प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०)
५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट,समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी ता.हातकणंगलेे जि .कोल्हापूर पिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com
२४ ऑगस्ट हा हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा जन्मदिन.याच तारखेला १९०८ साली ते जन्मले. आणि २३ मार्च १९३१ रोजी वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी भगतसिंग, सुखदेव यांच्यासह ते देशासाठी फासावर गेले. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतीळ एक सशस्त्र क्रांतिकारक होते. पुणे जिल्ह्यातील खेड या गावी एका मध्यमवर्गीय घरात त्यांचा जन्म झाला.प्राथमिक शिक्षणानंतर ते अमरावतीला गेले. तेथील हनुमान व्यायाम शाळेत ते जात असत. त्या वातावरणात त्यांना देशभक्तीची मोठी प्रेरणा मिळाली.१९२३ साली म्हणजे वयाच्या पंधराव्या वर्षी ते संस्कृत अध्यायनासाठी बनारसला गेले. तेथे न्याय शास्त्रातील मध्यमा ही परीक्षा ते उत्तीर्ण झाले. त्यांना संस्कृत, मराठी या भाषांसह इंग्रजी ,कन्नड ,मल्याळम, हिंदी ,उर्दू या भाषांचेही चांगले ज्ञान होते. काही काळ त्यांनी काँग्रेस सेवादलातही काम केले होते. हुतात्मा राजगुरू यांनी शहीद भगतसिंग यांसारखे लेखन केले नाही अथवा आपली विचारधारा त्यातून मागे ठेवली नाही हे खरे. पण वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या या थोर हुतात्म्याला अभिवादन करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ब्रिटिश सत्ता येथून उलथली पाहिजे आणि भारत स्वतंत्र झाला पाहिजे यासाठी सर्वस्वाची आहुती देणे ही त्यांची कृती पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणादायी ठरली आहे.
बनारस मध्ये त्यांची सचिंद्रनाथ संन्याल, चंद्रशेखर आझाद आदी क्रांतिकारकांशी ओळख झाली. ते हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीत दाखल होऊन क्रांतिकार्यात सहभागी झाले.त्यांचा नेम अचूक होता. 'रघुनाथ 'या टोपण नावानेही ते प्रसिद्ध होते. त्यानंतर त्यांची भगतसिंग, जतिनदास ,सुखदेव आदींशी मैत्री झाली. सायमन कमिशनला विरोध करताना झालेल्या हल्ल्यामुळे लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी ज्या क्रांतिकारकांची नेमणूक झाली त्याच राजगुरू ,चंद्रशेखर आझाद ,भगतसिंग, जयगोपाल यांचा समावेश होता. ब्रिटिश पोलिस अधिकारी सँडर्सवर लाहोरला १७ डिसेंबर १९२८ रोजी हल्ला केला होता.त्यातील पहिल्या दोन गोळ्या राजगुरूंनी झाडलेल्या होत्या.नंतर विधानसभेतील सभागृहात बॉम्बफेक प्रकरणी भगतसिंगाना अटक झाली.चंद्रशेखर आझाद व राजगुरू हे दोन वर्ष आज्ञातस्थळी भूमिगत राहून क्रांतिकार्यात मग्न होते .अखेर ३० सप्टेंबर १९२९ रोजी राजगुरूंना पुण्यात अटक झाली. खटला चालला आणि शहीद भगतसिंग आणि सुखदेवांबरोबर त्यांना २३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आले. पुढे त्यांच्या स्मरणार्थ खेड या गावचे राजगुरुनगर असे नामकरण करण्यात आले.
महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या या अस्सल मराठी क्रांतीकारकाने वयाच्या बावीसाव्या वर्षी हौतात्म्य पत्करले. त्यांच्याबाबत महाराष्ट्रातही फार त्रोटक माहिती उपलब्ध आहे. २००८-०९ साली त्यांची जन्मशताब्दी होती तीही मोठ्या प्रमाणात साजरी केली गेली नाही ही खंतवणारी गोष्ट आहे. ऑगस्ट २००८ मध्ये साप्ताहिक लोकप्रभाच्या अंकात' क्रांतिकारक' या कव्हर स्टोरीत हुतात्मा राजगुरूंच्या निवासस्थानाची, पुतळ्याची ,यांच्या रक्षेच्या कलशाची आजही कशी दुर्लक्षित अवस्था आहे याची सचित्र माहिती सादर केली होती. तसेच त्यावर जळजळीत भाष्यही केले होते. त्यात म्हटले होते, राजगुरूंच्या नावाने मत मागणारा सर्वपक्षीय चोर बाजार आतापर्यंत राजगुरूंना वापरतच आला. राजगुरूंनी जुलमी ब्रिटिश अधिकारी सॅंडर्डला मारले असेल. पण आत्ताच्या या देशी सँडर्सना कोण संपवणार ?कारण काठ्याचा मार काय असतो ? कोठडीतल्या नरकयातना कशा असतात ? किंवा फाशीवर जाताना कसा त्रास होतो ?याचा अनुभव आजच्या पिढीला नाही. म्हणूनच कदाचित त्यांच्यासाठी राजगुरू इतिहासातील पुस्तकाच्या फक्त एक दोन परिच्छेदा पुरतेच सिमित असतात. आमचे नेते त्यांच्या प्रक्षश्रेष्ठींच्या पायावर डोके ठेवायला दहा वेळा दिल्लीच्या वाऱ्या करतील.पण त्यांना राजगुरुनगरला यायला वेळ नाही. करोडोंचे बंगले उभा करणाऱ्यांना क्रांतिकारकांच्या वाड्याची एक वीट उभी करणेही जमत नाही. देश स्वतंत्र होऊन सहा दशके उलटल्यावरही राजगुरू आजही गुलामीतच आहे.'
त्यानंतर या बाबीकडे काहीसे लक्ष दिले गेले असे दिसते. आणि हे काम हळूहळू सुरू झाले.नामवंत वास्तुविशारद ,नगरविन्यासकार व जतन-संवर्धनक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अंजली कलमदानी यांचा सकाळ सप्तरंग मध्ये १४ जानेवारी २०२३ रोजी ' हुतात्मा राजगुरू यांचे स्मारक ' हा लेख प्रकाशित झाला आहे. त्यात त्यानी म्हटले होते,
' भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे राजगुरू यांचं स्मारक तसं दुर्लक्षितच राहिलं. राजगुरुनगर इथं ‘हुतात्मा राजगुरू स्मारक समिती’ आहे, तिच्या प्रयत्नानं स्मारकाची डागडुजी झाली. वाड्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या देवघराची बरीच पडझड झाली होती.अर्धवट रखडलेल्या कामात कंत्राटदाराला योग्य दिशेअभावी काम पुढं नेणं अडचणीचं जात होतं. तपशीलवार तयार झालेल्या रेखांकनांच्या आधारे व जागेवर वारंवार सूचित केल्याप्रमाणे लाकडांमध्ये राजगुरूंच्या वाड्याचा भाग पूर्ववत् उभा राहू लागला. देवघर हा मध्ये चिंचोळा चौक असलेला वाडा आहे. त्याचं अर्धं बांधकाम भाडेकरूंनी व्यापलेलं आहे. दगडी जोत्यावरच्या दगडानं घडवलेल्या तळखड्यावर लाकडी खांब व तुळयांचा ढाचा तयार झाल्यावर खालची उजाड ओसरी पूर्ववत् दिसू लागली. लाकडी जिन्याची जागा निश्चित करण्यासाठी पुरातत्त्व खात्यानं, सल्लागार व समितीच्या सदस्यांनी सर्वानुमते निर्णय घेतला. लाकडी मजला व त्यावरील उतरतं छत तयार झाल्यावर वाड्याचं ‘वाडापण’ नजरेत भरू लागलं.'
अंजली कलमदानी पुढे लिहितात,'मधला मजलाही लाकडी फळ्यांमध्ये करताना पारंपरिक पद्धतीनं लाकडी घटकांचं चौकटकाम तयार केलं.
मध्यभागी उघडणारा चौक सोडला तर तिन्ही बाजूंच्या भिंतींचं बांधकाम वीट व चुना यांमध्ये पूर्ण झालं. चौकाच्या बाजूनं उघडणाऱ्या पहिल्या मजल्यावर पारंपरिक पद्धतीच्या वाड्याच्या उंच महिरपीच्या खिडक्या करून खालच्या बाजूला लाकडी कठडा दिला आहे. वाड्यांमधील खिडक्यांची ही पारंपरिक वैशिष्ट्यपूर्ण रचना असून खेळती हवा व उजेड अंशतः बंदिस्त व अंशतः उघड्या चौकातून प्रमाणात मिळत राहतो. उर्वरित भागाला लाकडी बंदिस्त तावदान उभारलं. लाकडी घटकांना तेलाचं आवरण चढल्यावर पारंपरिक वाड्याची शान वाड्याला लाभली. देवघर ही वाड्यातील सर्वात महत्त्वाची जागा. उपलब्ध छायाचित्रावरून रेखांकनं केल्यावर कारागिराकडून त्याचं काम चुन्यामध्ये पूर्ण करून घेतलं.
लाकूडकामातील सुबक, माफक कलाकुसरीचं काम असलेल्या अर्ध्या वाड्याचं जतन-संवर्धन पूर्ण झालं आहे. अजून अर्धा वाडा आणि नियोजित कामाचं व स्मारकाचं बरंच काम व्हायचं आहे.अवघं बावीस वर्षांचं कोवळं आयुष्य देशासाठी बलिदान करणाऱ्या या युवकांसाठी मोठं राष्ट्रीय स्मारक व्हायला हवं आणि आजच्या तरुणांना व अनेक पिढ्यांना त्यांच्या ध्येयनिष्ठ कर्तृत्वाची माहिती असायलाच हवी. जतन-संवर्धनाच्या कामात कुणी अर्धवट सोडलेलं काम पूर्ण करण्यात कधी कधी फार मोठं समाधान दडलेलं असतं. संपूर्ण वाड्यापैकी अर्ध्या वाड्याचं जतन-संवर्धन पूर्ण झालं. ते पूर्ण करताना त्याचं संवर्धन शास्त्रीय पद्धतीनं पूर्ण करणं यापलीकडे त्यात मोठं आव्हान नव्हतं.कारण, हा वाडा पारंपरिक वाडापद्धतीनं बांधलेला कौटुंबिक वाडा होता. त्याचं महत्त्व मात्र फार मोठं अशासाठी होतं की, देशासाठी बलिदान दिलेल्या राजगुरू यांचा तो वाडा आहे. राजगुरू यांना ही आदरांजली वाहण्याची संधी आमच्या ‘किमया परिवारा’तर्फे आम्हाला मिळाली, हे ‘किमया’चं भाग्य म्हणावं लागेल. अपूर्णतेतच कधी कधी सकारात्मक पूर्णत्वाची संधी दडलेली असते, हे कुठल्याही व्यावसायिक प्रशिक्षणाचा भाग नसलेलं तत्त्व कधी कधी स्वतःच्या अनुभवांतूनच शिकायला मिळतं.'
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या वाड्याची अंजली कलमदानी यांच्या या लेखानंतरची गेल्या दीड वर्षानंतरची अवस्था काय आहे याबाबत मी अनभिज्ञ आहे. ते काम पूर्णत्वास गेले असेल तर उत्तमच नसेल तर ते लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे तीच हुतात्मा राजगुरूंना खरी श्रद्धांजली ठरेल.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)