बेळगाव निडसोसी सिद्ध संस्थान मठाचे श्री जगद्गुरु दुरदुंडेश्वर यांचे प्रतिपादन
प्रेस मीडिया लाईव्ह :
शिरोळ/ प्रतिनिधी:
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने करण्यात येत असलेल्या क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आले आहे. श्री दत्तचे जमीन क्षारपड मुक्तीचे इतके मोठे काम देशपातळीवर प्रथमच झाले आहे. क्षारपड मुक्तीचे काम पाहून आनंद आणि समाधान वाटले. माणसाला सकस अन्नाची गरज असून देशी वाण बीज बँकेच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी शासन योजने संदर्भात आपण सर्वतोपरी मदत करण्यास पुढाकार घेऊ, अशी ग्वाही बेळगाव निडसोसी सिद्ध संस्थान मठाचे श्री जगद्गुरु दुरदुंडेश्वर यांनी दिली.
श्री दत्त कारखाना कार्यस्थळ, शेडशाळ येथील देशी वाण बीज बँक आणि कवठेगुलंद येथील क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास भेटी प्रसंगी ते बोलत होते.
श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी श्री जगद्गुरु दुरदुंडेश्वर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच गणपतराव पाटील यांनी कारखान्याच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या ऊस विकास योजना, उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान, 150 टन ऊस उत्पादन घेण्याचा 'श्री दत्त पॅटर्न', सुपर केन नर्सरी, जीवामृत स्लरी, सेंद्रिय कर्ब वाढीचे प्रयत्न याबद्दल विस्तृत माहिती दिली. मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी 24 गावांमध्ये 8500 एकरावरती क्षारपडमुक्तीचे काम झाले असून साडे तीन हजार एकरामध्ये अंतर्गत सच्छिद्र निचरा प्रणालीचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले. तसेच या कामाची संपूर्ण माहिती प्रोजेक्टरद्वारे दिली.
माती परीक्षण अधिकारी ए. एस. पाटील यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील पाणी, माती व पाणी परीक्षण यांच्या अनुषंगाने कारखाना क्षेत्रातील सेंद्रिय कर्ब 0.23 वरून सुमारे एक टक्क्यावर गेल्याचे सांगून विविध प्रकारच्या उपक्रमांची माहिती दिली.
यानंतर श्री जगद्गुरु दुरदुंडेश्वर यांनी शेडशाळ येथील 150 महिलांच्या वतीने करण्यात येत असलेल्या स्व. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील देशी वाण बीज बँकेला भेट देऊन बीज बँकेचे सुरू असलेले काम याची प्रत्यक्षात पाहणी करून माहिती घेतली. महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध रोजगार पूरक योजना असून त्यासाठी महिलांनी पुढाकार घेतल्यास आपण मदत करू, असे आश्वासन त्यांना दिले. कारखाना संचालक भैय्यासाहेब पाटील व बीज बँकेच्या महिलांनी सर्वांचे स्वागत व सत्कार केला. यानंतर त्यांनी कवठेगुलंद क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास भेट देऊन संपूर्ण माहिती घेतली. कवठेगुलंद ग्राम क्षारपड जमीन सुधारणा सहकारी संस्थेच्या वतीने करण्यात आलेले मेन पाईपलाईन, अंतर्गत पाईपलाईन याचीही पाहणी त्यांनी केली. क्षारपड मुक्ती पूर्वीची परिस्थिती, प्रकल्पाचे काम झाल्यानंतरची परिस्थिती, झालेली सुधारणा, उत्पादन वाढ आदी विषयी माहिती घेऊन क्षारपड मुक्तीच्या कामाचे कौतुक केले. देशपातळीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात काम झाल्याचे समजल्यानंतर हे काम पाहण्यासाठी आपण मुद्दामहून येथे आलो असल्याचेही त्यांनी सांगून आनंद वाटला असे म्हणाले.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार, महेंद्र बागे, शरद काळे, कीर्तीवर्धन मरजे, सुदर्शन तकडे, निडसोसी मठाचे सीईओ श्रीधर पाटील, संतोष पाटील, ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले, अशोक केरीपाळे, रावसाहेब पाटील, सुधीर पाटील, मनोज केटकाळे, मोहन पाटील, जगन्नाथ कदम, उदय पाटील यांच्यासह शेतकरी, बीज बँकेच्या शमशादबी पठाण आणि इतर महिला उपस्थित होत्या.