विरोधकांच्या कारखान्यावर 'अंकुश' ठेवण्याच्या मनसुब्याला 'सुरुंग'
वास्तव आणि रोखठोक-
संजय सुतार, नांदणी.
मो. 8600857207.
प्रेस मीडिया लाईव्ह :
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये उद्यानपंडित, सहकार महर्षी गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलने विरोधी गटाला 'चारी मुंड्या चित' करीत कारखान्यावर 'अंकुश' ठेवण्याचा प्रयत्न हाणून पाडला.
निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन, त्यांनी आपल्यातील असणारी नेतृत्व क्षमता, संयम, चिकाटी, काम करण्याची प्रचंड दुर्दम इच्छाशक्ती, सभासदांचे हित जपण्याची भूमिका आणि कारखान्याला एका नवीन उंचीवर नेण्याचे दाखवलेले स्वप्न, यावरती सभासदांनी पुन्हा एकदा 'विश्वास' दाखवत श्री दत्त साखर कारखान्याचे खरे 'दादा' हे गणपतराव पाटील हेच आहेत हे दाखवून दिले.
निवडणूक प्रचाराचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर गणपतराव पाटील यांनी लगेचच संवाद दौरा सुरू करून 118 गावातील सुमारे 30 हजार सभासदांना प्रत्यक्ष भेटीगाठीतून आपल्या सत्तारूढ गटाची भूमिका विषद केली. अल्पकाळामध्ये संवाद दौऱ्याचे काटेकोर नियोजन, वेळेवर जाऊन सभासदांशी संवाद, विरोधकांनी उपस्थित केलेल्या विस्तारीकरण, वाढीव शेअर्स रक्कम, कोजेन, मागील गाळप हंगामातील 100 रुपयांची मागणी, क्रमपाळीने ऊस तोडणी, अशा सर्वच आरोपावर सत्तारूढ गटाची असणारी भूमिका पटवून देण्यात गणपतराव पाटील यशस्वी ठरले.
महाराष्ट्रातील चार तालुके आणि कर्नाटक राज्यातील दोन तालुके असा विस्तार असणाऱ्या श्री दत्त कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सर्वच सभासदांची इच्छा होती. कारण गेल्या दहा वर्षात स्व. सा. रे. पाटील यांच्यानंतर कारखान्याची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेऊन गणपतराव पाटील यांनी आपल्या सहकारी संचालक मंडळाला सोबतीने घेऊन कारखान्याची प्रगती साधन्याची भूमिका कायम ठेवली. कारखाना कार्यक्षेत्रात सुमारे 10 हजार एकरावरती क्षारपड मुक्तीचे काम करून दादांनी 'क्षारपड मुक्तीचे जनक' या बिरूदावलीलाही अभिमान वाटेल असे काम केले आहे. या दहा हजार एकरातील आणि आगामी काळात होणाऱ्या सुमारे 15 हजार एकरावरील क्षारपड मुक्तीचे काम विचारात घेऊन श्री दत्त कारखान्याच्या विस्तारीकरणाची तयारी केली. सर्वसाधारण सभेत सभासदांकडून त्याला मंजुरी घेऊन शासकीय मंजुरीही मिळवली आणि अवघ्या आठ महिन्यात विस्तारीकरणाचे काम पूर्ण केले. यावर्षी पंधरा ते सोळा लाख मेट्रिक टनाचे उसाचे गाळप करून कारखान्याला नवी 'उर्जितावस्था' देण्याचे काम यातून होणार आहे.
आतापर्यंत कारखान्याने प्रत्येक गाळप हंगामात 14 दिवसानंतर लगेचच एफ. आर. पी. ची एकरकमी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. सप्लायर, कॉन्ट्रॅक्टर, ऊस तोडणी वाहतूकदार, मजूर या सर्वांची बिले वेळेवर अदा करणे असो अथवा कामगारांना पगार आणि बोनस वेळेवर देणे असो, कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम ठेवण्यात दादा यशस्वी ठरले आहेत.
कारखान्याच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या ऊस विकासाच्या योजना, दोनशे टन ऊस उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट, त्यासाठीचे संपूर्ण मोफत मार्गदर्शन, 65 शेती मदतनीसांची नेमणूक, पाणी, पाने, माती परीक्षणासाठी परदेशी मशिनरीची अद्ययावत व्यवस्था करून प्रत्यक्षात बांधावर जाऊन होणारी तपासणी, सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञान, तीन उसापासून एका एकरावरील लावण करण्याची पद्धत, पूर बाधित क्षेत्रात उसाव्यतिरिक्त आंबा, पेरू, लिची, चिक्कू, शुगर बीट लावणीला प्रोत्साहन, सेंद्रिय कर्ब वाढीसाठीचे प्रयत्न आणि संपूर्ण मार्गदर्शन, सेंद्रिय शेतीला आणि साखर निर्मितीला प्रोत्साहन, कार्यक्षेत्रातील विविध गावात शेतीतज्ज्ञ, शास्त्रज्ञांच्या चर्चासत्रांचे, परिसंवादाचे आयोजन, पूर परिस्थिती मधील पूरग्रस्तांना मदत, कोरोना काळामध्ये ऑक्सिजन प्लांटची निर्मिती, कोविड सेंटरची स्थापना, विद्यार्थ्यांसाठी राबवलेले स्पर्धात्मक उपक्रम, तरुण-तरुणीसाठी रोजगार मेळावे, ताणतणावातून मुक्त होण्यासाठी ऑनलाईन व्याख्याने, कामगार, सभासद आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुरू केलेले अल्पदारातील वैद्यकीय उपचार, नर्सरी, वाचनालय, क्रीडांगण, श्री दत्त भांडार या उद्योग समूहाच्या माध्यमातून होत असलेल्या सामाजिक आणि विधायक गोष्टींची माहिती सभासदांच्या पर्यंत दादांनी पोहोचविली. यामुळे सभासदांचा असणारा विश्वास आणखी वृद्धिंगत होण्यास मदत झाली.
संवाद दौऱ्यामध्ये अनेक शेतकरी, सभासदांनी दादांना प्रश्न विचारले, अडी अडचणी सांगितल्या, समोरासमोर बसून त्या अडचणीवर कशा पद्धतीने मात करता येईल? यावर तोडगाही सांगितला आणि आगामी काळात 'शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य' देण्याची भूमिका पटवून दिली.
कारखान्याची निवडणूक लागल्यानंतर एक विशेष बाब घडली. कारखाना कार्यक्षेत्रातील सर्वच गावामध्ये असणाऱ्या सभासदांनी जाती-पातीचे, गटा-तटाचे, पक्षीय राजकारण याला 'मूठमाती' देऊन 'सर्वपक्षीय' आणि 'सर्व संमती'ने एकमुखी पाठिंबा देऊन दादांच्या वरचा विश्वास आणखी दृढ केला. सर्वच पक्षातील नेते मंडळींनीही आपला पाठिंबा देऊन आणि आपल्या कार्यकर्त्यांना उघडपणे दादांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. दादांच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा नवीन 'झळाळी' प्राप्त झाली. दादांच्या नेतृत्वावर हे एक प्रकारचे 'शिकामोर्तब' झाल्यासारखे आहे.
लोकशाहीमध्ये विरोधी गटाला नेहमीच महत्त्व दिले गेले आहे. लोकशाही टिकवण्यामध्ये विरोधी गटाचे योगदान मोठे असते. त्यामुळे सभासदांची 'बिनविरोधा'ची जरी 'इच्छा' असली तरी विरोधी गटाने विरोधाची भूमिका घेऊन पॅनेल उभारले. पण त्यांना सर्व जागांवर उमेदवारही उभे करता आले नाहीत. उमेदवार न मिळण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. 3 जागा बिनविरोध झाल्या. विरोधाला विरोध करण्याची भूमिका घेऊन केवळ 'चळवळ टिकली पाहिजे' यासाठी असा 'अट्टाहास' करण्यात त्यांनी धन्यता मानली. सुरळीत आणि चांगल्या चाललेल्या कारखान्याच्या कामकाजाला 'विरोध' करण्याची विरोधकांची भूमिका शेतकऱ्यांना 'पटलीच नाही आणि रुजलीही नाही'. त्यामुळे विरोधकांच्या कारखान्यावर 'अंकुश' ठेवण्याच्या मनसुब्याला 'सुरुंग' लागले.
संवाद दौऱ्यात गणपतराव पाटील यांनी एकदाही विरोधकांवर ना टीका केली ना महत्त्व दिले. पण आपली भूमिका त्यांनी सभासदांच्या मनावर बिंबविण्यात यश मिळवले.
श्री दत्त साखर कारखान्याच्या या निवडणुकीमध्ये एकतर्फी मिळालेल्या या यशामुळे पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना मोठे 'बळ' मिळाले आहे. कार्यकर्ते नव्या जोमाने 'चार्ज' झाले आहेत. याचा फायदा निश्चितच गणपतराव पाटील यांना आगामी काळात होईल यात शंकाच नाही. दादांच्या नेतृत्व गुणाला आणि त्यांच्या संयमी कार्य कर्तुत्वाला शुभेच्छा. आणि भावी वाटचालीसाठी सदिच्छा...!