इंदिरा संत : अस्तित्वभानी उद्गार


प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी

 (९८ ५०८ ३० २९०)५३६/१८, इंडस्ट्रियल इस्टेट समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूर पिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com


रक्तामध्ये ओढ मातीची 
मनास मातीचे ताजेपण
मातीतून मी आले वरती 
मातीचे मम अधुरे जीवन...

किंवा

पेट घेई मध्यरात्र 
पेटे काळोखाचे जळ 
 दिवसाच्या राखेमध्ये
 उभी तुळस वेल्हाळ..


अशा मानवी मनाच्या हिंदोळ्यांच्या असंख्य कविता लिहिणाऱ्या भावकवयित्री इंदिरा संत यांचा शनिवार ता.१३ जुलै हा स्मृतिदिन.४ जानेवारी १९१४ रोजी इंडी येथे जन्मलेल्या इंदिरा संत १३ जुलै २००० रोजी बेळगाव येथे कालवश झाल्या. त्यांना बालपणापासून लेखनाची आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षापासून म्हणजे १९३२ पासून त्या जाणिवेने लेखन करू लागल्या. त्यांचे वडील मामलेदार होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांचे बालपण तवंदी या गावी गेले. त्यांचे शिक्षण बेळगाव,कोल्हापूर, पुणे येथे झाले.मराठी आणि मानसशास्त्र या विषयांच्या अध्यापिका म्हणून त्यांनी काम केले. पुण्यामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना त्यांचा लघुनिबंधकार ना.मा.संत यांच्याशी परिचय झाला. त्यांचा१९३६ साली प्रेम विवाह झाला. त्यांना प्रकाश व रविंद्र ही दोन आपत्ये झाली. या उभयतांचा ' सहवास ' हा काव्यसंग्रह १९४१ साली प्रकाशित झाला. एका कवितेत त्या म्हणतात,


झिमझिम पाऊस आभाळ भरून

 शिरशिर गारवा ,वारा भरून

 कातरवेळा, अंधारभरून

मिणमिण दिवे, सांवल्याभरून ,

मुके घर, दालन दालन

मुके तन,मुके मन 

मुके काहूर,इथून तिथून

 मुका ताण ,पदरभरून...


ना.मा.संत यांच्या १९४६ साली झालेल्या अकाली निधनानंतर इंदिरा संत यांच्या काव्य लेखनात एकटेपणाची भाववृत्ती मोठ्या प्रमाणात येत राहिली. या कविता विरहाचाही तरल व अंतर्मुख अनुभव देणाऱ्या आहेत. इंदिरा संत यांचे शेला, मेंदी,मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, मृण्मयी , चित्कळा , गर्भरेशीम ( १९८३ चे साहित्य अकादमी पारितोषिक),वंशकुसुम,निराकार आदी काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच मृदगंध हे आत्मकथन, कदली आणि चैतू हे कथासंग्रह त्यांनी लिहिले. मालनगाथा या नावाने स्त्रियांच्या ओव्यांचे संपादन त्यांनी दोन खंडात केले. इंदिरा संत यांनी ललित लेखन ,कथालेखनही केले असले तरी प्रामुख्याने त्या कवयित्री म्हणून ओळखल्या जातात.


भूतकाळात अनुभवलेल्या जाणिवा वर्तमानामध्ये शब्दबद्ध करणे, त्याची काव्यरुपी मांडणी करणे इंदिरा संतांच्या कवितेचे वैशिष्ट्य राहिलेले आहे. एक स्त्री सुलभ साधेपणाची आणि सात्विकतेची रचना त्या करताना दिसतात. त्यांची कविता मानवी सत्विकतेचा उद्गार आहे. ही मांडणी अतिशय साधी, सोपी, स्वाभाविक प्रांजळ आणि संवादशील वाटते. त्यांच्या कवितेतील प्रतिमा आणि शब्दकळा या माणसातील नैसर्गिकता आणि निसर्गातील मानवता दाखवताना नुसता. त्यांच्या कवितेत रूप,गंध,नाद ठळकपणे आविष्कृत होतात. त्यांच्या कवितेतून येणारी आत्मानुभूती समर्थपणाने भिडते. अर्थात ही आत्ममग्नता काहीवेळा या कवितेची मर्यादा ठरल्याचेही दिसून येते.मानवी अस्तित्वाबद्दलचे चिंतन त्यांच्या कवितेतून सातत्याने येत असले तरी त्यांची कविता त्याचत्याचपणातून कंटाळवाणी होत नाही हेही महत्त्वाचे आहे. त्यांची कविता ही स्वतःचे छंद जोपासत आणि आकारत होते. केशव मेश्राम यांनी त्यांच्या कवितेबद्दल म्हटले आहे,' जीवनातील स्वास्थ्यापेक्षा संघर्षावर श्रद्धा असणाऱ्या इंदिराबाईंनी लिहिलेली भावकविता ही मराठी साहित्याला लाभलेली अनमोल देणगी आहे. स्वानुभवाचा संयत पण रेखीव अविष्कार हे त्यांच्या कवितेचे लक्षणीय वैशिष्ट्य होय.स्वतःची सुखदुःखे, प्रक्षोभ, कुंठीतावस्था चित्रित करताना लवलवत्या प्रतिमासृष्टीला आकार देण्याचे सामर्थ त्यांच्या प्रतिभेत असल्यामुळे त्यांच्या सर्व संग्रहातील कविता भावकव्याचा निरामय ठसा रसिक मनावर उमटवतात. तसेच त्यातून एका प्रदीर्घ काव्यप्रवासाची भाव कहाणीही प्रकटत जाते.'एका कवितेत त्या म्हणतात, 


अलीकडे अलीकडे असे होते 

 आकाशवाणीवरील वार्ता 

 कोणाच्या जीवनाचा पूर्णविराम देऊन थांबते.

 पूर्णविराम.

 आदरणीयांचा, स्नेह्यांचा, जिवलगांचा, कुणाकुणाचा.

मनाची वीज बंद पडते.

सगळ्या भूतकाळाचा हुंदका एक आवंढा गिळून टाकतो.


 उगीचच आठवते लग्नातील जेवणावळ..

पानावरून उठून जाणारी माणसे, आणि

 हे संपव ते संपव करीत रेंगाळणारी मी...

 तसेच हे काही...

भान येते तेव्हा मी राहुल देवच्या स्वरकल्लोळात

मला झोकून दिलेले असते.


पॉप्युलर प्रकाशनने इंदिरा संत यांच्या जन्मशताब्दी वर्षात म्हणजेच २०१४ साली इंदिरा संत यांची समग्र कविता एकत्रित प्रकाशित केली. या साडेआठशेहून अधिक पृष्ठांच्या संग्रहाला ज्येष्ठ कवित्री अरुणा ढेरे यांची चाळीस पृष्ठांची प्रस्तावना आहे. तिचं शीर्षक ' जीवनाविषयीच्या ओल्या उमाळ्याची कविता 'असे आहे. ज्येष्ठ लेखक+समीक्षक माधव आचवल यांनी या पुस्तकाच्या मलपृष्ठावर इंदिराबाईंच्या कवितेवर नेमकं भाष्य केला आहे. ते म्हणतात, इंदिराबाईंच्या व्यक्तिमत्वाने तोललेली त्यांच्या काव्याची कमान ही स्मृतीतील भूतकाळ आणि भविष्यातील जीवनाचा अंत यांना जोडीत असताना या विस्तृत कालभागाबरोबरच तितकाच विस्तृत भाग व्यापून जाते. त्या एकीकडे लहानशा अगदी लहानशा घटनेतील अनुभवाच स्पंदन पकडतात.पण ते सापडल्यानंतर मात्र पसरून देतात. क्षितिजापासून क्षितिजापर्यंत भावनाशयाच्या सूक्ष्म सूक्ष्मतर होत जाणाऱ्या जाणिवेच्या अभिव्यक्तीला रंगमंच मिळतो, तो मात्र सारं विश्व सामावून घेणाऱ्या अवकाशाचा. आपल्या लहानशा वास्तूविश्वात वर्तमानाच्या पिंजऱ्यात अडकलेल्या या व्यक्तिमत्त्वाला मग कधी न सापडणाऱ्या अथांग अवकाशाची आस लागते.या अथांगपणात स्वतःला विलीन करण्याचा ध्यास लागतो. स्थलकालाच्या अखंडपणाची व अथांगपणाची जाणीव आणि व्यक्तिमत्त्वाच्या मर्यादा यात मग संघर्ष सुरू होतो. हे व्यक्तिमत्व मग बंधनाची, एकलेपणाची जाणीव सोशीत राहते. आणि या जाणिवेची व्यथा मग शब्दात उतरते. इंदिराबाईंच्या कवितांना वाचताना वाटत राहतं ,कालाची अशी जाणीव पूर्वी कधी झाली नव्हती. अवकाश इतक्या निकटतेने कधी जवळ आलं नव्हतं. आणि दोन अनादी अनंत परिणामांच्या कैचीत सापडलेल्या जीवाचं असे एकाकीपण पूर्वी कुठे बघितलं नव्हतं.वेदनेला अशी वाचा कधी मिळाली नव्हती.केवळ अस्तित्वाचा असा भयंकर थकवा कधी आढळला नव्हता. आणि या साऱ्यांनाच पोटात घेऊन पसरलेला असा भयाण काळोख पूर्वी कधी पाहिला नव्हता.'एका कवितेत त्या म्हणतात,


गेलेली वर्षे एकमेकांची, जाळीदार सावल्यांची 

 रंगदार उन्हांची, दाटलेल्या वादळाची 

धो धो पावसाची.

गेलेली वर्षे एकमेकांची, खेळीमेळीची.


 घरकुलातील भातुकलींची. फुगडीच्या रंगणाची.

लिंबावरच्या झोपाळ्यांची.

 गेलेली वर्षी एकमेकांची, कुठच्या कुठे...

पोचलेल्या पाखरांच्या घोळक्याची...


अरुणा ढेरे यांनी इंदिरा संतांच्या कवितेबाबत म्हटले आहे, 'ही कविता म्हणजे एका स्त्री मनाची कविता आहे. एका अत्यंत संवेदनशील स्त्री मनाची ती निर्मिती आहे. चढणीवरचा झिळमिळ वारा ,कोसळणारी सागरलाट, गवतफुलाची प्रीतमाधुरी,अंगाराची तप्त विराणी हे सारे स्वतः मधून खेळणारी वसुंधराची इवली लाही अशी स्वतःची ओळख ज्याला झाली आहे असे हे स्त्रीमन आहे .हे मन मात्र सार्वत्रिकाला बिलगलेले आहे. प्रकृती पुरुषाच्या सनातन क्रीडेचे त्याला भान आहे. म्हणून एकूणच स्त्रीच्या भावजीवनाचे बिंब तिच्यात सदाचे उमटून राहिले आहे.'


 इंदिराबाईंचे इचलकरंजीशी आपुलकीचं नातं होत.कारण.महाराष्ट्रात नामवंत असलेल्या व दीडशे वर्षाची परंपरा असलेल्या इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिराचे सभासदत्व इंदिरा संतांनी स्वतःहून घेतलेले होते. वाचनालयाला देणगीही दिलेली होती. आपटे वाचन मंदिराच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांची प्रतिष्ठा मोठी आहे. त्यातील काव्यसंग्रहासाठीच्या पुरस्काराला ' इंदिरा संत काव्य पुरस्कार ' असे नाव दिले आहे. इंदिराबाईंच्या निधनानंतर गेली चोवीस वर्षे या रूपाने त्यांची स्मृती इचलकरंजीकर जपत आहेत. इंदिराबाईंना स्मृतिदिनी  विनम्र अभिवादन...!


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post