प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०)५३६/१८,
इंडस्ट्रियल इस्टेट समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी
ता. हातकणंगलेे जि कोल्हापूर पिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)
prasad.kulkarni65@gmail.com
प्रेस मीडिया लाईव्ह :
६ जुलै हा डॉ.रा.गो.भांडारकर यांचा जन्मदिन.डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर म्हणजे जागतिक कीर्तीचे थोर मराठी व्यक्तिमत्व. प्राच्यविद्यासंशोधक ,भाषाशास्त्रज्ञ,संस्कृत पंडित, प्राचीन इतिहास संशोधक,कर्ते सुधारक ,धर्मसुधारक अशा विविध अंगांनी त्यांची जगाला ओळख आहे.६ जुलै १८३७ ला मालवण येथे जन्मलेले भांडारकर २४ ऑगस्ट १९२५रोजी पुण्यात कालवश झाले. १८७ वर्षापूर्वी जन्मलेल्या डॉ. भांडारकर यांची स्मृतिशताब्दी पुढील महिन्यात सुरू होत आहे. त्यांचा १८७ वा जन्मदिन आणि सुरू होणाऱ्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त या महामानवाला विनम्र यानिमित्ताने त्यांची थोडी ओळख नव्याने करून घेण्याची गरज आहे.
त्यांचे मूळ गाव वेंगुर्ले.मूळ आडनाव पत्की होते पण पूर्वज खजिन्यावर अधिकारी होते म्हणून त्यांचे आडनाव भांडारकर पडले.त्यांचे आजोबा शिरस्तेदार होते तर वडील महसूल खात्यात होते. आई रमाबाई या गृहिणी होत्या.त्यांचे काका विनायक भांडारकर हेही समाज सुधारक होते.मालवण ,राजापूर ,रत्नागिरी येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. मुंबईच्या एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट मधून त्यांनी शिक्षण घेतले. तेथेच काही दिवस कारकून व शिक्षक म्हणून नोकरी केली. मुंबई विद्यापीठाचे ते पहिले पदवीधर होते. भांडारकरांनी मुंबई व पुण्यातील शास्त्री पंडितांशी न्याय,व्याकरण, वेदांत आदी विषयांची चर्चा केली. त्यांचे अध्ययन केले. पुढे त्यांनी हैदराबाद ,रत्नागिरी ,मुंबई, पुणे येथे संस्कृतचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांना मुंबई विद्यापिठाचे कुलगुरूपद ,जर्मनीतील गटिंगन विद्यापीठाची पी.एचडी ,विविध जागतिक विद्यापीठांच्या सन्माननीय पदव्या, सर हा किताब , रॉयल एशियाटिक सोसायटी (मुंबई व लंडन), जर्मन ओरिएंटल सोसायटी, अमेरिकन ओरिएंटल सोसायटी, इटलीतील एशियाटिक सोसायटी, सेंट पिटसबर्ग येथील इंपिरियल अकॅडमी ऑफ सायन्स इत्यादी अनेक जागतिक संस्थांचे सदस्यत्व त्यांच्या अफाट बुद्धी सामर्थ्यावर मिळालेले होते.
१९१७ साली त्यांच्या वयाच्या ८० व्या वर्षी त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि चाहत्यांनी भांडारकर लेखसंग्रह हा ग्रंथ तयार केला आणि तो त्यांनाच अर्पण केला. प्राच्यविद्या संशोधन मंदिराला त्यांनी आपला सर्व ग्रंथ संग्रह व संशोधन साहित्य व आर्थिक स्वरूपाची अनमोल देणगी दिली. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ही संस्था जगातील एक आघाडीची संशोधन संस्था म्हणून ओळखली जाते. डॉ. भांडारकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी, शिक्षण प्रसारक मंडळी, फीमेल एज्युकेशन सोसायटी, सेवा सदन असे अनेक संस्थानाही सहकार्य केले. प्रार्थना समाजाचे ते वैचारिक संस्थापक मानले जातात.
डॉ. रा.गो.भांडारकर यांनी भरपूर लेखन केले. अर्ली हिस्टरी ऑफ द डेक्कन ,वैष्णवीझम- शैविझम अँड अदर मायनर रीलिजन , अ पिप इन टू द अर्ली हिस्टरी ऑफ इंडिया,यासारखे त्यांचे अनेक ग्रंथ गाजले. त्यांचे लेख, व्याख्याने ही तर अभ्यासकांना पर्वणी असे. भारतातील विविध धार्मिक संप्रदाय आणि विविध धार्मिक तत्वज्ञाने यावर त्यांनी संशोधनाने विस्तार स्वरूप लिहिले.सुसंगत पुराव्यांच्या आधारे प्राचीन भारताचा इतिहास कसा शोधून काढावा, ऐतिहासिक घटनांचा प्रमाणशुद्ध अर्थ कसा लावावा याची शिकवण त्यांच्या ग्रंथातून मिळते .त्यामुळे त्यांचे लेखन भारताच्या प्राचीन इतिहासाचे आधारभूत लेखन म्हणून जगभर ओळखले जाते.
एक असामान्य विद्वान म्हणून जगभर त्यांच्या लौकिक होता. ते कर्ते सुधारक होते.स्त्री शिक्षण ,विधवा विवाह, प्रौढ विवाह यांचे कट्टर पुरस्कर्ते होते .आपल्या कुटुंबातील स्त्रियांना त्यांनी जाणीवपूर्वक उच्च शिक्षित केले. आपल्या विधवा कन्येचा विवाह त्यांनी १८९१ साली घडवून आणला. त्यांच्या जातीबांधवांनी त्यांना बहिष्कृत करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी भीक घातली नाही. तर विधवा विवाहाचे शास्त्राच्या आधारे समर्थन केले.तसेच न्याय,नीती व मानवहीत या तत्वांच्या आधारे त्याचे महत्त्व स्पष्ट केले. जातिभेद नष्ट झाल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही आणि एकराष्ट्रीयत्व साध्य होणार नाही ही भूमिका त्यांनी मांडली. वेगवेगळ्या जातींच्या सभा ,परिषदांना विरोध केला.कारण त्यामुळे भेदबुद्धी निर्माण होते असे त्यांचे मत होते.
डॉ . भांडारकर अस्पृश्यता मानत नसत. शंभर वर्षांपूर्वी त्यांनी स्वतःच्या घरी मुद्दाम एका महार बंधूचे किर्तन ठेवले होते. अस्पृश्यांना अंधारात ठेवून आपण देशाचे फार नुकसान करत आहोत असे ते म्हणत. संमती वयाच्या विधेयकाला त्यांचा पाठिंबा होता. त्याबाबत लोकमान्य टिळकांशी त्यांचे तीव्र मतभेद झाले. सार्वजनिक कर्तव्याचा अभाव आणि सामाजिक सद्बुद्धी यांचा ऱ्हास यामुळे हिंदू समाजाची अधोगती झाली आहे अशी मांडणी त्यांनी केली. डॉ.भांडारकर प्रार्थना समाजाचे मोठे आधारस्तंभ होते. न्यायमूर्ती रानडे यांच्याप्रमाणेच त्यांनी प्रार्थना समाजाची प्रतिष्ठा वाढवली.समाजाला तात्विक विचारांची बैठक दिली. समाज सुधारक म्हणून त्यांचे काम अत्यंत महत्वाचे आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना धर्माच्या तौलनिक अभ्यासासाठी परदेशी पाठवण्यामध्ये डॉ. भांडारकर यांचाही पुढाकार होता.बौद्धिक चिकित्सेवर धर्मश्रद्धा आधारित असावी या मताचे ते होते. ब्रह्म,जीव आणि विश्वशक्ती ही ईश्वराची प्रतिक रूपे आहेत.मानव प्रारंभापासून विश्वात ईश्वराला पहात आला आहे असे ते म्हणत. सामाजिक आणि नैतिक प्रगती झाल्याशिवाय राजकीय प्रगती होणार नाही. आपले नीतीबळ नाहीसे झाले म्हणून आपले अध:पतन झाले.नैतिक जागृती झाल्याशिवाय समाजाची बिघडलेली घडी सुधारणार नाही असे त्यांचे मत होते.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)