लोकनेते विलासकाकांच्या पूर्णाकृती पुतळ्या निमित्ताने

 On the occasion of the full-length statue of People's Leader Vilasakaka

प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०)

५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट,समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी ता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com


 सोमवार ता.१५ जुलै २०२४ हा ज्येष्ठ नेते कालवश विलासकाका पाटील (उंडाळकर) ८६ वा यांचा जन्मदिन. आज कराड येथे विलासकाकांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि कोयना बँकेच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन असा संयुक्त सोहळा संपन्न झाला. ज्येष्ठ नेते भाई जयंत पाटील यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण तर बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते मा. बाळासाहेब थोरात यांनी केले. माजी मुख्यमंत्री मा.पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार विशाल पाटील, माजी मंत्री जयवंतराव आवळे, माजी मंत्री विश्वजित कदम, आमदार संग्राम थोपटे,श्रीमंत पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी, संस्था पदाधिकारी व हजारो नागरीक बंधू- भगिनी उपस्थित होते. कोयना सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष आणि रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऍड. उदयसिंह पाटील ( दादा )यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे उत्तम नियोजन करण्यात आले होते. सर्व मान्यवरांनी विलासकाकांच्या कार्यकर्तृत्वाचा उहापोह केला. त्यांची विचारधारा, त्यांनी उभे केलेले काम आणि त्यांचा पुतळा सर्वांना मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला. या सोहळ्याचे आभार कोयना बँकेचे चेअरमन रोहित पाटील यांनी मानले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून कालवश विलासकाकांना अभिवादन करता आले व विलासकाकांचा व माझा तीन दशकांचा स्नेह होता त्याचा आवर्जून उल्लेख करून माझा विशेष सत्कार करण्यात आला याबद्दल मी कृतज्ञ आहे.


मा.विलासकाका पाटील ( उंडाळकर ) म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढा व भारतीय राज्यघटना यातील मूल्यांच्या संवर्धनासाठी सातत्याने झटणारा व प्रबोधन चळवळीला पुढे नेणारा लोकनेता. सोमवार ता.४ जानेवारी २०२१ रोजी पहाटे काका कालवश झाले.काकांच्या जाण्याने काँग्रेस पक्ष,पुरोगामी चळवळ,प्रबोधनापासून साहित्य चळवळीपर्यंत, सहकारा पसून शिक्षण क्षेत्रापर्यंत सर्वच क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.आज एका अर्थाने ” काका नावाचा बापमाणुस ” आपण गमावला आहे. या थोर नेत्याच्या कार्यकर्तृत्वाबाबत नव्या पिढीने जाणून घेण्याची गरज आहे.


राजकीय कारकिर्दीच्या पन्नास वर्षात आमदार म्हणून सलग पस्तीस वर्षे निवडून येणे ही दुर्मिळ गोष्ट आहे. जनतेने सलग सात वेळा निवडून दिलेले लोकप्रतिनिधी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात ही दुर्मिळ आहेत. विलासकाकांच्या बाबतीत हे झालं याचं कारण  ” काकांचा लोकविश्वास आणि लोकांचा विलासकाकांवरचा विश्वास ” यांचे अतूट असल्यानेच हे घडून आले होते. विलासकाका पाटील-उंडाळकर सातारा जिल्ह्यातून आलेले स्वातंत्र्योत्तर भारतातील राज्य पातळीवर एक कणखर, आदर्श विचारव्याप्त असे विविधांगी अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. 


भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात सातारा जिल्ह्याने एक सुवर्ण अध्याय लिहिला आहे. देशप्रेमाने भरलेली जाज्वल्य निष्ठा आणि नवा भारत घडवण्याची असीम ऊर्जा या जिल्ह्याच्या कणाकणात, रोमारोमात भिनलेली आहे. त्याची शेकडो उदाहरणे स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात पानापानांवर सापडतात. याच मांदियाळीतील एक थोर नेते, थोर स्वातंत्र्यसैनिक क्रांतीवीर दादासाहेब उंडाळकर यांचे विलासकाका हे पुत्र होते. इंग्रजांच्या जुलमी जोखडातून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. तत्पूर्वी बरोबर नऊ वर्षे एक महिना आधी विलास काकांचा जन्म झाला अर्थात ती तारीख होती १५ जुलै १९३८.


पहिल्या स्वातंत्र्यदिनाचा सूर्योदय आपल्या बालवयातच पाहिलेल्या विलासकाकांना  स्वातंत्र्य कशासाठी ? या विचारांचे संस्कार बालपणापासूनच ऐकायला ,पाहायला, अनुभवायला मिळाले होते.नंतरच्या काळात एक लोकप्रतिनिधी या नात्याने ते राजकारण, समाजकारण, शिक्षण, सहकार आदी विविध क्षेत्रात जी सातत्यपूर्ण उत्तुंग कामगिरी अखेरपर्यंत करत राहिले त्याचे बिज त्या बाळकडूच होते. पन्नास वर्षाहून अधिक काळ विकासाचे व संघर्षाचे राजकारण करणे ही सहजसाध्य गोष्ट नसते .त्यासाठी त्यांची जिद्द, परिश्रम ,मेहनत, लोकोद्धाराचे धोरण आणि त्यांच्यावर लोकांचा जनतेचा असलेला विश्वास हेच आहे. ज्याला खऱ्या अर्थाने लोकनेता म्हणता येईल असे विलास काकांचे व्यक्तिमत्व होते.


सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या माणसाचे व्यक्तित्व तसे व्यक्तिगत आणि संस्थात्मक – संघटनात्मक अशा दुहेरी स्वरूपाचे असते. विलासकाका एकाच वेळी अनेक उपक्रम चालविणारी व्यक्ती ऐवजी संस्थाच बनत गेले. त्यामुळे सार्वजनिक जीवनात सतत पन्नासवर्षांहून अधिक काळ राहूनही विलासकाका अंतर्बाह्य एकच राहू शकले. असे एकजिनसी व्यक्तित्व फार कमी नेत्यांकडे असते.विलासकाका त्याचे धनी होते हे त्यांचे महत्त्वाचे वेगळेपण होते. निवडणुकीचे, संस्थांचे राजकारण करताना आपले लोकप्रतिनिधीत्व कशासाठी ?आणि आपली संस्थात्मक सत्ता कोणासाठी? याचा विचार विलासकाकांकडे पक्का होता. इतका सातत्यपूर्ण जनाधार हे त्यांच्या उक्ती आणि कृतीतील ऐक्याचे गुपित होते.सर्वांगीण सुधारणेची तळमळ, त्यासाठीचे व्यापक भान आणि राजकीय इच्छाशक्ती या भावी प्रभावी नेतृत्वाकडे असणे गरजेचे असते.त्या विलासकाकांकडे होत्या, मोठ्या प्रमाणात होत्या.


१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यानंतर गेल्या साठ वर्षांच्या महाराष्ट्राच्या इतिहासात लोकप्रबोधनाचा ध्यास उराशी घेऊन,तो जपत राजकारण करणारा काँग्रेसच्या विचारधारेतील प्रमुख नेता म्हणून  आपल्याला विलासरावांकडेच पहावे लागेल. जुन्या आणि नव्या पिढीचा सांधा जुळवण्याचे, त्यासाठी आवश्यक ते प्रबोधन करण्याचे सातत्यपूर्ण काम  विलासकाकांनी केले.  स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर या पित्याचे व परिवाराचे संस्कार आणि सातारा जिल्ह्याचा जागृत भवताल या प्रेरणा त्यामागे होत्या. या प्रेरणेतूनच  चाळीसहून अधिक वर्षे विलासकाका दरवर्षी नित्यनेमाने स्वातंत्र्यसैनिकांचे अधिवेशन भरवत. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा विचार आणि वसा पुढे नेण्याचा हा व्रतस्थ प्रयत्न अतिशय मौलिक स्वरूपाचा आहे.यानिमित्ताने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरची फार मोठी माणसे त्यांनी सातारा जिल्ह्यात आणली. आपल्या उंडाळे गावी आणली.


 हुतात्मा दिन ( ९ऑगस्ट )कराड शेतकरी मोर्चा दिन (२४ ऑगस्ट) साहित्य संमेलन, कृषी औद्योगिक प्रदर्शन, कार्यकर्ता प्रबोधन शिबिर आदी उपक्रम सातत्यपूर्णतेने राबवण्यामागे  विलासकाकनकतील प्रबोधनकारांचा पिंडच महत्त्वाचा ठरला आहे.

या सार्‍या उपक्रमा बरोबरच शिक्षण आणि सहकार क्षेत्रातील कामही विलासकाकांनी त्याच प्रबोधनाच्या उर्मीतून केले आहे. १९६७  साली  विलासकाका उंडाळे येथे ग्रामीण विकास शिक्षण संस्थेची स्थापना करून ” शहाणे करून सोडावे सकल जन ” या उक्तीप्रमाणे ग्रामीण भागात कार्य सुरू केले. आज त्याचा मोठा विस्तार झाला आहे .सहकार क्षेत्रातही सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ,रयत सहकारी साखर कारखाना, कोयना सहकारी दूध संघ, कोयना बँक , विविध विकास सोसायट्या आदी अनेक संस्थांद्वारे सातारा जिल्हा सर्वार्थाने सुजलाम-सुफलाम करण्याच्या प्रयत्नात विलास काकांनी सिंहाचा वाटा उचललेला आहे यात शंका नाही.  राजकारणामध्ये धर्मांध आणि जातीयवादी शक्तींचा शिरकाव गेल्या दोन-तीन दशकांत वाढलेला आहे. सध्या तर राजकारणाच्या केंद्रस्थानी त्यांचा वावर पाहायला मिळतो.हा धोका ओळखून विलास काकांनी तीस वर्षांपूर्वी ९ मे १९९० रोजी धर्मांधता आणि जातियवाद विरोधी परिषद आयोजित करून लोक प्रबोधनाचा जागर मांडला होता. तो जागर ते  अखंडपणे करत राहिले.


देशातील पहिला वारणा -कृष्णा नदीजोड प्रकल्प राबविण्यापासून ते दुष्काळ निर्मूलनाच्या कामात सक्रीय सहभागापर्यंत आणि शैक्षणिक चिंतन परिषदेपासून राज्यघटना बचावपरिषदे पर्यंत विलासकाकांनी केलेले काम अतिशय महत्त्वाचे ,मूलभूत स्वरूपाचे व प्रेरणादायी होते. जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकारणात प्रवेश केलेले विलासकाका सलग पस्तीस वर्षे आमदार म्हणून निवडून आले. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दुग्धविकास, पशुसंवर्धन, विधी – न्याय व पुनर्वसन, सहकार व वस्त्रोद्योग अशी विविध खाती त्यांनी सांभाळली.आणि तिथे आपली मुद्रा उमटवली. सहकार ,शिक्षण आदींच्या अभ्यासासाठी त्यांनी अमेरिका, इंग्लंड, चीन ,जर्मनी ,थायलंड अशा अनेक देशांना भेटी दिल्या. काका हे सारं करू शकले याचे मुख्य कारण लोकोद्धा र ही त्यांनी जीवननिष्ठा मानलेली होती. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यानंतर १९५५ मध्ये भरलेल्या ‘आवडी’ येथील अधिवेशनात समाजवादी समाजरचनेची  दिशा स्वीकारली होती. त्यावेळी ऐन तारुण्यात पदार्पण करणाऱ्या विलास काकांच्या मनोभूमिकेवरही ही समाजवादी समाजरचनेचे मूल्ये ठसली ती अखेरपर्यंत त्यांची उक्तीव  कृतीतून दिसून आली. स्वामी विवेकानंदांनी एके ठिकाणी म्हटले आहे ,” आपला अहं जो विसरतो आणि कार्यावरच जो निष्ठा ठेवतो, तो उत्कृष्ट नेता असतो.” विलासकाकांच्या कारकिर्दीकडे पाहताना त्याचा प्रत्यय येतो.अर्थात विलास काकांनी राजकीय ,सामाजिक जीवनात अनेक कटू प्रसंगही पाहिले पण त्याचा बाऊ न करण्याचा मोठेपणा त्यांना आणखी मोठे करून गेला. खरंच हा ‘ काका नावाचा बाप माणूस ‘ होता.


विलासकाकांचा आणि माझा स्नेह हा तीन दशकांचा होता. समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक थोर विचारवंत कालवश आचार्य शांताराम गरुड आणि विलास काकांचा स्नेह अनेक दशकांचा होता. एकाच म्हणजे कराड तालुक्यात जन्मलेले हे दोघे राजकीय विचारधारानी  वेगवेगळे होते.पण त्यांची मैत्री घट्ट होती. या मैत्रीच्या बंधनामागे, लोकप्रबोधन ,समाज परिवर्तन ,समाजवादी समाजरचना स्वातंत्र्यलढ्याची मूल्ये, राज्यघटनेचे तत्त्वज्ञान असे अनेक समानधर्मी ,समानकर्मी, समविचारी पक्के धागे होते. त्यातूनच काकांचा व माझाही स्नेह जुळला.तो अखेरपर्यंत होता. तीस वर्षात मी अनेकदा त्यांच्या विविध उपक्रमात सहभागी झालो आहे. अभ्यास शिबिरातील व्याख्याने,राष्ट्रीय शिबिरांचे आयोजन,  कार्यकर्ता प्रबोधन शिबिरे अशा सर्व उपक्रमात विलासकाका मला हक्काने सहभागी करून घेत होते. आणखी एक म्हणजे विलासकाकांच्या मुळे  मी मुलाखतकार झालो. वास्तविक मी कधीच कोणाच्या मुलाखती घेत नव्हतो आणि आपण त्या घ्याव्यात असे मलाही कधी वाटत नव्हते. पण मुलाखत घेणाराही अभ्यासु व व्यासंगी असावा हे जाणलेल्या काकांनी मला ते सुचवले. आणि त्यामुळेच मी गिरीश कुबेरांपासून प्रकाश बाळ यांच्यापर्यंत आणि डॉ. अशोक चौसाळकर यांच्यापासून डॉ.सदानंद मोरे यांच्यापर्यंत अनेकांच्या मुलाखती काकांच्या कार्यक्रमात घेतल्या. खुद्द काकांचीही मुलाखत मी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला पन्नास वर्षे झाली तेंव्हा घेतलेली होती.या सर्व मुलाखती गाजल्या. 


लोकांना भावल्या.त्या पुस्तकरुपानेही काकांनी प्रकाशित केल्या. विलास काका मला अभ्यासक मानत होते म्हणूनच हे सारे घडले असे मी मानतो. त्यांच्यासारखी ज्येष्ठ आदरणीय, मान्यवर ,जाणकार  व्यक्ती जेंव्हा असा  विश्वास टाकते तेंव्हा   लोकप्रबोधनाचे काम आणखी व्यापक करण्याची ऊर्मी येते. म्हणूनच या प्रेरणादायी नेतृत्वाबद्दल मला नेहमीच आदर वाटत आला आहे. संपर्क ठेवण्याची हातोटी त्यांना विलक्षण साध्य झालेली होती. स्वतः मोबाईल न वापरणारे काका  वारंवार आवर्जून फोनही करत असत.त्यांच्या मतदारसंघाची खडा न खडा माहीती त्यांच्या कडे होती.गल्लीतील कार्यकर्त्यालाही नावाने ते बोलावत असत.त्यामुळे या लोकनेत्याबद्दल सर्वानाच आपुलकी होती.त्यांच्या निधनानंतर हायवेपासून उंडाळ्यापर्यन्त दहा – बारा किलोमीटरवर रस्ताच्या दुतर्फा या लोकनेत्याच्या अंत्यदर्शनासाठी झालेली शोकाकुल अबालवृद्ध स्त्री पुरुषांची गर्दी आणि उंडाळ्याच्या शेतात अंत्यसंस्कारावेळी लोटलेला हजारोंचा जनसागर ही विलासकाका या लोकमान्य लोकनेत्याची कमाई होती.विलासकाका म्हणजे माणसे उभे करणारा व कार्यकर्ते घडवणारा एक सदैव तेजीत असलेला कारखाना होता.त्यांच्या कालवश होण्याने फार मोठे नुकसान झाले आहे.पण त्यांची विचारधारा व कृतीशीलता जपणे हीच त्यांना आदरांजली ठरेल.त्यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील आणि काकांचे हजारो कार्यकर्ते  तो वसा व वारसा नेटाने पुढे नेत आहेत ही मोठी जमेची बाजू आहे. विलासकाकांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.



(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post