स्त्रीविषयक आमचा दृष्टिकोन काय हे तपासण्याची गरज

 समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रातील मत

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.२८ बदलापूरसह अन्यत्र घडत असलेल्या लहान मुली ते वयोवृध्द स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना अतिशय निंदनीय आहेत. त्याचा करावा तेवढा धिक्कार थोडाच आहे .अशा गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणि त्याला सहाय्यभूत ठरणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा त्वरित मिळायला हवीच. मात्र त्याबरोबरच स्त्रीविषयक आमचा दृष्टिकोन काय हे तपासण्याची आणि तो अधिक व्यापक करण्याची नितांत गरज आहे. स्त्रीचा एक स्वतंत्र माणूस म्हणून न विचार करता तिला कायम परस्वाधिन मानण्याची, स्त्रीला स्वतःचे व्यक्तिमत्व नसून तिची ओळख पुरुषाच्या आधारेच निर्माण व्हावी अशी निर्माण केलेली परिस्थिती आणि योनीसुचीतेपर्यंतच स्त्रीला मर्यादित ठेवण्याची विकृत परंपरा खंडित करण्याची नितांत गरज आहे.असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. " बदलापूरची व तत्सम घटना आणि त्यावरील उपाय योजना " या विषयावर हे चर्चासत्र होते.या चर्चेत प्रसाद कुलकर्णी, अशोक केसरकर, राजन मुठाणे,देवदत्त कुंभार, शकील मुल्ला, मनोहर जोशी, शहाजी धस्ते, मनोहर जोशी , अशोक मगदूम आदींनी सहभाग घेतला. प्रारंभी ज्येष्ठ मराठी साहित्य महादेव मोरे यांना आदरांजली वाहण्यात आली.

या चर्चासत्रातून. असेही मत व्यक्त झाले की, आपला स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच दिवसेंदिवस अमानवी होतांना दिसत आहे. स्त्रीचे शोषण करणारी आणि तिला दुय्यमपणाच्या दुर्बल स्थानावर खिळवून ठेवणारी पुरुषप्रधान समाजरचना  एकीकडे स्त्रीचा जन्मदात्री, जननी ,दुर्गा असा आदराने उल्लेख करत दुसरीकडे स्त्री देहाकडे ज्या दृष्टीने आणि वृत्तीने पाहले जाते ते अतिशय निंदाजनक आहे.तिला मुळातून नाकारणारी भूमिका मराठी संतांपासून आजच्या प्रबोधन व परिवर्तनवादी चळवळीने घेतलेली आहे. ती अधिकाधिक विकसित करण्यातूनच समतावादी सुदृढ समाज निर्माण होईल. म्हणून ती विचारधारा रुजवण्यासाठी आणि अंगी करण्यासाठी आपल्या कुटुंबापासून सुरुवात केली पाहिजे. तरच अशा अन्याय अत्याचाराच्या घटनांना आळा बसेल. या चर्चासत्रात या विषयाची विविध अंगाने मांडणी करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post