आराखडा, केशवराव भोसले नाट्यगृहाची पुर्नउभारणी, कंत्राटी कर्मचारी आणि रिक्त पदे अशा विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी आज प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्यासह अन्य अधिकार्यांसमवेत बैठक घेतली. कोल्हापूर शहरासाठी केंद्र सरकारने १०० ई बसेस मंजुर केल्या आहेत. आणखी १५-२० बसेस देण्याची तयारी केंद्र सरकारने दाखवली आहे. त्यामुळे ई बस प्रकल्प महापालिका परिवहन विभागाने तातडीने मार्गी लावावा, नवीन वीज जोडणी, बस चार्जींग स्टेशन, बस थांबे अशा कामांना गती द्यावी, अशी सूचना खासदार महाडिक यांनी केली.
खेलो इंडिया योजनेअंतर्गत सुरू असणार्या आणि प्रलंबित कामांचाही खासदार महाडिक यांनी आज आढावा घेतला. हॉकी स्टेडियम, गांधी मैदान, दुधाळी मैदान, सासने गाऊंड, मेरीवेदर ग्राउंड, रूईकर कॉलनी मैदान यांचा शासकीय निधीतून विकास करण्याची तयारी, खासदार महाडिक यांनी दर्शवली. पॅरिस ऑलिम्पीक स्पर्धेत कोल्हापुरचा सुपूत्र स्वप्निल कुसाळे याने नेमबाजीमध्ये कांस्य पदक मिळवले आहे. त्यामुळे मध्यप्रदेशातील भोपाळच्या धर्तीवर कोल्हापुरात जागतिक स्तरावरील शुटींग रेंज तयार करण्याचा मानस, खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी, जरगनगर मधील शाळेचे विस्तारीकरण आणि आधुनिकीकरणाची सूचना मांडली. तर रूपाराणी निकम यांनी, राजेंद्रनगर मध्ये सुरू असणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराचा मुद्दा उपस्थित केला.
इथले सामाजिक उपक्रम बंद करून, या हॉलमध्ये महापालिकेने आपला दवाखाना सुरू करण्याचा घाट घातला आहे, त्याला निकम यांनी विरोध दर्शवला. प्रा. जयंत पाटील यांनीही, रूपाराणी निकम यांच्या सूचनेनुसार डॉ. आंबेडकर समाज मंदिर सभागृहात सामाजिक उपक्रम सुरू रहावेत, अशी सूचना केली. दरम्यान कोल्हापुरातील अतिक्रमण, त्यातून महापालिकेच्या रिकामा जागा हडप करण्याचा डाव, याबद्दल खासदार महाडिक यांनी अधिकार्यांना खडे बोल सूनावले. अतिक्रमणामुळे शहर विद्रुप होत असताना, अतिक्रमण विभाग गप्प का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. दुसरीकडे थेट पाईपलाईन योजनेचा वीज पुरवठा वारंवार खंडित होतो आणि त्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याबद्दल खासदार महाडिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच महापालिकेने काळम्मावाडी योजनेसाठी वीज पुरवठा घेताना जो पर्याय निवडला आहे, तो अव्यवहार्य असल्याचे स्पष्ट केले.
माजी नगरसेवक विजय सुर्यवंशी आणि किरण नकाते यांनी, महापालिकेच्या रिकाम्या जागेवर होत असलेली अतिक्रमणे आणि जागा बळकावण्याच्या प्रवृत्तीवर बोट ठेवले. महापालिकेचे काही अधिकारीच अशा अपप्रवृत्तींना पाठीशी घालत आहेत, असे विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. सत्यजीत कदम यांनी, टेंबलाईवाडी येथे आयआरबी कंपनीला दिलेली जागा व्यावसायिक उपक्रमासाठी वापरात आणावी आणि महापालिकेचे उत्पन्न वाढवावे, अशी सूचना केली. दरम्यान श्री अंबाबाई तिर्थक्षेत्र विकास आराखडा, हॉकी स्टेडियम ही कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी दिली. महापालिकेतील आरोग्य, अग्नीशमन दल, कंत्राटी कामगार आणि रिक्त पदे, असे प्रश्न मार्गी लावण्याची सूचना प्रा. जयंत पाटील यांनी केली. या बैठकीनंतर सकारात्मक आणि वेगवान पध्दतीने जनहिताची कामे व्हावीत, असे खासदार धनंजय महाडिक यांनी नमुद केले. यावेळी निलेश देसाई, विलास वास्कर, किरण नकाते, मुरलीधर जाधव, उमा इंगळे, आशिष ढवळे यांच्यासह भाजप- ताराराणी आघाडीचे सदस्य उपस्थित होते.