महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने कामगार कल्याण निधी व मंडळाच्या योजना व उपक्रमांबाबत भव्य चर्चासत्राचे आयोजन

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर :महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय, कोल्हापूरच्या वतीने राजश्री शाहू स्मारक भवन दसरा चौक, कोल्हापूर येथे शुक्रवार ३० ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता, कामगार कल्याण अधिनियम १९५३ च्या अनुसंगाने, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजना व उपक्रम यांचा जास्तीत जास्त लाभ विविध आस्थापनातील कामगार व कामगार कुटुंबीयांना मिळावेत, याकरीता मंडळाच्या प्रवाहापासून वंचित व उपेक्षित राहिलेल्या कामगार / कर्मचारी यांना, मंडळाच्या कल्याणकारी प्रवाहात सामावून घेण्यासाठी, उद्योजक, व्यावसायिक व आस्थापना प्रतिनिधी यांचे भव्य चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहे. 

         कोल्हापूर जिल्ह्यातील लहान मोठे सर्व कारखाने व कंपनी, विज कंपनी, एस. टी. महामंडळ, सर्व बँका, हॉटेल्स, हॉस्पिटल्स, जीवन प्राधिकरण, एल. आय. सी., कापुस पणन महासंघ, साखर कारखाने, के. एम. टी., शेतकरी संघ, कृषी उद्योग महामंडळ, दूध संघ, सुतगिरणी, सिनेमागृहे, मॉल्स, शासकिय व खाजगी प्रेस, सर्व वृत्तपत्रे, बी. एस. एन. एल., गाड्यांचे शोरुम्स, ट्रान्सपोर्टस्‌, दुकाने, कुरिअर सर्विसेस्‌, खाजगी सुरक्षा रक्षक, माथाडी कामगार, प्राथमिक शिक्षक बँक, यंत्रमाग उद्योग, चांदी व्यावसायिक, होलसेल व किरकोळ औषध दुकाने अशा विविध आस्थापनेतील कर्मचारी, ज्यांचा दरवर्षी जुन व डिसेंबरच्या वेतनातुन कामगार कल्याण निधी रु. २५/- कपात होतो, असे कामगार / कर्मचारी तसेच ज्या आस्थापना कामगार कल्याण निधी भरत नाहीत किंवा त्यांना याबाबत माहिती नाही, अशा सर्व आस्थापनांना व तेथील कामगार व कुटुंबियांना मंडळाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध आर्थिक लाभाच्या योजना व उपक्रम यांची माहिती कामगारांपर्यंत पोहचविणे व त्यांना मंडळाच्या कल्याणकारी प्रवाहात आणण्याच्या हेतूने या भव्य चर्चासत्राचे आयोजन केले असून, त्याबाबत खालील मान्यवर मार्गदर्शन करणार आहे.

         चर्चासत्राचे उद्घाटन मा.संजय शेटे - अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स कोल्हापूर यांचे हस्ते होणार आहे. मा. हरिश्चंद्र धोत्रे - अध्यक्ष, मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन पंचतारांकित एमआयडीसी, कागल व मा. सुरेश केसरकर - अध्यक्ष, राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मा.मनोज पाटील - सहायक कल्याण आयुक्त, विभाग पुणे हे कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत.

या कार्यक्रमास मंडळाचे कल्याण आयुक्त - मा.रविराज इळवे हे प्रमुख मार्गदर्शक आहेत. तर उप कल्याण आयुक्त - मा. महेंद्र तायडे हे महाराष्ट्र कामगार कल्याण अधिनियम १९५३ या कायद्याबाबत सविस्तर माहिती देणार आहेत. कोल्हापूरचे सहायक कामगार आयुक्त - मा. विशाल घोडके हे मंडळाच्या कल्याणकारी प्रवाहात उद्योजकांचा सहभाग, याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.  तसेच मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर उपस्थितांना मंडळाच्या आर्थिक योजना, उपक्रमांची पी. पी. टी. व्दारे माहिती देण्यात येणार असून, चर्चासत्राव्दारे त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात येणार आहे.

         सदर चर्चा सत्रास कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच कागल, इचलकरंजी, गोकूळ शिरगांव, शिरोली परीसरातील उद्योजक, आस्थापना अधिकारी, कामगार / कर्मचारी तसेच कामगार प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, सर्वांनी सदर ठिकाणी सकाळी ११.०० वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विजय शिंगाडे - कामगार कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांनी पत्रकाव्दारे केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post