सांगली : दहा हजारांच्या लाचेची मागणी; महिला तलाठ्यासह दोघांवर गुन्हा

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इस्लामपूर : खरेदी केलेल्या शेतजमिनीस नावनोंदणी करून उतारा देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागणार्‍या येडेमच्छिंद्रच्या महिला तलाठ्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तलाठी सीमा विलास मंडले (वय 44, रा. सैदापूर, ता. कराड) व चंद्रकांत बबनराव सूर्यवंशी (रा. येडेमच्छिंद्र) अशी संशयितांची नावे आहेत. इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

तलाठी मंडलेने चंद्रकांत सूर्यवंशी याच्यामार्फत तक्रारदार यांच्याकडे जमिनीची नोंद करण्यासाठी लाच मागितली होती. तक्रारदाराने एक ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडे तक्रार दिली होती. पथकाने या तक्रारीची खातरजमा केली असता, त्यात तथ्य आढळले. तलाठी मंडले हिची बदली झाली आहे. ती येडेमच्छिंद्र येथील कार्यभार सोडण्यासाठी गेली असताना तिच्यावर हा गुन्हा दाखल झाला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनायक भिलारे, पोलिस अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, सीमा माने, पोपट पाटील, सलीम मकानदार, चंद्रकांत जाधव, वीणा जाधव, चालक विठ्ठल रजपूत यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post