पर्व निर्माण करणारे संपादक गोविंद तळवळकर


प्रेस मीडिया लाईव्ह ,:

प्रसाद माधव कुलकर्णी  (९८ ५०८ ३० २९०)

५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट

समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी

ता.हातकणंगलेे जि .कोल्हापूर

पिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)

prasad.kulkarni65@gmail.com


२२जुलै पासून ख्यातनाम विचारवंत संपादक व ज्येष्ठ पत्रकार कालवश गोविंद तळवळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे.२२ जुलै १९२५ रोजी डोंबिवलीत जन्मलेले गोविंदराव २२ मार्च २०१७ रोजी अमेरिकेत कालवश झाले. स्वातंत्र्योत्तर काळात मराठी वृत्तपत्र सृष्टीत संपादक या नात्याने आपला अफाट ठसा उमटवणारे, प्रचंड व्यासंगामुळे आपला आदरयुक्त दबदबा निर्माण करणारे आणि राज्यकर्त्यांपासून सर्वसामान्य माणसांपर्यंत गांभीर्याने व आस्थेने वाचले जाणारे ,विचारवंत अभ्यासक यांनाही सतत नवा  विचार देणारे पत्रकार म्हणून गोविंद चळवळकर यांचा उल्लेख करावा लागेल. एक प्रदीर्घ आणि यशस्वी कारकीर्द त्याने अक्षरशः गाजवली. शेवटची काही वर्षे ते अमेरिकेतच होते आणि अखेरपर्यंत लिहीत होते.


गोविंद तळवळकर यांचा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि संस्कृतिक अशा सर्वच विषयांचा सूक्ष्म अभ्यास होता. नवभारत पासून पत्रकारितेची सुरुवात करून त्यांनी लोकसत्ता मध्ये बारा वर्षे आणि महाराष्ट्र टाइम्स मध्ये सत्तावीस वर्षे संपादक म्हणून काम केले. उत्तम कवितांपासून दर्जेदार शास्त्रीय संगीतापर्यंत सर्व कलांचा मनमुराद आस्वाद घेणारे गोविंदराव तळवळकर हे अतिशय उंचीचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्यावर मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांचा पगडा होत आहे खरे. पण नामदार गोखल्यांपासून पंडित नेहरू पर्यंत आणि न्यायमूर्ती रानडे यांच्या पासून दादाभाई नौरोजी यांच्या पर्यंत साऱ्यांवर त्यांनी केलेले लिखाण ,तसेच भारत आणि जग या संदर्भात त्यांनी विविध अंगाने केलेले लिखाण  महाराष्ट्राच्या विचारविश्वात उच्च संदर्भ मूल्यांचे लेखन म्हणून सर्वमान्य आहे. त्यांच्यावर हस्तिदंती मनोऱ्यातील संपादक अशी टीकाही काहींनी केली. पण तळवळकरांनी टीकाकारांची तमा बाळगली नाही आणि उत्तरेही दिली नाहीत .आपले व्यासंग पूर्ण लेखन हेच काळाने निर्माण केल्याने प्रश्नांना उत्तर देण्यास समर्थ आहे अशी धारणा त्यांनी मनी बाळगली असावी. महाराष्ट्राच्या किमान तीन पिढ्यांचे वैचारिक भरण पोषण करून त्यांना मार्गदर्शन करण्यात गोविंदराव तळवळकर यांचे योगदान मोठे आहे. पाश्चात्य साहित्य ,संस्कृती, राजकीय विचार ,कला जाणीव या साऱ्यांची ओळख मराठी माणसाला दैनिकाद्वारे करून देण्याची सुरुवात ही त्यांनीच केली होती. आपल्या वृत्तपत्र कचेरीतील संपादकीय विभागातील सर्वांनी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रे ,नियतकालिके वाचली पाहिजेत, किमान चाळली पाहिजेत यावर त्यांचा कटाक्ष असायचा. अनेक पत्रकारांना ते अनेक पुस्तके वाचनासाठी सुचवत असत. तसेच मराठी वाचकालाही सातत्याने सजग करण्याचे काम त्यांनी केले. सर्व राजकीय पक्षांच्या दिग्गजांशी त्यांची मैत्री होती. त्यांच्या विद्वत्तेबद्दल या नेत्यांनाही आदर होता. पण त्याचा लाभ घेऊन राज्यसभेची उमेदवारी मिळवावी असे त्यांना कधीही वाटले नाही. त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली असती तर ते अनेक वर्षे त्या सभागृहात असते. पण तळवळकर अशा संकुचित विचारांचे नव्हते त्यांची वैचारिक शिस्त फार मोठी होती. आणि त्या शिस्तीला एक तळवळकरी उंची होती.


तळवळकरांनी सभासंमेलने ,व्याख्यानमाला यातून व्याख्यान देणे कटाक्षाने टाळले. मुळात त्यांचा स्वभाव बोलघेवडा नव्हता.वाचनासह साऱ्या बाबतीतच कठोर शिस्त पाळणाऱ्या गोविंदरावाना अतिरिक्त बोलणे ,सातत्याने गप्पांचा फड रंगवणे म्हणजे वाचनाचा पर्यायाने ज्ञानार्जनाचा वेळ  वाया घालवल्यासारखे वाटत असे. भाषणाचे शब्द हवेत विरून जातात पण लेखन कायमस्वरूपी टिकून राहते असे त्यांचे मत होते.ते अखेरपर्यंत त्यांनी पाळले. फर्डे वक्ते म्हणून अनेकांनी पाच, दहा, वीस, तीस वर्षाची कारकीर्द गाजवली असेल पण ते नव्या पिढीच्या स्मरण्यात राहिल्याचे दिसत नाही. तळवळकरांचे लेखन मात्र कालही गांभीर्याने वाचले जायचे , आजही वाचले जाते आणि उद्याही वाचले जाईल यात शंका नाही. त्यांचे लेखन तर्ककर्कश नव्हते तर तर्कशुद्ध होते.दैनिकांबाबत प्रथम बातम्या वाचणे व नंतर वेळेनुसार अग्रलेख वाचणे असा सर्वसाधारण क्रम असतो. पण तळवळकरांनी हा क्रम लोकांना आपसूक उलटा करायला लावला. सकाळच्या पहिल्या चहा बरोबर तळवळकरांचा अग्रलेख वाचणे हा परिपाठ हजारो वाचकांनी वर्षानुवर्षे सांभाळला. इतकी ताकद त्यांच्या संपादकीयत होती. भारताचा इतिहास, भारतीय स्वातंत्र्यलढा ,भारतीय राज्यघटना यातून आलेली मूल्यव्यवस्था ते सातत्याने मांडत राहिले.त्यांनी अनेक इंग्रजी नियतकालिकातूनही सातत्याने चार दशके लेखन केले होते.


तळवळकरांसारख्या दिगज माणसाला भेटण्याची ऐकण्याची बोलण्याची संधी न मिळाल्याची हळूहळू अनेकांना वाटते. तशीच मलाही. पण गोविंद तळवळकर या नावाचे जे काही लेखन लेख अथवा ग्रंथरूपाने प्रकाशित होत असे ते आपण वाचलेच पाहिजे असा दंडक स्वतःला ज्या अनेकानी घालून घेतला आहे त्यापैकी एक होण्याचे मात्र मी बऱ्याच वर्षांपूर्वी ठरवलेले होते व ते जास्तीत जास्त पाळता आले याचेही समाधान आहे .त्यामुळे काही मते पटोत अगर न पटोत पण  तळवळकर वाचणे महत्वाचे आहे. तवळकरांच्या मताशी सहमत न होणारा वर्गही मोठा होता व आजही आहे. पण त्यांनाही तळवळकर यांच्या लेखनातून अनेक गोष्टी ज्ञात व्हायच्या हे नक्की. त्याला कारण त्यांचा अफाट व्यासंग हे होते.ग्रंथ वाचायला वेळ नाही असे म्हणणाऱ्यांना ते खोटे बोलणारे म्हणत. कारण त्यांच्या मते देशाचे पंतप्रधान पंडित नेहरू एवढे कामात व्यस्त असूनही दररोज ग्रंथाची ५०/१०० पाने वाचू शकतात तर इतरांनी वेळेची सबब सांगूच नये. खुद्द तळवळकरांनी वाचनासाठी फार मोठा वेळ दिला .अग्रक्रम कशाला द्यायचा हे त्यांनी या क्षेत्रात येण्यापूर्वी ठरवलेले असावे .म्हणून तर ते इतके मोठे कर्तृत्व करू शकले. अशा या प्रगल्भ व्यासंगी संपादकाला जन्मशताब्दी निमित्त विनम्र अभिवादन...!


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post