वारी निमित्त आयोजित सर्व धर्मीय ऐक्य दिंडीला चांगला प्रतिसाद !
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : पंढरपूर वारी निमित्त पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या 'सर्वधर्मीय ऐक्य दिंडी'ला चांगला प्रतिसाद मिळाला .मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक,रिझवानी मस्जिद ट्रस्ट,सुफी वारकरी विचारमंच आणि साखळीपीर तालीम तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर यांच्या विद्यमाने दि.१ जुलै रोजी सर्व धर्मीय ऐक्य दिंडीचे आयोजन सकाळी साडे दहा वाजता करण्यात आले .
साखळीपीर तालीम(नाना पेठ) येथे सर्वधर्मीय धर्म गुरु,' डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ.पी.ए.इनामदार, साखळी पीर तालीमचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर,प्रशांत कोठडिया, ग्यानी प्रतापसिंह गुरूद्वारा गणेश पेठ, दिंडी क्रमांक ३४ चे भास्कर मोरे महाराज, ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी चे योगी निरंजन नाथ महाराज,भंते सुदस्सन महाराज बौद्ध धर्मगुरु यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. अंगरशा बाबा दर्गा मार्गे रिझवानी मस्जिद (गंज पेठ) येथे समारोप झाला.
शिवानी माळवदकर,रिझवानी मस्जिद ट्रस्टचे विश्वस्त अंजुम भाई,सुफी वारकरी विचार मंचचे अध्यक्ष मशकूर अहमद शेख,सचिव उमर शरीफ शेख,आझम ट्रस्टचे विश्वस्त अब्दुल वहाब शेख , मुस्लिम बँकेचे संचालक मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद यांनी संयोजन केले.सहभागी वारकऱ्यांना व्हेज बिर्याणी,शीर खुर्मा वाटप करण्यात आले .'डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटी 'च्या वतीने वारकऱ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले. दिंडीचे हे पाचवे वर्ष होते.
'गेल्या अनेक वर्षांपासून सर्वधर्म दिंडी साखळी पीर तालमीच्या वतीने काढण्यात येते, आणि या वारीत मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख आदी धर्मगुरू सहभागी होत असतात. या वारीत सहभागी होण्यासाठी डॉ.पी. ए. इनामदार हे देखील सहभागी होत असून ते पुण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात महात्मा ज्योतिबा फुले यांचा वारसा पुढे चालवत आहेत ', असे गौरवोद्गार रवींद्र माळवदकर यांनी काढले.
डॉ.पी. ए. इनामदार म्हणाले, 'मी स्वतः मुस्लिम असलो तरी मी सर्व धर्म समभाव मानणारा आहे, आणि मी कृतीशील सर्व धर्म समभाव पाळतो, म्हणूनच माझ्या शैक्षणिक संस्थेत सर्व धर्मीय शिक्षक, प्राध्यापक आहेत, आम्ही सर्व धर्माच्या उपक्रमात सहभागी होतो. त्यामुळे आजच्या या सर्वधर्म दिंडीत सहभागी होताना मला आनंद होत आहे.पुणे हे धार्मिक एकोपा जपणारे शहर आहे.हा नावलौकिक कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत'.