प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०)५३६/१८,
इंडस्ट्रियल इस्टेट समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि कोल्हापूर पिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)
prasad.kulkarni65@gmail.com
प्रेस मीडिया लाईव्ह :
आषाढीची वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर पर्यंत केलेला पदयात्रा असते. तर कार्तिकीला पंढरपूर, आळंदी आणि देहुला भक्त जात असतात. सध्या आषाढीच्या निमित्ताने अवघा महाराष्ट्र विठू नामाच्या गजरात दंग आहे. वारी, वारकरी ,पालखी, रिंगण या माध्यमातून समतेचा लोकजागर घालण्याचे फार मोठे काम मराठी संत परंपरेने केले. संतांची ही भूमिका प्रत्येकाने समजून घेणे व त्याप्रमाणे वागणे फार महत्त्वाचे आहे. उक्ती आणि कृती यात अंतर पडू द्यायचे नसेल तर संत साहित्याकडे आपण डोळसपणे पाहिले पाहिजे. संतांचे साहित्य केवळ मराठी भाषेचेच नव्हे तर जागतिक वाङ्मयाचे मानवतावादी अलौकिक लेणे आहे.मराठी संत साहित्य अत्यंत विपुल आणि वैविध्यपूर्ण आहे. ज्याला लोकाभिमुख साहित्य म्हणतात त्याचे उत्तम उदाहरण म्हणून संत साहित्याकडे पाहावे लागेल. समाजाच्या सर्व स्तरात हे साहित्य पोहोचले. त्याचा स्वीकार झाला म्हणून तर गेली सातशे वर्षे अशिक्षित वारकऱ्यांपासून ते उच्च पदवी प्राप्त करणाऱ्या सुशिक्षित माणसांपर्यंत या साहित्याने सर्वतोमुखी स्थान प्राप्त केले आहे.
एकीकडे महाराष्ट्रात आषाढी वारी, दिंड्या,पालख्या सुरू असताना , त्यामध्ये लाखो भाविकांचा सहभाग असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशात हाथरस येथे एका भोंदू बाबाच्या प्रवचनानंतर त्याची चरणधूळ माथी लावण्याच्या नादात सव्वाशेवर निष्पापांचा बळी गेलेला आहे. हा भोंदू बाबा पूर्वी सरकारी कर्मचारी असल्याचे सांगण्यात येते. सुरज पाल उर्फ चमत्कारी बाबा उर्फ जगद्गुरु साकार विश्र्वहरी भोलेबाबा अशी त्याची नावे बदलत गेली. हा प्रकार झाल्यापासून हा प्रवचनकार बोले बाबत गेले तीन दिवस गायब आहे. त्याला काही वर्षांपूर्वी एका स्मशानभूमीत सोळा वर्षीय मृत तरूणीला जिवंत करतो म्हणून त्याने जबरदस्तीने तिचा मृतदेह नेला होता. त्याप्रकरणी त्याला अटकही झाली होती अशी ही माहिती पुढे आली आहे. भोंदू बाबांचा हा सुळसुळाट आणि मतांच्या गटासाठी त्यांना मिळणारे राजकीय अभय आजचा महत्त्वाचा प्रश्न तीव्र बंद आहे. या पार्श्वभूमीवर लोकांनी च आपल्या सत्संग विवेक बुद्धीचा वापर करून अशा भोंदूंपासून स्वतःला दूर ठेवणे गरजेचे आहे. जर तसे नसेल तर संतांच्या साहित्यातून आपण काहीही शिकलो नाही हाच त्याचा अर्थ आहे. देशभर गावोगावी पसरलेल्या अशा भोंदूंवर कठोर कारवाई करणे हे सरकारचेही कर्तव्य आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा ही संपूर्ण देशात व्हावा अशी मागणी सध्या संसदेत सुरू असलेल्या अधिवेशनातही केली गेली त्याचे महत्व मोठे आहे.
गेल्या सातशे वर्षात महाराष्ट्रात विविध क्षेत्रात अनेक घडामोडी घडल्या. या सात शतकातील सामाजिक ,राजकीय ,सांस्कृतिक घडामोडींवर संत साहित्याचा प्रभाव पडला. त्याचे प्रतिबिंब या साहित्यात पडले. त्यामुळे संत वाङ्मयात महाराष्ट्राच्या सांस्कृतीचे आणि मराठी भाषेचे मोठे वैभव जपल्याचे दिसून येते. संतांनी तळागाळातल्या माणसांच्या दुःखाला, प्रश्नांना वाचा फोडली. माणूस म्हणून बघताना जात-पात -धर्म-पंथ आदी भेदांपेक्षा माणुसकीचा विचार महत्त्वाचा आहे. त्यासाठी माणुसकीची जोपासना करण्याचे आवाहन संत साहित्यात वारंवार दिसून येते. तसेच त्याला संतांच्या आचरणाचीही जोड होती.आधुनिक प्रबोधनाची चळवळ जरी गेल्या दोनशे वर्षात सुरू झाली असली तरी त्या प्रबोधनाच्या चळवळीला पोषक ठरेल असा पुरोगामी विचार , प्रागतिक दृष्टिकोन संत साहित्याने महाराष्ट्रात निर्माण केला आणि तो रुजवण्याचा प्रयत्न केला.
संत ज्ञानेश्वर ,एकनाथ, नामदेव, तुकाराम आणि रामदास या संत पंचकाप्रमाणे सेना न्हावी ,बंका महार, गोरा कुंभार , विसोबा खेचर,चोखामेळा मुक्ताबाई, सावता माळी ,जनाबाई , कान्होपात्रा वेणाबाई अशा विविध स्त्री-पुरुष संतांची सर्वमान्य परंपरा आहे.ज्ञानेश्वर ते तुकाराम यांना वारकरी संप्रदायांचा पाया होता. समर्थ रामदासांनी स्वतःचा समर्थ संप्रदाय निर्माण केला. त्याद्वारे काम करण्याचा प्रयत्न केला.वारकरी संप्रदायाची स्थापना जरी भक्त पुंडलिकांनी केली असली तरी या संप्रदायाला वैचारिक अधिष्ठान मिळवून देण्याचे काम ज्ञानेश्वरानी केले. नामदेवांनी, एकनाथांनी त्यात भर घातली आणि या वैचारिक कामगिरीवर कळस तुकोबारायांनी चढवला.
संत वांग्मयात भक्तीरस थांबलेला आहे .भक्ती हाच त्याचा गाभा आहे हे खरेच.पण म्हणून संत वांग्मय केवळ भक्ती रसाचे वांग्मय आहे असे म्हणता येणार नाही. कारण यामध्ये लोकप्रबोधन, लोक जागृती ,लोक चळवळ करण्याचाही उद्देश स्पष्टपणे दिसतो. म्हणूनच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात संत वांग्मयाला मानाचे स्थान प्राप्त झालेले दिसून येते. सर्व संत हे बंडखोर कवी होते.संतांची ही बंडखोरी मूठभर मंडळींच्या पचनी पडणारी नव्हती.कारण जैसे थे परिस्थितीत मश्गूल राहणारा स्थितीवाद संतानी नाकारला.नवा विचार मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतांवर प्रचंड टीकाही झाली. पण संत डगमगले नाहीत .संत महामानव होते म्हणून त्यांनी इतरांनाही माणूस बनवण्याचा प्रयत्न केला. म्हणून तर कालवश श्री . म.माटे यांनी 'संतांनी परमार्थिक लोकशाही स्थापन केली' असे म्हटले आहे.
महामानव असल्यामुळे संतांचे जीवन संघर्षमय असणे अपरिहार्य होते. त्यांच्या जीवनात योगायोग जरूर होते पण चमत्कार नव्हते. पण त्यांना जाणीवपूर्वक चमत्कारवादी ठरवण्याचा उद्योग केला गेला . आजही केला जातो आहे .अर्थात चमत्कारवाद पसरवणारी मंडळी केवळ अंध पणाने हे करतात असेही नाही. असे करण्यामागे त्यांचा डोळस पुनरुज्जीवनवाद आहे.कारण स्थितीवादी मंडळींना पुनरुज्जीवन सोयीचे असते. भूतकाळाचे भूत उभे करून लोकांना वर्तमानापासून दूर ठेवण्याचे ते कारस्थान असते.संत महामानव होते पण त्यांचे दैवतीकरण करण्याचा उद्योग केला जातो. जो स्वतः संतानाही अमान्य होता. म्हणून संत वांग्मय याबाबत विचार करताना ' पारायणापेक्षा आचरणाला महत्त्व ' देण्याच्या विचार समाजात रुजवण्याची गरज आहे.
वस्तुतः ज्ञानदेव ते तुकाराम या काळातील चारशे वर्षांमध्ये कोणत्याही चमत्काराशिवाय संत साहित्याने महाराष्ट्राला झोपेतून हलवून जागे केले.अशा परिस्थितीत संतवाणीचा पुरोगामी आणि प्रबोधनाच्या दृष्टीने व्यापक अंगांनी विचार होण्याची गरज आहे. संतांनी अध्यात्मिक विचाराला मानवतावादाची बैठक दिली.अध्यात्मिक विचार मांडताना कर्मकांडे, अंधश्रद्धा ,श्रेष्ठकनिष्ठ ही मानवनिर्मित भेदनीची, दांभिकता आणि फसवणूक यासारख्या माणुसकीशी फारकत घेणाऱ्या विचारांवर, रुढी परंपरांवर संतांनी कठोर प्रहार केलेले आहेत.
जनतेचे अज्ञान दूर केल्याशिवाय कोणतीही चळवळी यशस्वी होऊ शकत नाही. संतांना साहित्यातून सामाजिक चळवळ उभी करायची असल्यामुळे त्यांना ज्ञानाचे आणि ज्ञानप्रसाराचे महत्त्व पटलेले होते. वर्णव्यवस्थेने ज्ञानाचे दरवाजे मूठभर उच्चवर्णीयांसाठीच खुले ठेवल्यामुळे बहुजन समाज शतकानूशतके अज्ञानातच खितपत पडला होता. विषमता, दारिद्र्य आणि सामाजिक अस्थैर्याला बहुजनांचे अज्ञानाच कारणीभूत आहे हे संतानी ओळखले होते. म्हणूनच ज्ञानाची कवाडे सर्वांसाठी खुली करण्याचा त्यांनी प्रभावी प्रयत्न केला. एकूण काय तर बुरसटलेल्या व्यवस्थेत मोकळेपणा आणि उत्साह निर्माण करण्याचा संतांनी प्रयत्न केला. पण आज उलट संतांनाच जातीमध्ये कोंबण्याचा निर्लज्ज प्रकार काही मंडळी करत आहेत. संतांचे योगदान फार मोठे आहे .हा लोकजागर फार मोलाचा आहे. संतांनी कर्मयोग आणि नीती विचार, शिक्षणाचे महत्व, उपजीविकेसाठी रोजगार, पर्यावरणाचा जागर, मनाची निर्मळता,विचारांची शुद्धता,वाढती लोकसंख्या, जातपात विरहित मानवतावाद, विवेक वाद,अंधश्रद्धा निर्मूलन, सर्वांगीण परिवर्तन असे अनेक विचार मांडले आहेत. ते आषाढीच्या वारीच्या निमित्ताने आपण जपले पाहिजेत व पुढे नेले पाहिजेत. संतांच्या विचारांची पालखी पुढे नेणे, त्याचा वाहक बनणे हा खरा वारकरी धर्म आहे. तोच खरा वारीचा अर्थ आहे.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)