मंत्री उदय सामंत यांनी स्वप्नील कुसाळे यांच्या कुटुंबीयांचे केले अभिनंदन
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्वप्निल कुसाळे यांच्या घरी जाऊन स्वप्नीलच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले आहे. यावेळी ते म्हणाले खाशाबा जाधव यांच्या नंतर ऑलिंपिक मधील वैयक्तिक पद स्वप्नील कुसाळे यांच्यामुळे मिळाले असल्याचा आनंद आहे त्याचे राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी अभिनंदन करतो. कोल्हापुरात अधिकाधिक क्रीडा सुविधा उपलब्ध केल्या जातील. महाराष्ट्राला वैयक्तिक कामगिरीसाठी ७२ वर्षांनी पदक मिळाले आहे. या कामगिरीसाठी स्वप्नीलला एक कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. स्वप्नील आणि त्याचे प्रशिक्षक, आई-वडील यांचा यथोचित सत्कारही केला जाईल. याशिवाय स्वप्नीलला नेमबाजीतील पुढील तयारीसाठी आवश्यक, त्या सर्व सोयी- सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. स्वप्नीलने आपल्या कामगिरीने इतिहास रचला आहे. या यशासाठी कुसाळे कुटुंबियांसह, त्याला मार्गदर्शन करणारे, प्रशिक्षक आदींची मेहनत महत्वाची ठरली आहे. कोल्हापूरच्या क्रीडापरंपरेचा लौकिक स्वप्निल कुसाळे याने वाढवला असल्याचा उल्लेख करून त्याला शुभेच्छा दिल्या.
पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील स्वप्नील कुसाळेने उत्कृष्ट कामगिरी करत पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कास्य पदक पटकावले आहे . त्यामुळे राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी सह तालुक्यात प्रत्येक गावोगावी जल्लोषी वातावरण निर्माण झाले आहे. स्वप्निल यांच्या कुटुंबीयांवर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर राधानगरीचे प्रांताधिकारी सुशांत बनसोडे आणि तहसीलदार अनिता देशमुख याही उपस्थित होत्या.
***