श्री दत्तच्या विश्वस्तांनी सभासदांची विश्वासार्हता जपली : गणपतराव पाटील

 जयसिंगपूर येथील संवाद दौऱ्यात दत्तची निवडणूक बिनविरोध करण्याची सभासदांची मागणी

आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर गटाचा श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलला पाठिंबा


प्रेस मीडिया लाईव्ह :

जयसिंगपूर/प्रतिनिधी : 

  ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना केंद्रबिंदू मानून दत्त साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे असे काम करीत आहोत. शेतकरी सभासद, कामगार आणि सेवक वर्ग यांच्यामुळेच दत्तच्या सहकार मंदिराचे वैभव वाढले असून कारखान्याचे विश्वस्त म्हणून आम्ही विश्वासार्हता जपली आहे. त्यामुळे सभासदांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवून आणि पाठबळ देऊन आमच्या श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलला साथ द्यावी, असे आवाहन गणपतराव पाटील यांनी केले.

     श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलच्या वतीने जयसिंगपूर येथील मर्चंट असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या संवाद दौऱ्याप्रसंगी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, सहकारमहर्षी गणपतराव पाटील बोलत होते. ज्येष्ठ नेते आप्पासो खामकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

      यावेळी बोलताना गणपतराव पाटील पुढे म्हणाले, कारखान्याने सभासदांचा पुरात बुडालेला ऊस आणि जळीत ऊस गाळपास आणून त्या उसाला एफ. आर. पी. प्रमाणे दर देऊन शेतकऱ्यांना नुकसानीपासून वाचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी हिताच्या विविध योजना राबवून उसाचे एकरी उत्पन्न वाढावे, सेंद्रिय शेती करण्यात यावी, शुगर बीटचे उत्पादन घेण्यात यावे, याकरिता कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन वाटचाल करीत आहोत. याकरिता 65 शेती मदतनीस मार्गदर्शन करीत आहेत. 200 टन उसाचे उत्पादन व्हावे याकरिता कारखाना शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे. त्याचबरोबर कारखान्याच्या वतीने सुरू केलेल्या कॉलेजच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा, आरोग्य केंद्रातून अत्याधुनिक आरोग्यसेवा, क्रीडांगणाच्या माध्यमातून दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना विविध शासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळाली आहे. विश्वस्त म्हणून कारखान्याचे काम करत असताना केवळ सभासद, कामगार यांचे हित डोळ्यासमोर ठेवून वाटचाल सुरू ठेवली आहे. यामुळे सभासदांचाही आमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप व्हावा यासाठी कारखान्याचे विस्तारीकरण करण्यात आले. कारखान्याचे भाग भांडवल वाढवण्याच्या दृष्टीने शेअर्सची रक्कम वाढवण्यात आली आहे. यापोटी  वर्षाला एकरी 100 किलो साखर अल्प दरात देण्यात येते. यामुळे शेतकऱ्याला प्रतिवर्षी वीस ते बावीस टक्के डिव्हिडंट दिल्यासारखे आहे, असे शेवटी गणपतराव पाटील यांनी सांगितले.

      जयसिंगपूरचे माजी नगरसेवक व उद्योगपती अशोकराव कोळेकर बोलताना म्हणाले, कारखान्याचे संस्थापक, संचालक, माजी आमदार, स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे चालवत गणपतराव पाटील यांनी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना हा सहकारातील आदर्श साखर कारखाना म्हणून नावलौकिकास आणला आहे. शेतकऱ्यांची क्षारपड झालेली जमीन सुपीक करून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक नंदनवन फुलविण्याचे काम त्यांनी केले आहे. कारखान्याच्या माध्यमातून विकासात्मक दृष्टी ठेवत सभासद, कामगार यांचे हित साधून त्यांच्या जीवनात सुखाचे दिवस आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. यामुळे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

      माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे यांनी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी श्री गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलला पाठिंबा दिला असून कार्यकर्त्यांनी त्यांच्या पॅनेलचा प्रचार करण्याचे आदेशही  दिल्याचे सांगून सहकारातील आदर्शवत साखर कारखाना श्री गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली उत्तमरीत्या चालू आहे, त्यामुळे पुन्हा सभासदांनी विश्वस्त म्हणून त्यांना काम करण्याचे संधी द्यावी असे आवाहन केले.

      यावेळी माजी नगराध्यक्ष मिलिंद शिंदे, दत्तचे संचालक रणजीत कदम, सभासद प्रकाश बेलवलकर, अशोक निर्मळ, ज्युबेदा तांबोळी, महावीर चकोते, महावीर देसाई, माजी नगरसेवक सर्जेराव पवार, बजरंग खामकर यांनी मनोगत व्यक्त करताना श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी कारखान्याची आदर्शवत प्रगती केली आहे. त्यांनी सभासदांचे आणि कामगारांचे हित सांभाळून कामकाज केले असल्यामुळे सहकार क्षेत्रात नावाजलेल्या या कारखान्याची निवडणूक बिनविरोध करावी अशी भावना व्यक्त केली. 

     कारखान्याच्या संचालिका संगीता पाटील कोथळीकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन सुरेश पाटील यांनी केले. जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेचे माजी चेअरमन महादेव राजमाने यांनी आभार मानले. 

      यावेळी नंदू बलदवा, डॉ. बी. एन. शिखरे, डॉ. आण्णासाहेब मोटके पाटील, माजी नगराध्यक्ष अमरसिंह निकम, हसन देसाई, दत्तचे संचालक इंद्रजीत पाटील, सविता पाटील कोथळीकर, चंद्रकांत जाधव घुणकीकर, दिलीप पाटील कोथळीकर, संजय पाटील कोथळीकर, मुसा डांगे, ज्योतीराम जाधव, श्रेणिक कुडचे, महादेव पाणदारे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post