प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : गेल्या काही दिवसापासून इचलकरंजी सह जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे प्रमाण वाढल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढत आहे. सोमवार दि.२२ जूलै रोजी रात्री १० वाजता पंचगंगा नदी रोडवरील यशोदा पुल येथील सर्व्हिस रोडवर पाणी आलेने खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागा कडुन इचलकरंजी - हुपरी आणि कर्नाटक राज्यास जोडणार रस्ता काल रात्री पासुन बंद करणेत आलेला आहे.
आज मंगळवार दि.२३ जूलै रोजी सकाळी ११.३० वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी ६४.०६ फूट इतकी झालेने आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या समवेत पंचगंगा नदी पुर परिस्थितीची पाहणी केली. याठिकाणी पुर पाहण्यासाठी शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेचे निदर्शनास आलेने त्या ठिकाणी तातडीने पोलिस बंदोबस्त तैनात करणेच्या सुचना पोलिस प्रशासनास दिल्या.
इचलकरंजी येथील पंचगंगा नदीची इशारा पातळी ६८ फूट इतकी असल्याने तसेच जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याची शक्यता असल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होण्याची शक्यता असल्याने सर्व विभाग प्रमुख आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील अधिकारी कर्मचारी यांना सतर्क रहाणेचे आदेश दिले आहेत.
तसेच याठिकाणी कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी शहरातील नागरिकांनी पंचगंगा नदी पुर पाहण्यासाठी नदी परिसरात गर्दी करु नये असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी केले आहे.
यावेळी आरोग्य अधिकारी डॉ.सुनिल दत्त संगेवार, आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख संजय कांबळे, महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे,विजय पाटील, विनोद जाधव आदी उपस्थित होते. याच अनुषंगाने उपायुक्त प्रसाद काटकर यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील अधिकारी कर्मचारी यांची बैठक घेऊन पुरग्रस्त नागरिकांसाठी निश्चित केलेल्या छावणी सुस्थितीत असलेची पाहणी करून पुरग्रस्त नागरिकांना कोणतीही गैरसोय निर्माण होणार नाहीयाची खबरदारी घेण्याचे आदेश दिले.
सदर बैठकीस सहा.आयुक्त केतन गुजर,शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर,अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, विद्युत अभियंता संदीप जाधव, खरेदी पर्यवेक्षक शितल पाटील, स्वच्छता निरीक्षक महादेव मिसाळ यांचेसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.