प्रेस मीडिया लाईव्ह :
कोलकत्यातील वैद्यकीय महाविद्यालयात ट्रेनी डॉक्टर महिलेचा बलात्कार करून खून करण्यात आला होता. या घटनेमुळे डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाचा आजचा पाचवा दिवस आहे. या संपात मुंबई, पुणे आणि राज्यातील विविध जिल्ह्यातील डॉक्टरांनी व निवासी डॉक्टरांनी सहभाग घेतला आहे. यच बरोबर खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरही या संपात सहभागी झाल्याने आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे.
या संपाला मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांच्या संघटने देखील पाठिंबा जाहीर केला आहे. या संपात विद्यार्थी, निवासी डॉक्टर, वरिष्ठ निवासी डॉक्टर आणि अध्यापक यांनी सहभाग घेतल्याने बाह्यरुग्ण सेवा पूर्णतः कोलमडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईतील केईएम, नायर, शीव आणि कूपरचे अनेक डॉक्टर या संपात सहभागी झाले असून आज होणाऱ्या नियोजित शस्त्रकिया रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, रुग्णसेवा बाधित होऊ नये यासाठी देखील प्रयत्न केले जात आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयामधील शिक्षकांची संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. गिरीश राजाध्यक्ष म्हणाले, 'म्युनिसिपल मेडिकल टीचर्स असोसिएशन'नेही (एमएमटीए) या आंदोलनाला पाठिंबा दिला असून अत्यावश्यक व अपघात विभागातील सेवा सुरू ठेवणल्या जाणार आहे. आज होणाऱ्या आंदोलनात तब्बल ९० हजार डॉक्टर सहभागी होणार आहेत. डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत हा संप मागे घेतला जाणार नाही, अशी भूमिका संघटनांनी घेतली आहे. याला 'मार्ड'ने पाठिंबा दिला आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयातील ५६६ निवासी डॉक्टरांंनी या संपात सहभाग घेतला आहे. यातील पैकी १८० डॉक्टर अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत आहेत. आता एमबीबीएसच्या २५० अंतर्वासित विद्यार्थ्यांनी देखील संपात सहभाग घेतला आहे. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णसेवेवर गंभीर परिणाम झाला असून बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसंख्या कमी झाली आहे. आज होणाऱ्या अनेक शस्त्रक्रिया या पुढे ढकलण्यात आल्या आहेत.