प्रेस मीडिया लाईव्ह :
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडील निर्णयानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन २०२४/२०२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यात आली आहे.या योजनेमध्ये इयत्ता १२ वी पास, विविध ट्रेडमधील आयटीआय, पदविकाधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश करणेत आला असून या उपक्रमांतर्गत इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करुन देणारे उद्योजक जोडले जाणार असून लघु आणि मध्यम (SMEs) व मोठे उद्योग, स्टार्टअप्स, सहकारी संस्था, शासकीय, निमशासकीय आस्थापना / महामंडळ, सामाजिक संस्था (कंपनी कायदा, २०१३ मधिल सेक्शन ८) आणि विविध आस्थापना इत्यादी ठिकाणी प्रशिक्षणार्थी उमेदवार उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.
या योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हते प्रमाणे प्रतिमाह विद्यावेतन इ. १२ वी (र.रू. ६०००/-), आय टी आय/पदविका (र.रू.८०००/-), पदवीधर/ पदव्युत्तर (र.रू.१००००/-) शासनामार्फत थेट प्रशिक्षणार्थ्याच्या बँक खात्यावर (online) ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात येणार आहेत.
या योजनेच्या अनुषंगाने इचलकरंजी महानगरपालिके कडून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, विद्युत,यांत्रिकी, हार्डवेअर/नेटवर्कींग, सॉफ्टवेअर,),लिपीक- टंकलेखक, गाळणीचालक, स्वच्छता निरीक्षक,ए.सी.ऑपरेटर, साऊंड सिस्टीम ऑपरेटर, वीजतंत्री, तारतंत्री, प्लंबर, फिटर, पंप ऑपरेटर, सर्व्हेअर आणि आरेखक अशी १७ संवर्गातील ८८ पदे उपलब्ध करून देण्यात आलेली होती.
या योजनेच्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देणेत आलेल्या वरील पदांपैकी कनिष्ठ अभियंता ९ , स्वच्छता निरीक्षक १, लिपिक ३, गाळणी चालक १, फिटर १, वीज तंत्री १ अशा एकुण १६ विद्यार्थ्यांना आज आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे आणि उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या हस्ते नियुक्तीचे आदेश प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी सहा आयुक्त विजय राजापुरे, कार्यालयीन अधीक्षक प्रियांका बनसोडे, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे,अभियंता बाजी कांबळे, सदाशिव शिंदे, सदाशिव जाधव, राहुल पोटे, प्रदिप झमरी,संध्या आदवाने आदी उपस्थित होते.