शहीद स्टॅन स्वामी यांच्या तिसऱ्या पुण्यतिथी समयी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करताना


प्रेस मीडिया लाईव्ह :

परंतु आम्ही लढत राहू अखेरच्या क्षणापर्यंत

आणि ते केवळ स्वत:ची कातडी बचावण्यासाठी नसेल

ते असेल सत्तेला सत्य सुनावण्यासाठी

तुमचे विचार आणि तुमच्या भावना असतीलच आमच्या पाठीशी

- स्टॅन स्वामी : प्रकाश, आशा, प्रेम - नवयुगाची नांदी  

५ जुलै २०२१ रोजी मृत्यूला जवळ करण्याच्या तीन महिने अगोदर स्टॅनने लिहिलेल्या या ओळी त्याच्या दुर्दम्य आशावादाची साक्ष देत आज तीन वर्षांनी आम्हाला प्रेरणा देत आहेत. 

त्याच्या कवितेची शेवटची ओळ जनआंदोलनांना एकत्र येण्याचे, एकजूट साकारण्याचे आवाहन करते. शासनाच्या धोरणांनी नाडलेल्या आणि पोटापाण्यासाठी झगडणाऱ्या विविध समाजस्तरांशी संवाद साधण्याची त्याची वृत्तीच त्या सत्ताधीशांना खुपू लागली. परंतु अगदी शेवटच्या श्वासापर्यंत स्टॅन गरिबातल्या गरिबाची बाजू घेत प्रस्थापितांना आव्हान देत अढळ राहिला. आदिवासींच्या हक्‍कांच्या रक्षणासाठी लढणाऱ्याला जर ‘देशद्रोही’ म्हणणार असाल, तर खुशाल म्हणा! 

ज्या जगात आपण राहतो, त्या जगाची तौलनिक चिकित्सा जनता करू शकते, यावर स्टॅनचा जो ठाम विश्वास होता, त्यामागे ब्राझिलियन धर्मगुरु व शिक्षणतज्ञ पावलो फ्रेरे यांच्या मूलगामी अध्यापनशास्त्राचा व अभ्यासाचा असलेला प्रभाव होता. तामिळनाडू येथील एका उच्चवर्णीय जमीनधारक कुटुंबातील मूल्यांशी बांधिलकी मानणारा एक सहृदय तरुण या नात्याने जेझुइट पंथाशी जोडून घेत असताना स्टॅनवर प्रारंभिक काळात पेरियार रामस्वामी नायकर यांच्या वाढत्या प्रभावाखाली जातिविरोधी, अस्पृश्यताविरोधी चळवळींचे सामाजिक संस्कार झाले. 

हा तरुण जेझुइट नम्र होता, स्वत:ला लोकांपेक्षा जास्त शहाणा न समजता लोकांकडून शिकू बघत होता, त्यांच्यात मिसळून त्यांना समजावून घेऊ पाहत होता. यामुळे एका बाजूने तो जनतेत प्रिय झाला; तर दुसरीकडून प्रस्थापितांशी, त्याचबरोबर चर्चशी त्याचा संघर्ष होणे अटळ होते.  वनाच्छादित पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील चैबासा गावातील जेझुइट समुदायामधील धर्मगुरु होण्यासाठीचा अभ्यास  व तयारी यांच्या प्रदीर्घ प्रवासात त्याची भेट रॉब कॅरी या कट्टर अमेरिकन जेझुइटाशी झाली, ज्याने त्याला अमेरिकेतील मार्टिन ल्यूथर किंग यांच्या नेतृत्वाखालील ब्लॅक नागरी अधिकारांच्या चळवळीची माहिती दिली.  रॉब कॅरी समवेत स्टॅनला त्या भागाच्या वसाहतीकरणाचा सखोल अभ्यास करायला मिळाला आणि त्याबरोबर तेथील बहुतांश हो वंशीय  असलेल्या स्थानिक रहिवाशांची (आदिवासींची) प्रतिक्रिया समजून घेता आली. फिलिपीन्समधील अतिनिऑ द मनीला विद्यापीठात चार वर्षे थिऑलॉजीचा अभ्यास करताना व नंतर सॉशिऑलाजीमध्ये मास्टर्स करताना त्याचा संबंध अशा जेझुइटांशी आला, जे गरिबांचे जिणे समजून घेण्यासाठी गरिबांच्या वस्तीत जाऊन राहत होते. तसे केल्याने त्यांना गरिबी आणि त्यातून उद्‌भवणारी विषमता यांना चिवटपणे टिकवून ठेवणाऱ्या प्रक्रिया लक्षात आल्या, ज्याची अभिव्यक्‍ती कोरडी आकडेवारी आणि व्यामिश्र आलेख यांमधून शक्यच नव्हती. फिलिपीन्समधील त्या संघर्षाचेच धर्मशास्त्र मानणाऱ्या क्रांतिकारी पाद्र्यांनी स्टॅनच्या मनावर खोल ठसा उमटवला आणि परतल्यावर तोसुद्धा झारखंडमधील हो आदिवासींमध्ये त्यांच्यातलाच एक होऊन राहू लागला.

झारखंडमधील आदिवासींमध्ये त्याने घालवलेला चार दशकांपेक्षा दीर्घ काळ म्हणजे खनिज संपत्तीने व तत्सम संसाधनांनी समृद्ध अशा भागात राहणाऱ्या गरिबांच्या हितासाठी जास्तीत जास्त लोकांनी एकत्र येण्याची गरज असल्याच्या त्याच्या खंबीर निर्धाराचीच साक्ष होय. पिळवणुकीची वैयक्‍तिक आणि सामूहिक काल्पनिक जाणीव, हाच समान धागा असलेल्या; परंतु त्याची जाणीव अजिबात नसलेल्या विभिन्‍न स्वरूपाच्या जनतेशी संवाद साधण्यासाठी त्याला एक नवी भाषा घडवावी लागली. त्या पीडित जनतेला आपल्या वैयक्‍तिक व सामूहिक परिस्थितीवर स्वबळाने मात करता यावी यासाठी त्या स्थितीला कारणीभूत असलेल्या सामाजिक-आर्थिक व राजकीय घटकांविषयी जागृती निर्माण करणाऱ्या शिक्षणाची गरज आहे, या बाबतीत स्टॅनचे आणि पावलो फ्रेरे चे एकमत होते. नाडलेल्या जनतेने जागृत होणे आणि स्वत:च्या जगामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी स्वत: कृतीशील होणे, या एकाच गतिमान प्रक्रियेद्वारे त्यांना माणसात आणता येईल. वेगळ्या शब्दांत सांगायचे, तर अभ्यासाची कृती हीच जगाशी संबंध ठेवण्याची वृत्ती आहे. 

समाजविष्लेषण या विषयावर प्रशिक्षण वर्ग चालवणाऱ्या बंगलुरूच्या इंडियन सोशल इन्स्टिट्यूट (आयएसआय) या संस्थेचा तो संचालक होता. तिथे, तसेच २००६ मध्ये बागाइचा येथे त्याने स्थापन केलेल्या संस्थेमध्ये कार्यकर्ते, विद्यार्थी, शिक्षणतज्ञ व बुद्धिमंत यांमध्ये सतत चर्चा चाले, कृतिआराखडा ठरवण्याची बोलणी होत. या ठिकाणी स्टॅनने शिक्षणाचीच (समाजविश्लेषण) एक कृती म्हणून जनजागृती करण्याची निकड विशद करताना सांगितले की ‘‘पोलीस लोकांना दंडुक्याने मारतात, त्यामुळे पोलीस हाच आपला शत्रू, असे मानण्याची त्यांची प्रतिक्रिया होते. तसे नाही, हे आपण त्यांना दाखवून दिले पाहिजे. पोलिसांच्या मागे प्रशासन असते, प्रशासनामागे सरकार आणि सरकारच्या मागे राज्यकर्ता पक्ष असतो, ज्याच्या मागे असतो भांडवलदार वर्ग. म्हणजेच खरा शत्रू कोण, हे ओळखण्यात आपण लोकांना मदत केली पाहिजे. तरच आपल्याला कृतीविषयी नेमके धोरण निश्चित करता येईल.’’

पददलितांना जागृत करण्यासाठी त्यांचे जग समजावून घेण्याचा हा प्रकार बहुआयामी आहे. स्टॅनचे लक्ष आदिवासी जीवनाच्या अनेकानेक पैलूंनी वेधून घेतले. हे पैलू म्हणजे, सामाजिक चळवळींचे परिवर्तन राजकीय पक्षांमध्ये कसे होते; आदिवासींना त्यांच्या स्वत:च्या भूमीतून हुसकावून देशोधडीला लावण्याचे विविध प्रकार; आदिवासींची जमीन आणि त्यांचे जंगल यांचे रक्षण करणारे वेगवेगळे कायदे, उदाहरणार्थ, पेसा कायद्यानुसार आदिवासींची जमीन ताब्यात घेण्यासाठी ग्रामसभेची मान्यता अनिवार्य आहे; वनहक्‍क कायद्याचे परिणाम; सुरक्षा दलांनी त्यांच्या निवासासाठी बळकावलेल्या शाळा; बंडखोरविरोधी कारवायांमध्ये आदिवासींच्या हातून इतर आदिवासींची हत्या घडवणे; दहशतविरोधी कायद्यांचा आदिवासींवरील परिणाम; न्यायदानाच्या स्थानिक प्रथांना गुन्हे ठरवणे आणि शालेय अभ्यासक्रमाद्वारे आदिवासींना हिंदू बनवण्याचा कार्यक्रम.

या सर्व प्रश्नांचा एकत्र विचार केल्यास भारतीय राज्यव्यवस्थेने मध्य व पूर्व भारतातील आदिवासींवर लादलेल्या विकासप्रारूपाची दारुण चिकित्सा हाती येते आणि केवळ बड्या भांडवलाच्या लाभासाठी जनतेचा बळी कसा दिला जात आहे, हे लक्षात येते. आदिवासींना न विचारता, त्यांची संमती न घेता ‘विकासा’च्या नावाखाली आदिवासींच्या जमिनी विकून टाकण्याकरिता तत्कालीन शासनाने अनेक कंपन्याबरोबर अनेक सामंजस्य करार (एमओयू)  केले आहेत (माहिती अधिकाराखाली २००६मध्ये मिळालेल्या आकडेवारीनुसार सुमारे ७४ एमओयू). देशभर मोठ्या प्रमाणावरील जमीन अधिग्रहण होत गेले आणि त्यामधून प्रचंड प्रमाणात स्थलांतर घडले आणि लोकांनी रोजगार गमावले. जमीन गमावणे, रोजगार गमावणे याचा अर्थ जगाशी असलेले नाते गमावणे, अस्तित्वाचा आधार गमावणे. स्टॅनने लवकरच विस्थापनविरोधी जनविकास आंदोलन (व्हीव्हीजेव्हीए) स्थापन केले, ज्याच्या रूपाने लोकांच्या संघटनांना एक देशव्यापी व्यासपीठ उपलब्ध झाले. या संघटना विस्थापनाविरुद्ध लढा तर देत होत्याच; त्याबरोबर विकासाचे एक पर्यायी प्रारूपदेखील मांडत होत्या. या प्रारूपामध्ये जनतेच्या हिताला केंद्रस्थान होते; त्यात पर्यावरणीय शाश्वतता होती, मध्यम उद्योगाला प्राधान्य देत शहरी व ग्रामीण यांमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न होता आणि संविधानाच्या पाचव्या अनुसूचीतील आश्वासनांना उचलून धरण्यात येत होते. विस्थापनाविरुद्ध लढ्याला बळ देत असताना विकासाच्या पर्यायी प्रारूपाची मांडणी केली जात आहे, असे प्रथमच घडत होते.

विस्थापनविरोधी लढा जसा तीव्र होत गेला, तशी अधिकाधिक तरुणांना अटक होऊ लागली आणि आदिवासी तरुणांवर नक्षलवादी, माओवादी असण्याचा शिक्‍का मारला जाऊ लागला. आदिवासी तरुणांना गुन्हेगार ठरवण्याच्या या कृतीमागे शेतकरीवर्गामध्ये राजकीय जागृती येण्याची भीतीसुद्धा होती. तुरुंगात छळ होत असलेल्यांची सुटका व्हावी, तसेच त्यांना कायदेशीर बचाव मिळावा यासाठी पर्सिक्युटेड प्रिझनर्स सॉलिडॅरिटी कमिटी (पीपीएससी) स्थापन करण्याचा स्टॅनचा प्रयत्न चालला होता. स्टॅन व त्याच्या सहकाऱ्यांनी शंभराहून अधिक खटल्यांचे  सर्वक्षण करून एक अहवाल प्रसिद्ध केला आणि दाखवून दिले की त्यांनी ज्यांच्याशी चर्चा केली होती, त्यांपैकी ९७ टक्‍के आरोपींचा माओवादाशी काहीही संबंध नव्हता. 

खोट्या आरोपांखाली अडकवलेल्या आदिवासींच्या मुक्‍ततेसाठीचा संघर्ष जसा आदिवासींच्या विस्थापनाविरुद्धच्या लढ्याबरोबर अधिकाधिक धारदार होत गेला, तसा निषेधाचा आणखी एक कल्पक प्रकार खुंटी जिल्ह्यातल्या २०० पेक्षा जास्त गावांमध्ये वणव्यासारखा पसरत गेला. ज्यांचा आकार कधी कधी १५ फूट उंच व ४ फूट रुंद इतका असे, अशा काँक्रीट शिळा रातोरात गावोगावी प्रकट झाल्या. या शिळा म्हणजे हो आणि मुंडा जमातींच्या प्राचीन परंपरेतील दफनशिला होत्या. आदिवासींची जमीन, त्यांचे जंगल आणि त्यांचा स्वयंनिर्णयाचा अधिकार यांच्या रक्षणार्थ भारताच्या संविधानात असलेल्या तरतुदी त्यांच्यावर रंगवण्यात आल्या होत्या. त्याच वेळी ‘सार्वजनिक हिता’च्या मिषाने या ख्यातनाम संकल्पनेखालील ‘लँड बँक’ म्हणून आदिवासींच्या जमिनी औद्योगिक संस्थांना वाटून टाकण्याचा जोरदार प्रयास सरकारकडून चालला होता. पाताळगढी आंदोलन या नावाने प्रसिद्ध झालेले हे काँक्रीट शिळांचे आंदोलन म्हणजे आदिवासींच्या हिताचे रक्षण करण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा जाहीर पंचनामाच होता. पाताळगढी आंदोलनाला जोर चढत गेला, लोक जास्त लढवय्ये होऊ लागले आणि सरकारी अधिकाऱ्यांना गावात येण्यास मज्‍जाव करू लागले. 

‘‘लिखित कायदा हा कोळ्याच्या जाळ्यासारखा असतो,’’ या शब्दांमध्ये स्टॅन आदिवासींच्या स्थितीचे नेमके वर्णन करत असे, ‘‘त्यात गरीब, दुबळे अडकतात; पण शक्‍तिशाली श्रीमंत ही जाळी सहजी तोडू शकतात.’’ परंतु त्या कोळिष्टिकामध्ये स्टॅनलाच अडकवण्याचे कारस्थान राज्यव्यवस्थेने केले. तरीही ते त्याची मुस्कटदाबी मात्र करू शकले नाहीत. ह्या मृदुभाषिक जेझुइटाचा मृत्यू मात्र खूप स्पष्टवक्‍ता ठरला. मृत्यूची प्रतिमा कधीच इतकी मृत्यूसमान नव्हती. स्टॅन स्वामीच्या मृत्यूनंतर झारखंडमधील बागाइचा येथे त्याच्या दफनशिलेला ५५वा आदिवासी हुतात्मा, अशी ओळख देऊन त्याच्या मित्रमंडळींनी त्याला श्रद्धांजली वाहिली. त्याचा यापेक्षा मोठा सन्मान तो कोणता होणार होता? ज्या कोळिष्टिकांमुळे त्याची वाणी कायमची शांत होण्याची अपेक्षा होती, तसे न होता त्याची स्मृती आदिवासींच्या जीवनात कायमची कोरली गेली. 

‘‘चर्चच्या भिंती ओलांडून आदिवासी होऊन गेलेला एक पुजारी’’ जो त्यांच्यातला ५५वा हुतात्मा ठरला!

त्या हुतात्म्याच्या स्मृतीला अभिवादन म्हणून आम्ही बीके-१६, ५ जुलै २०२४ या दिवशी उपोषण करणार आहोत.  या दिवशी एकत्र येऊन समाजाच्या जास्तीत जास्त स्तरांमध्ये त्याची स्मृती न्यावी, असे आपणा सर्वांना आम्ही आवाहन करतो. 

Post a Comment

Previous Post Next Post