पालकमंत्र्यांनी घेतला नियोजनाचा आढावा
प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर, दि. 19 मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी तपोवन मैदानावर होणारा महिला सन्मान सोहळा यशस्वी करा, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या.
तपोवन मैदानावर गुरुवारी दि. २२ रोजी होणारा सन्मान सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या महिला सन्मान सोहळ्याची नियोजन बैठक पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली प्रमुख उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, लाभार्थी महिलांच्या सहभागातून होणारा हा कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी जबाबदाऱ्या चोख पार पाडाव्यात. कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणाऱ्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या महिला लाभार्थ्यांची तालुकानिहाय यादी तयार करा. कार्यक्रमात उपस्थित लाभार्थ्यांना फूड पॅकेट, नाश्ता, पिण्याचे पाणी, फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था, साफसफाई, पार्किंग, वाहतुक व्यवस्था यांचे योग्य नियोजन करा.
यावेळी मान्यवरांची बैठक व्यवस्था, पार्किंग, वैद्यकीय सुविधा, विद्युत पुरवठा, स्वच्छता, पोलीस बंदोबस्त यांचा आढावा त्यांनी घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी कार्यक्रमस्थळी करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली.