आमदार प्रसाद लाड यांचा विधान परिषदेत सवाल
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई, ४ जुलै : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून, आज (दि. ४ जुलै) रोजी आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत नियम ९७ अन्वये बेस्ट उपक्रम आणि बेस्टच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न या अनुषंगाने अर्धा तास चर्चेची मागणी केली होती. यावेळी अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून श्रमिक उत्कर्ष सभा या कामगार संघनेचे अध्यक्ष आमदार लाड यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या हिताचे काही प्रश्न उपस्थित केले असून, यावर मंत्री उदय सामंत यांनी बैठक घेऊन समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे.
मुंबईत लोकलनंतर जीवनवाहिनी म्हणून बेस्टकडे पाहिले जाते
एक प्रकारे मुंबई शहराच्या रक्त वाहिनीप्रमाणे बेस्ट वाहतूक सेवा पुरवत आहे. परंतु मुंबई शहर व उपनगरामध्ये प्रवाशांना अविरत परिवहन सेवा तसेच मुंबई शहरात ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट उपक्रमातील अधिकारी/कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे आमदार लाड यांनी सभागृहात सांगितले. त्यानुसार महापालिका, बेस्ट प्रशासन आणि राज्य सरकारला आमदार लाड यांनी हे प्रश्न विचारले आहेत.
बेस्ट कर्मचारी / अधिकारी यांची भरती आणि पदोन्नती करणार का? बेस्ट कर्मचाऱ्यांचा कोविड भत्ता कामगारांच्या खात्यावर पुढील ४ दिवसात वर्ग करणार का? मुंबई हायकोर्टाने ग्रॅज्युएटीची रक्कम कर्मचाऱ्यांना प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत!, ते ३५० कोटी रुपये पुढील ४ दिवसात त्यांच्या खात्यावर वर्ग करणार का? मुंबई महापालिका अधिनियम 1888 च्या कलम 134 मधील तरतुदी नुसार तुट भरून काढून, महापालिकेच्या माध्यमातून बेस्टला मजबूत करणार का?प्रत्येक अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत तरतूद करून महापालिका हा निधी देणार का? त्याचप्रमाणे म्हाडाच्या माध्यमातून बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वसाहती तसेच २७ डेपोचा पुनर्विकास करून कर्मचारी आणि बेस्ट उपक्रमाला दिलासा देणार का? असे सवाल आमदार प्रसाद लाड यांनी सभागृहात उपस्थित केले आहेत.
यावर बोलत असताना मंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक उत्तर दिले असून, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बैठक घेण्याबाबत सांगितले आहे. या बैठकीला आमदार लाड यांना बोलावण्याच्या सूचना उपसभापतींनी दिल्या आहेत.
मागील अनेक दिवसांपासून आमदार प्रसाद लाड हे सातत्याने बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न उपस्थित करत असून, श्रमिक उत्कर्ष सभेच्या माध्यमातून बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर काम करत आहेत.