( माझे मत) हर्षवर्धन पाटील यांचे बेताल वक्तव्य निषेधार्ह आहे


प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी ,इचलकरंजी : 

इचलकरंजी शहर हे महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. या शहराला सहकार,साहित्य,कला, संस्कृती अशी विविध क्षेत्रातील फार मोठी परंपरा आहे. याचा कोणताही विचार न करता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इचलकरंजीची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे हे अतिशय बेताल ,धक्कादायक आणि निषेधार्थ आहे. 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांना अनेक अदृश्य शक्तीनी घेरले होते.अदृश्य शक्तीने घेरलेले असताना देखील पाकव्याप्त काश्मीर सारख्या इचलकरंजी मधून  त्यांनी वादळात देखील दिवा लावला 'असे वक्तव्य त्यांनी वाळवा येथे एका कार्यक्रमात केले.कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी अनेक वर्ष काम केले आहे .या पार्श्वभूमीवर त्यांना जिल्ह्याची पूर्ण माहिती असूनही इचलकरंजी सारख्या औद्योगिक शहराबाबत असे वक्तव्य करणे हे विकृतपणाचे किंवा पाकव्याप्त काश्मीर म्हणजे काय ? याच्या अनभिज्ञपणाचे  लक्षण आहे. राजकारणातून सदसदविवेक वैचारिकता हरवत चालल्याचे आणि बेताल वक्तव्ये वाढत चालल्याचे हे लक्षण आहे.


या कार्यक्रमात विद्यमान खासदारांनी 'लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सगळे माझ्यासोबत होते. परंतु काही अज्ञात शक्ती देखील माझ्यासोबत होत्या. त्यांची नावे घेतली तर अवघड होईल. परंतु होता जीवा म्हणून वाचला शिवा असे सांगत  लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक अदृश्य शक्तींचे सहकार्य झाल्याचे म्हटले होते.यावर कोणताही संदर्भ नसताना,इतिहास माहीत नसताना. हर्षवर्धन पाटील यांनी  इचलकरंजीला पाकव्याप्त काश्मीरची उपमा देणे अतिशय बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. त्यांच्या या विधानाचा जाहीर धिक्कार केला पाहिजे. त्यांनी तमाम इचलकरंजीकरांची माफी मागितली पाहिजे.हा मुद्दा कोणत्याही राजकीय पक्षाशी अथवा विचारधारेशी निगडित नाही. तर तो तमाम इचलकरंजीकरांशी निगडित आहे.


१९४७ ला भारत स्वतंत्र झाला. तेव्हा भारताची फाळणी होऊन भारत-पाक दोन देश झाले .संस्थानिकांनी आपापल्या सोयीने व इच्छेप्रमाणे भारतात किंवा पाकिस्तानमध्ये विलीन व्हावे असा सल्ला त्या वेळचे ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी दिला. तेंव्हा काश्मीरचे अधिपती राजा हरिसिंग यांनी दोन्ही सरकारांशी करार करून आपल्या सर्वाधिकार कायम ठेवण्याचा प्रयत्न चालवला.या परिस्थितीचा फायदा घेऊन पाकिस्तानने दांडगाइने काश्मीरच्या हद्दीत २२ ऑक्टोबर १९४७ रोजी सशस्त्र लोक घुसवले. त्यावेळी स्वतःच्या सर्व संरक्षणासाठी राजा हरिश्चंद्र यांनी भारताकडे मदत मागितली. पण मदत द्यायची तर कायदेशीर दृष्ट्या काश्मीरचा आणि भारताचा करार होऊन ते संस्थान भारतात सामील व्हायला हवे होते. ही वस्तुस्थिती त्यांना सांगताच त्यानी भारतात अंशतः विलीनीकरण केले.

घुसखोरांनी काश्मीरचा एक तृतीयांश म्हणजे जवळजवळ ८४ हजार चौरस किलोमीटर भाग व्यापला .१९४८ मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने संघटनेच्या सुरक्षा समितीने भारत व पाकिस्तान दोघांवर युद्धबंदी आणले त्यावेळी पाकिस्तानने व्यापलेला हा भाग त्यांच्याकडेच राहिला. पाकिस्तान त्यालाआझाद काश्मीर म्हणते तर आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो.पाकिस्तानच्या त्या ७७  वर्षांपूर्वीच्या घुसखोरीचा आणि इचलकरंजीचा काय संबंध ? इचलकरंजीत कोण घुसखोरी केली आहे ? असे व्यक्तव्य करून हर्षवर्धन पाटील यांना काय साधायचे आहे ? जिल्ह्यातील शांतता व सौहार्द त्यांना बिघडवायचे आहे काय ? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. दोन-चार वर्षांपूर्वी एका राजकीय घडामोडीचा संदर्भ देऊन हर्षवर्धन पाटील यांनी ' अलीकडे आपल्याला शांत झोप लागते 'असे विधान केले होते. त्यांनी जरूर शांततेत झोपावे पण आपल्या वक्तव्याने इतरत्र असलेली शांतता भंग करू नये ही अपेक्षा.सामाजिक सौहार्दाचे वातावरण गढूळ होऊ न देणे हे जबाबदार राजकारणाचे लक्षण असते. याचे भान वर्षानुवर्षे सत्तेची ऊब मिळालेल्या हर्षवर्धन पाटील यांनी बाळगण्याची गरज आहे.



Post a Comment

Previous Post Next Post