'श्री दत्त शेतकरी विकास पॅनेल' कडून संवाद दौऱ्यास सुरुवात



प्रेस मीडिया लाईव्ह :

शिरोळ/ प्रतिनिधी:

    श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधारी गटाच्या 'श्री दत्त शेतकरी विकास पॅनेल' कडून आज श्री दत्त देवस्थान नृसिंहवाडी येथे श्रीफळ वाढवून संवाद दौऱ्यास सुरुवात करण्यात आली. चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते श्री दत्त चरणी श्रीफळ वाढविण्यात आला.

     श्री दत्त साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमास सुरुवात झाली असून 24 जुलै रोजी मतदान होणार आहे, तर 25 जुलै रोजी निकाल घोषित केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटाकडून आज संवाद दौरा सुरू करण्यात आला.

 


   यावेळी बोलताना गणपतराव पाटील म्हणाले, सत्ताधारी गटाकडून सभासद शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात. ऊस विकास योजना राबवून एकरी दीडशे ते दोनशे टनाचे उद्दिष्ट घेऊन कारखाना काम करीत असताना यामध्ये मोठे यश येत आहे. कारखाना कार्यक्षेत्र आणि इतर जिल्ह्यातही सुमारे आठ हजार पाचशे एकरावर क्षारपड मुक्तीचे  काम झाले असून साडेतीन हजार एकरावर प्रत्यक्ष उत्पादनास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. कारखान्याच्या वतीने विविध ऊस विकास योजना राबविण्यात येत असून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. सत्ताधारी गटाने कायमच सभासदांच्या हितालाच सर्वोच्च प्राधान्य देऊन आतापर्यंत काम करीत आल्याने सर्व सभासदांचा निश्चितच आम्हाला विश्वास आणि पाठिंबा मिळेल. गावागावातील सभासदांनी आमच्यावर विश्वास दाखवावा आणि पुन्हा एकदा सर्वांगीण विकासासाठी आम्हाला पाठबळ द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

     यावेळी श्री दत्त साखर कारखान्याचे सर्व विद्यमान संचालक,  कर्नाटक व महाराष्ट्रातील सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post