रोजगार हमीचे जनक वि. स. पागे

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०)

५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट,

समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com

महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेचे जनक एक थोर स्वातंत्र्य सैनिक थोर गांधीवादी विचारवंत संत वांग्मय पासून शेतीचे अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक महाराष्ट्र विधान परिषदेचे पहिले सभापती अशा विविध पद्धतीने कालवस्वी सौभाग्य यांची ओळख आहे .२१ जुलै १९१० रोजी त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बागणी या गावी झाला . १६ मार्च १९९० रोजी ते कालवश झाले. त्यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या तरुणपण स्वातंत्र्य आंदोलनाने भरलेल्या काळात गेले. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सांगलीला झाले .बीए.एलएलबी ही पदवी घेऊन त्यांनी वकिली सुरू केली. याच काळात ते गांधीवादाकडे आकर्षित झाले. त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात स्वतःला झोकून दिले. स्वातंत्र्यासाठी त्यांनी अनेक वेळा तुरुंगवासही भोगला.


पेशव्यांचे सेनापती परशुराम भाऊ यांच्या पागेवर पागे यांचे पूर्वज अधिकारी होते .त्यामुळे या घराण्याचे आडनाव पागे म्हणूनच रुढ झाले. ते सांगली जिल्हा काँग्रेसचे नेते होते.तसेच त्यांनी काँग्रेस महासमितीचे सदस्य म्हणूनही काम केले होते.महाराष्ट्र काँग्रेसमध्ये त्यावेळी विचारवंत नेत्यांची जी मांदियाळी होती त्यामध्ये वि.स.पागे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले पाहिजे. मुंबई राज्याच्या विधानसभेवर ते १९५२,५४ मध्ये निवडून गेले. तर महाराष्ट्र विधान परिषदेचे ते १९६०,६६ आणि ७२ साली निवडून गेले.महाराष्ट्राच्या स्थापनेपासून म्हणजे १९६० पासून १९७८ पर्यंत सलग अठरा वर्षे ते विधानसभेचे सभापती होते. रोजगार हमी योजना ही केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला त्यांनी दिलेली एक महत्त्वाची योजना आहे .आज बेरोजगारी वाढते आहे. रोजगार विरहित विकासाचे मॉडेल राबवले जात आहे .त्याचे गंभीर परिणाम समाज जीवनावर होत आहेत .केंद्र सरकार रोजगार हमी कायदा करते पण त्याची यशस्विता तेवढ्या प्रमाणात दिसत नाही. या पार्श्वभूमीवर कालवश पागे यांचे याबाबतचे विचार समजून घेण्याची गरज आहे. खेड्यात खूप सुप्त साधन सामग्री आहे .त्या सर्वात श्रमशक्ती प्रमुख आहे .तिचे  केंद्र कल्पून त्या भोवती सारा विकास विणला पाहिजे हे पागे यांनी स्पष्टपणे सांगितले होते.


कालवश पागे हे भारतीय संस्कृती, संस्कृत वांग्मय आणि संतवाणी याचे गाढे व्यासंगी होते. गरीबी दूर व्हावी या हेतूने त्यांनी रोजगार हमी योजना मांडली. भारतात गरिबीची प्राचीन परंपरा आहे हे त्यांनी स्पष्ट केले .त्यांच्या मते भारतात फार पुरातन काळापासून बेकारी आणि गरिबी असली तरी ती कधी बोचली नव्हती. कारण सर्वांच्या जीवनात एकतऱ्हेचा  सारखेपणा होता.उच्चस्तर जीवनाचे स्तर फारसे उघड होत नसत .फक्त राजे राजवाडे ,सरदार एवढ्यांची श्रीमंती आणि विलास नजरेत भरत असे .ग्रामीण जीवनात त्याचा शिरकाव झालेला नव्हता. शेती हेच उत्पादनाचे मुख्य साधन होते. त्यातूनच भांडवल निर्मिती आणि बहुतांंचे उद्योगधंदे लोकांच्या प्राथमिक गरजा भागवत होते. मानवाची सर्व दृष्टी आपल्या संस्कृतीक, अध्यात्मिक अभिवृद्धीकडे होती .परंतु गरिबी कळतच नव्हती असे नव्हते. हे स्पष्ट करताना पागे एक संस्कृत सुभाषित करतात. त्याचा अर्थ असा, पत्नीच्या हातात रत्नाची काकणे नसलेली पाहून मला दुःख होत आहे.परंतु घरातील धान्य ठेवण्याच्या कणगीमध्ये धान्याचा एक दाणाही नाही हे पाहून त्याहीपेक्षा जास्त दुःख होत आहे.पहिला चरण तौलनिक गरिबी दाखवतो तर दुसरा चरण निखळ गरीबी प्रगट करतो.


कालवश वि.स.पागे यांची रोजगार हमी योजना सर्वप्रथम १९६९ साली तासगाव तालुक्यातील विसापूर या गावी सुरू झाली .नंतर ती अनेक गावात पसरली.१९७४ साली महाराष्ट्रभर ती वाढली. १९७५ साली या योजनेसाठी स्वतंत्र कर ,उपकर बसून निधी उभारला गेला .१९७७ला त्याचा कायदा केला गेला. आणि २६ जानेवारी १९७९ पासून तो अमलात आणला. गेला म्हणजेच योजनेच्या सुरुवातीपासून दहा वर्षांनी तिचे कायद्यात रूपांतर झाले. कालवश पागे यांच्या मते या कायद्यानुसार ग्रामीण भागातील प्रत्येक प्रौढ माणसाला शरीर श्रमाची अकुशल कामे करून आपल्या प्राथमिक गरजा भागवण्याची हक्काची संधी मिळाली. रस्त्यापासून पाझर तलावापर्यंतची अनेक कामे त्यातून केली गेली. एका तऱ्हेने दारिद्र्यावर हा थेट सरळ व समोरून हल्ला होता. एकंदर आर्थिक प्रगती बरोबर समृद्धीचे झरे पाझरून समाजात खालपर्यंत जातात आणि दारिद्र्य कमी होते. हे पूर्णतः अनुभवास आले नाही म्हणून अशा तऱ्हेची स्वतंत्र योजना करावी लागली. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाला चालना देण्यातही पागे यांचे योगदान मोठे होते .ग्रामीण भागातील दारिद्र रेषेखालील कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी नवी साधने देताना शक्यतो जास्तीत जास्त लाभदायक कुटुंबांना शेती व्यतिरिक्त व्यवसाय देण्याचा भर देणे उचित असते ही पागे यांची भूमिका होती.


रोजगार हमी योजनेचा कालवण पागे यांनी फार बारकाईने विचार केलेला होता. अशिक्षिताना काम पुरवा आणि सर्व शिक्षित त्यात मुरवा असे त्यांचे सूत्र होते. धाडसाने प्रामाणिकपणाने ही एकच योजना राबवली तर जीवनाची अनेक अंगे सुधारतील .प्रसंगी वरच्या वर्गाना थोडी झिज सोसावी लागेल .सर्वनाश टाळण्यासाठी, आपल्या शहाण्या स्वार्थासाठी आणि लाडक्या देशासाठी हे करण्यास त्यांनी सिद्ध झाले पाहिजे. विकास साध्य होईल. समाजवाद येईल व स्वराज्य मिळवताना केलेली अहिंसक क्रांती सुफलीत होईल ही त्यांची धारणा होती.


रोजगार हमी योजनेवर होणाऱ्या संभाव्य टीकेची दखल घेत काही प्रश्न उपस्थित करत पागे म्हणतात ,ग्रामपंचायतीला ,सरकारला रोजगाराची हमी द्यायला अडचण कोणती ?अशी रोजगार हमी योजनेची पाटी लावूनही कोणी काम मागण्यास आले नाही तर त्या गावाच्या चावडीवर समाजवादाचे निशाण फडकावून दुसरा गाव जिंकण्यास जावे. मजुरी बद्दल दीर्घ मीमांसा आम्ही करत नाही. पण महागाई व मजुरी यांचा मेळ घालून मजूर काय जीवन जगतात याचे अशा तक्रारी करणाऱ्यांनी पूर्ण परीक्षण करावे.लोक कामास आले, न आले तरी योजना यशस्वी होणार. कोणी आले नाही तर सर्वांना काम आहे हा आनंद आपल्यालाच मिळेल. आणि काही लोक कामावर आले तर अगदी शेवटच्या माणसाला आपण सुख दिले ,गरजूला काम दिले याचा आनंद आणि पुण्य दोन्ही आपल्याला मिळतील. ही जागृत अमृत योजना आहे. दररोज तिची परीक्षा होणार आहे .सदिच्छा जाहीर करून ,योजना लागू करून कोणाला झोप काढता येणार नाही. की कोणाला प्रोकळ प्रतिष्ठा मिळवता येणार नाही. मागेल त्याला काम द्यावे लागेल.दाम द्यावा लागेल आणि संकल्प सोडलेले पुण्य घ्यावेच लागेल.


ग्रामोध्दाराच्या आजवरच्या अनेक चळवळी फसल्या हे ध्यानात घेऊन कालवश पागे यांनी त्यांच्या अपयशाची कारणे शोधली .म्हणूनच या योजनेच्या लोकशिक्षणासाठी ते आग्रही राहिले .योजनेला आंदोलनाचे स्वरूप दिले व ते आंदोलन नकारात्मक न होता विधायक रचनात्मक राहिले. त्याला लोक जीवनात प्रवेश मिळाला की बहुतेक काम झाले असते ते मानत असत.त्यांच्या मते या योजनाची गरजच इतकी मूलभूत आहे कि ती उपटायला काळाने जरी तिच्या मुळाला हात घातला तरी त्याच्या मानगुटीवर भूत बसेल.


२००५ साली केंद्र सरकारने रोजगार हमी कायदा केला. त्यामागेही पागे यांच्या या योजनेची प्रेरणा होती .मुद्दा आहे तो पागे यांना ज्या अग्रक्रमाने व तळमळीने ही योजना राबवायची होती त्या पद्धतीने ती नंतर राबवली  गेली नाही हा.रोजगार हमी योजना खऱ्या अर्थाने जागृत अमृत योजना म्हणून आपण स्वीकारली तर ती कालवश पागे यांना खरी आदरांजली ठरेल. आज आमच्या राज्यघटनेच्या सरनाम्यातील समाजवाद या शब्दाला न्याय दिल्यासारखे होईल. कालवश पागे हे गाढे समाजचिंतक होते. कवी, नाटककार होते. त्यांचे पहाटेची नौबत,आणि अमरपक्षी हे काव्यसंग्रह, तुका म्हणे जाऊ वैकुंठा चालत हे संगीत नाटक, निवडणुकीचा नारळ ही नाटिका हे साहित्य प्रकाशित आहे. अशा या थोर क्रियाशील पंडिताला विनम्र अभिवादन...!


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post