पुणे विल्डरनेस' पुस्तकाचे प्रकाशन

नैसर्गिक संसाधने जपली पाहिजेत : न्या. श्रीराम मोडक

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत 'जीविधा' संस्थेच्या  'हिरवाई महोत्सव' अंतर्गत ७ जुलै रोजी जीविधा संस्थेचा वर्धानपनदिन साजरा करण्यात आला.  न्या.श्रीराम मोडक ( मुंबई उच्च न्यायालय) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.   न्या.श्रीराम मोडक,  एनडीए चे प्राचार्य ओमप्रकाश शुक्ला ,डॉ.महेश शिंदीकर यांच्या हस्ते 'पुणे विल्डरनेस' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.राजीव पंडित व अनुज खरे यांनी हे पुस्तक संपादित केले आहे. 

अनुज खरे व राजीव पंडित यांच्या जंगलातील अनुभवांवर आधारीत मुलाखतीचा कार्यक्रम झाला . डॉ.महेश शिंदीकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.जीविधा 'च्या वतीने  वृंदा पंडित यांनी स्वागत केले.राजीव पंडित यांनी प्रास्ताविक केले.उष:प्रभा पागे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


संसाधनांचा वापर करताना विचार करा : न्या. मोडक

न्या. मोडक म्हणाले,' जंगलात जाण्याची गोडी राजीव पंडीत, अनुज खरे यांच्यामुळे निर्माण झाली. फिरण्याची प्रेरणा अनेकांना या दोघांनी दिली. निसर्ग जागृती विषयक काम करणे यासाठी सखोल  निष्ठा लागते. संस्था चालविताना सातत्य लागते. त्यातून जी जागरूकता निर्माण होते, ती महत्वाची आहे. निसर्गाकडे निरनिराळया दृष्टीकोणाने पाहिले जाते. निसर्ग विषयात करीयर करणे, याचे श्रेय पुण्यातील अनेकांना आहे. आपण निसर्गाला देव मानतो. आपले सण निसर्गाशी जोडलेले आहेत. ही पृथ्वी जपली पाहिजे. संसाधनांचा वापर करताना विचार केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. संसाधने लवकर संपवली जात आहेत. पृथ्वीची नवनिर्मिती होत नाही.भोगवाद वाढवता कामा नये. निसर्गाकडे जाताना आपली हाव, गरजा याबद्दल विचार केला पाहिजे.पर्यावरण व विकास याचे संतुलन साधले पाहिजे. मोठे पूल, बोगदे होताना निसर्गाचा ऱ्हास होतो का याकडे लक्ष दिले पाहिजे. पुढच्या पिढीला आपण काय शिल्लक ठेवणार आहोत ? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

जंगल भ्रमंतीतून वाढली गोडी

अनुज खरे आणि राजीव पंडित यांनी त्यांच्या निसर्गप्रेमाचा प्रवास सांगितला. ' अभियांत्रिकीची पाश्र्वभूमी असली तरी निसर्गाकडे वळलो.जंगलाचा अभ्यास केल्यावर ते जास्त कळू लागले, त्यातून ते वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले ', असे राजीव पंडित यांनी सांगितले. अनुज खरे म्हणाले, 'कौटुंबिक पार्श्वभूमी आणि वाचनातून जंगल भ्रमंती सुरू झाली. वन विभागाच्या अडचणी देखिल समजून घेतल्या. छोट्या मोठ्या सहलीतून अनुभव वाढत गेले.  निसर्गाच्या छोट्या छोट्या घटकात रस घेतला पाहिजे. फक्त वाघ दिसणे हे पर्यटकाचे उद्दीष्ट नसावे, तर जंगल पाहणे , समजून घेणे, हे उद्दीष्ट असावे '.

Post a Comment

Previous Post Next Post