मानवी जीवनातील सामाजिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतराचे प्रतिबिंब साहित्यामध्ये दिसून येते - प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

    इचलकरंजी :  मानवी जीवनावर साहित्याचा सखोल परिणाम होतो असतो. भाषेचा शोध, छपाईचा शोध ,भारताचे स्वातंत्र्य, जागतिकीकरण, कोरोना आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ही सहा संस्कृतिक स्थित्यंतरे दिसून येतात. साहित्य हे मानवी जीवनाचा केवळ आरसा नाही तर मानवी मनो व्यापारांचा कल्पित व वास्तवाचा मिलाप असतो. साहित्यात समाज संस्कारित करण्याची ताकद असते. सकस साहित्याची निर्मिती समाज व्यवहाराच्या डोळस दर्शनातूनच होत असते असे मत ज्येष्ठ साहित्यिक व समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज इचलकरंजी येथे महाविद्यालयातील वांङमय मंडळाचे उद्घाटन व महाविद्यालयाचा ६० व्या 'विवेक' वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन या संयुक्त समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम.मणेर होते.

          प्रसाद कुलकर्णी म्हणाले, "साहित्यामध्ये मानवी भावभावनांचा आणि समकालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्थित्यंतराचे प्रतिबिंब दिसून येते. उच्च प्रतीच्या साहित्यामध्ये आशयघनते बरोबरच  नादमाधुर्य असल्याने साहित्य हे समाज परिवर्तनास दिशा देण्याचे काम करते. महाविद्यालयाचे नियतकालिक हे विद्यार्थ्यांमधील साहित्यिक कलागुणांना वाव देते.  यातूनच चांगले साहित्य घडतात."

          अध्यक्षीय मनोगतामध्ये मा. प्राचार्य डॉ. मणेर यांनी "महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जपायला हवी. चांगले व सकस वाचन करून त्यावर चिंतनातून चांगले लेखन सुद्धा विद्यार्थ्यांनी करायला हवे. वाङमय मंडळाचे उपक्रम आपल्याला साहित्याची गोडी लावतात. सर्व भाषेतील साहित्य विद्यार्थी दशेत आपल्याला समृद्ध करत असते. ६० वर्षाची परंपरा आपल्या 'विवेक' वार्षिक नियतकालिकास आहे. विद्यार्थी दशेत नव लेखक, कवी, नाटककार  घडविण्यासाठी व भविष्यातील प्रतिभासंपन्न ‌साहित्यिक निर्माण  होण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी 'विवेक' वार्षिक अंक प्रकाशित होणं अत्यंत महत्त्वाचे ठरते. साहित्य माणसाला आनंद, जीवन जगण्याची संजीवनी ‌देते. विद्यार्थ्यांच्या भावभावना चे प्रतिबिंब वार्षिक अंकातून उमटते. ही परंपरा विद्यार्थ्यांनी वाचन-लेखनातून जपायला हवी." अशा भावना व्यक्त केल्या. 

          दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन आणि संस्थाप्रार्थनेने सुरू झालेल्या समारंभासाठी डॉ. डी. सी. कांबळे, प्रा. डी ए. यादव, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. सुनिता वेल्हाळ, मराठी विभाग प्रमुख डॉ. सुभाष जाधव यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वांङमय मंडळाच्या सचिव डॉ. प्रभा पाटील यांनी तर पाहुण्यांचा परिचय व आभार प्रदर्शन प्रा. रोहित शिंगे यांनी केले. तसेच सूत्रसंचालन डॉ. अंजली उबाळे यांनी केले.कार्यक्रमाचे नियोजन प्रा.संदीप हारगाणे, प्रा. अंकुश कुरणे यांच्यासह वांङमय मंडळातील सदस्यांनी केले. यावेळी ग्रंथपाल प्रा. विजय यादव यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post