प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
मुंबई स्पा मर्डर केस मुंबईतील वरळीच्या स्पा सेंटरमध्ये झालेल्या गुरू वाघमारे या हत्या प्रकरणात आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. गुरू वाघमारेने गजनी सिनेमाप्रमाने 22 शत्रुची नावं आपल्या मांडीवर गोंदवली होती.पण त्यांच्या अत्यंत जवळच्या आणि लाडक्या गर्लफ्रेंडचाच या हत्या प्रकरणात हात असल्याची बाब समोर आली आहे. म्हणूनच पोलिसांनी गुरु वाघमारेच्या 21 वर्षीय गर्लफ्रेंडला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरळी पोलिसांनी गुरु वाघमारेची गर्लफ्रेंड मेरी जोसेफला अटक केली आहे. 23 जुलैला हत्येच्या रात्री गुरू वाघमारेची गर्लफ्रेंड त्याच्यासोबत होती. मेरी आणि गुरू हे वरळीमधील स्पा सेंटरमध्ये रात्री 1 वाजता आले होते. विशेष म्हणजे मेरीला गुरूच्या हत्येच्या कटाची माहिती असताना देखील तिने गुरुला स्पामध्ये बोलावल्याचा दावा पोलिसांना केला आहे. मेरीने गुरु वाघमारेचे लोकेशन देखील आरोपींसोबत शेअर केल्याचा देखील पोलिसांना संशय आहे.
तसेच या कटात सहभागी असलेला स्पा मॅनेजर शमशाद अन्सारी यालाही पोलिसांनी अटक केली आहे. स्पामध्ये बसवलेले सीसीटीव्ही डिस्कनेक्ट केल्याचा आरोप स्पा मालकावर आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे.
दरम्यान गुरु वाघमारेने आपल्या जीवाला धोका असल्याच्या भीतीने 22 शत्रूंची नावे आपल्या दोन्ही पायावर आणि पाठीवर गोंदवली होती. गुरु वाघमारेच्या हत्येनंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. संतोष शेरेकर, फिरोझ अन्सारी आणि शाकीब अन्सारी या आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.
दोन कथित हल्लेखोरांपैकी एकाने गुटखा खरेदी करण्यासाठी 70 रुपयांचे युपीआय पेमेंट केले होते. यावरून पोलिसांनी या तीन आरोपीचा छडा लावत त्यांना अटक केली. आता या प्रकरणात पोलिसांनी गुरु वाघमारेची गर्लफ्रेंड मेरी जोसेफलाही अटक केली.
असा रचला कट
मुंबईतील विलेपार्ले येथे राहणारा वाघमारे हा वरळी नाका येथे असलेल्या स्पामध्ये नेहमी जायचा. हत्येच्या दिवशी देखील गुरु स्पामध्ये गेलेला, त्यावेळी त्याच्या 21 वर्षीय मैत्रिणीने पार्टीची मागणी केली. यानंतर पाच जणांचा ग्रुप सायनमधील एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेला. पोलिसांनी सांगितले की, बुधवारी रात्री 12.30 च्या सुमारास ते सर्व हॉटेलमध्ये पार्टी करून स्पामध्ये परतले. काही वेळाने तिघेही तेथून निघून गेले, तर वाघमारे व त्याची मैत्रीण तिथेच थांबल्याचे पोलिसांनी सांगितले. सुमारे दोन तासांनंतर दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी स्पामध्ये येऊन वाघमारे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हत्येची माहिती पहाटे अडीच वाजता पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता वाघमारे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला.