डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी :अवलिया आनंदयात्री

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०)

५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट,समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी      

ता. हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) 

prasad.kulkarni65@gmail.com


आदाब मोहब्बत के सिखाये नही जाते 

मकतब तो कही इश्क के पाये नही जाते..

उस राहसे क्यों हमको उठाया नही मालूम

जिस रह से पत्थर भी उठाये नही जाते..

 ये तेरी कशिश है के मेरे दिल कि सदा है

बेवजह गीत कही सुनाये नही जाते...

होटोंका तबस्सूम या निगाहोंके इशारे 

ये बोझ अभी हमसे उठाये नहीं जाते...


अर्थात, प्रेमाचे रीती रिवाज कुठे शिकवले जात नाहीत.शाळा कॉलेजमधून त्याचे प्रशिक्षण मिळत नसते.ते स्वतः प्रेमात पडूनच शिकावे लागतात. ज्या वाटेवरून दगड देखील बाजूला केले जात नाहीत त्या वाटेवरून मला हाकलून लावले गेले.ही तुझ्याबद्दलची ओढ म्हणावी की माझ्या हृदयाची आर्तता म्हणावी काय ते कळत नाही.कारण विनाकारण कधी कोणी गाणे ऐकवत नाही ' यासारखे अनेक उत्तमोत्तम शेर लिहिणारे डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी यांचा २२ जुलै हा स्मृतिदिन. २४ डिसेंबर १९२९ रोजी जन्मलेले नाडकर्णी सर  २२ जुलै २०११ रोजी कालवश झाले.


एक माणूस जीवनाच्या किती विविध क्षेत्रात संचार करू शकतो आणि त्यामध्ये महत्तम कामगिरी करू शकतो याचे मूर्तीमंत  उदाहरण म्हणजे नाडकर्णी सर होते. विज्ञान ,क्रीडा, शिक्षण ,गझल, लेखन अशा अनेक क्षेत्रात त्यांनी मुशाफीरी केली. डॉ.नाडकर्णी हे मूळचे नाशिकचे. त्यांचा जन्म ,शालेय शिक्षण तेथेच झाले. त्यानंतर पुण्याच्या एसपी आणि वाडिया कॉलेजमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. एमएससी पदवी घेतल्यानंतर त्यांनी वाडिया कॉलेजमध्ये तब्बल  चाळीस वर्षे प्राणीशास्त्राचे अध्यापन केले.विद्यापीठातही त्यांनी शिकवले. त्यांनी सर्प व कीटकांवर संशोधनही केले होते. तसेच प्राणीशास्त्रावर  त्यांनी पंधराहून अधिक पुस्तकेही लिहीली.


काव्य,क्रीडा ,संगीत आदी कलांची आवड त्यांच्यात परंपरेने भिनली होती. त्यांच्या घरात क्रीडापटूंचा आणि कलावंतांचा राबता होता. ख्यातनाम गायक डॉ. वसंतराव देशपांडे या महान कलावंताचा सहवास त्यांना लहानपणापासूनच लाभला. त्यातून त्यांचे गीत, संगीत , गझल प्रेम वाढले. नामवंत उर्दू शायर व त्यांच्या शायरीचा परिचय करून देणारे त्यांचे 'गजल 'हे पुस्तक त्यांनी वसंतरावंनाच अर्पण केले आहे.त्याच्या अर्पण पत्रिकेत ते म्हणतात 'आयुष्यभर ज्या आवाजाने मोहिनी घातली होती तो आवाज आता अनंतात विलीन होऊन गेलाय. आणि त्यांच्या केवळ आठवणीने पावलोपावली अडखळायला होतेय .'नाडकर्णी सरांची बेगम अख्तर यांच्या पासून सुरेश भटांपर्यंत अनेक दिग्गजांशी अतिशय दृढ मैत्री होती.'उर्दू गजल  ' हा त्यांच्या डॉक्टरेटचा विषय होता.गायन क्षेत्रातही त्यांना विलक्षण गती होती. अनेक जुन्या ,दुर्मिळ अनवट चिजांचा त्यांच्याकडे संग्रह होता. ते तबला सतार व जलतरंग वादनही करत असत.अनेक हिंदी गीतांचे रसग्रहणही त्यांनी लिहिले. आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठी अनेक लघुपटांचे लेखन त्यांनी केले होते.


नाडकर्णी सर उत्तम क्रीडा समालोचक होते. त्यांनी अनेक कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यांचे मराठी, हिंदी,उर्दू आणि इंग्रजी या चारही भाषेतून अस्खलितपणे समालोचन केले. महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन ,महाराष्ट्र खोखो असोसिएशन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अशा अनेक संघटनांवर त्यांनी पदाधिकारी म्हणून काम पाहिले. केंद्र सरकारचे ते क्रीडा सल्लागार होते. बॅडमिंटन, क्रिकेट, हॉकी,खोखो, कबड्डी , मल्लखांब,टेनिस, ब्रिज या खेळात  ते विद्यार्थी दशेपासून प्रवीण होते. तसेच ते नवोदित कवी, गझलकारांचे मार्गदर्शक होते, प्रेरणास्त्रोत होते.उत्तम दर्जाचे छायाचित्रकार असणाऱ्या नाडकर्णी सरना शिकारीचीही आवड होती. ते पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे जनक म्हणून ओळखले जातात.पुण्यामध्ये गादीवरील कुस्ती या आधुनिक क्रीडा प्रकाराची सुरुवातही त्यांनीच केली.


नाडकर्णी सरांनी विविध विषयांवर सखोल लेखन केले.गझल ,पृथ्वीवर माणूस उपराच, मानवाची उत्पत्ती ,अज्ञानाचे विज्ञान, उंबराचे फुल, सुखी माणसाचा सदरा, मुलगा वयात येताना , नॅस्त्रोडेमासची भविष्यवाणी, ऍथलेटिक्समधील सुवर्णपदकाच्या दिशेने, क्रीडा ज्ञानकोश, पृष्ठवंशीय प्राणी आदी पुस्तकांच्या नावावरून त्यांच्या प्रतिभेचा संचार किती व्यापक क्षेत्रात होत हे लक्षात येते. मैदानापासून शायरी पर्यंत आणि विज्ञानापासून संगीतापर्यंत सर्व प्रांतातले सौंदर्य टिकणाऱ्या आणि त्यात रममाण होणारा एक महान शायर संशोधक म्हणजे नाडकर्णी सर. सौंदर्याच्या ज्ञानसागरात डुंबणे हे त्यांचे जीवन चक्र होते. हा शायर अविवाहित होता पण एकाकी नव्हता .कारण सर्व अर्थाने ज्याला आनंदयात्री म्हणतात असा हा अवलिया माणूस होता. विविध क्षेत्रात उंचीचे काम करूनही त्यांच्या व्यक्तिमत्वातील ऋजुता, नम्रता अविस्मरणीय स्वरूपाची होती.


माणूस म्हणून त्यांनी अनेकांच्या आयुष्यात आपली मुद्रा उमटवली. समर्पण वृत्तीचे मन त्यांनी जोपासलेले असल्यामुळे कोणत्याही चौकटीत न अडकता क्षितिजासारखे त्यांचे जीवन ज्ञानप्रवाही राहिले. १९६०च्या आसपास प्रा.दस्तगीर शेख यांच्यापासून प्रेरणा घेऊन नाडकर्णी सर गझलेकडे वळले. पन्नास वर्षाच्या काळात त्यांनी अनेक उत्तम उत्तम उर्दू रचना केल्या.गझलच्या प्रसाराचे व प्रचाराचे मोठे काम त्यांनी केले.अनेक नवोदिताना मार्गदर्शन केले. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी उर्दू कवितेतील देशप्रेम अर्थात 'हुब्बे वतन का जलवा ' या प्रबंधाला पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती ही पदवी मिळालेली होती.

 वास्तविक संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश आणि मराठी विश्वचरित्रकोशा मध्ये प्रा.डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी यांची नोंद घ्यायला हवी होती पण ती घेतली गेली नाही असे दिसते. या कोशांच्या पुढील आवृत्तीत त्यांचा समावेश व्हावा ही अपेक्षा आहे.


पाऊस ठिबकतो भरलेले आभाळ

 ओढीत डीत पावले सरली सायंकाळ..

 तू सुरेश वेड्या कुठवर बघशी वाट 

ना कुणाचसाठी कधी थांबतो काळ...


असे लिहिणाऱ्या नाडकर्णी सरांचा व माझा परिचय सुरेश भट यांच्या समवेत एकाच दिवशी १९८५ साली झाला. नाडकर्णी सरांशी अखेरपर्यंत माझा स्नेह  होता. माझी गझलांकित व गझलसाद हे दोन्हीही संग्रह आवडल्याचे त्यांनी सांगितले होते.कलांवर निवडक उर्दू हिंदी गझलकारांची गझलेसह ओळख करून देणारा माझा ' गझलानंद 'हा संग्रह २०१४ साली प्रकाशित झाला तो मी नाडकर्णी सरांनाच अर्पण केलेला होता. नाडकर्णी सर एका गझलेत म्हणतात,


मौसम था जरनिगार अभी कल की बात है 

मिलते थे बार बार अभी कल की बात है ..

मेरी वफा से बढकर जहा मे वफा नही

उनको  था ऐतबार अभी कल की बात...

 एक हम ही न बेकरार थे उनकी याद मे 

वो भी थे बेकरार अभी कल की बात है...

एक तुम नहीं तो कोई भी अपना नहीं रहा

दुनिया थी गमगुसार अभी कल की बात है....

नाडकर्णी सरना जाऊनही आता एका तपानंतरच एक वर्ष झाले आहे. पण त्यांची आठवण सतत येत असते. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन...!


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post