संत कबीर जयंती निमित्ताने...

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी  (९८ ५०८ ३० २९०)

५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट

समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी

ता.हातकणंगलेे जि .कोल्हापूर

पिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)

prasad.kulkarni65@gmail.com

शनिवार ता.२२ जून २०२४ रोजी कबीर जयंती आहे.कबीर जयंतीचे औचित्य साधून कबीर आणि कबीर विचार समजून घेणे ही आपली सामाजिक व वैचारिक गरज आहे. संत कबीर यांच्या विचारांची आज समाजाला नितांत गरज आहे. आजच्या बिघडलेल्या ( बिघडवलेल्या ) परिस्थितीत माणूस व माणुसकी दोन्हीही ढासळत चालली आहेत .त्यातून सावरण्यासाठी संत विचारांकडे डोळस भूमिकेतून पाहिले पाहिजे. ‘कबीर विचार ‘हा त्यातील एक महत्त्वाचा विचार आहे.

कारण गेल्या काही वर्षात धर्मांधी ध्रुवीकरणाचे द्वेषमूलक, माणूसघाणे सत्ताकारण व राजकरण केले जात आहे.


संत कबीर हे उत्तर भारतातील सुप्रसिद्ध मध्ययुगीन संत होते .त्यांच्या जन्म आणि मृत्यू साला बाबत एकमत जरी नसले तरी अंदाजे १४५५ ते १५७५ हा तो काळ यासावा यावर अनेकांचे एकमत आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभले होते .हिंदू आणि इस्लाम धर्माच्या तथाकथित ठेकेदारांवर, त्यांच्या दोषांवर, विसंगतींवर आणि चारित्र्यहीनतेवरही कबीरांनी मुळातून हल्ला केला होता. मानवनिर्मित धर्म ,वर्णव्यवस्था ,जात-पात, कर्मकांड ग्रंथप्रामाण्य , चुकीच्या रूढी- परंपरा,अंधश्रद्धा यावर त्यांनी स्वतः विश्वास ठेवला नाही. तर 

त्यांचे सत्य स्वरूप लोकांपुढे मोठ्या ताकदीने मांडले .शुद्ध चारित्र्य, मानवता अनासक्ती, विवेकवादी जीवननिष्ठा अशी मुल्ये रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 


कबीरांची सारी रचना मौखिक स्वरूपाची होती. त्यांच्या अनुयायांनी या रचना शब्दबद्ध केल्या.’ कबीर बीजक ‘ आणि ‘कबीर ग्रंथावली ‘ यासारख्या ग्रंथातून संत कबीर कवी विचारवंत, प्रबोधक अशा विविध स्वरूपातून दिसून येतात. कवी म्हणून हिंदी साहित्य आणि अर्थातच भारतीय साहित्यात त्यांचे स्थान अतिशय महत्वाचे आहे.संत कबीर हे पंधराव्या शतकाच्या मध्यावर जन्मले आणि सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात कालवश झाले. सिकंदर लोधी या राजाच्या कारकिर्दीत कबीर कार्यरत होते .तो काळ सामाजिक ,आर्थिक ,राजकीय अशांततेचा आणि अस्थैर्याच्या काळ होता. धर्म ,जात, पंथ यांचा बुजबुजाट होता .या अस्थैर्याच्या कालखंडात कबीर समाजाला माणसाला स्थिरता देण्याचा प्रयत्न करत होते. 


इतर अनेक संतांप्रमाणेच कबीरांच्या जन्माविषयी अनेक आख्यायिका, गोष्टी सांगितल्या जातात .काशी जवळ ‘लहर तारा ‘ येथे नीरु नामक कोष्टी आणि त्याची पत्नी निमा यांना नुकतेच जन्मलेले पण कोणीतरी सोडून दिले एक लहान मूल सापडले .निरू त्याला घरी घेऊन जाण्यास लोकभयास्तव उत्सुक नव्हता. पण निमाच्या ममताळू मातृभावामूळे त्याला नकार देता आला नाही. या दाम्पत्याने त्या मुलाला आपल्या घरी आणले. त्याचे नाव ‘कबीर ‘ ठेवले. त्याचे योग्य प्रकारे संगोपन केले .ही कथा तशी सर्वमान्य आहे .काशी येथे आजही कबीर राहत असलेल्या गल्लीला ‘कबीर चौरा’ आणि निरुल राहा असलेल्या घराला निरुतल्ला ‘अशी नावे दिलेली आहेत.कबीर आतिशय कुशाग्र आणि बुद्धिमान होते. आपल्या घरच्या विणकाम व्यवसायात ते निपुण होते.


 लौकिकार्थाने कबीर शाळेच्या चार भिंतीत अथवा कोणत्या आश्रमात शिकले नव्हते .कारण त्यांनीच एके ठिकाणी म्हटले आहे की ‘ मसी कागद छुओ नही, कलम गही नही हात ,चरिओ जुगन महत्तम कबीर , मुखही जनाई बात ‘. पण डोळस आणि चौकस वृत्तीतून त्यांना समाजाचे योग्य आकलन झाले होते. अनुभवासारखा गुरु नसतो ,हे कबिरां बाबत तंतोतंत खरे आहे .समाजात चाललेला अनाचार, देवधर्माच्या नावानेच चाललेली दलाली ,कर्मकांडे याविरुद्ध त्यांनी विचार मांडायला सुरवात केली. माणुसकीची शिकवण देण्याचा प्रयत्न केला. कबीराची शिकवण धर्मांधांना मानवणारी नव्हती .गोरगरीब जनतेला अज्ञानाच्या अंधकारात ठेवूनच त्यांची धार्मिक दुकानदारी चालणार होती. म्हणून समाजाला शहाणे करू पाहणाऱ्या कबिरांना कडव्या हिंदू धर्मांधांनी आणि कट्टर मुस्लीम धर्मांधांनी हरतऱ्हेने विरोध सुरू केला .या विरोधाशी कबीरांनी सामना केला.


 शेवटी त्यांनी काशीच्या या धर्मांधांशी लढा देण्यासाठी बाहेरून नवा माणूस तयार करावा या भूमिकेतून ‘मगहर ' या गावी जाण्याचा निर्णय घेतला. मगहर हे उत्तर प्रदेशात गोरखपूर जिल्ह्यात आमी नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. या गावात कबीर कार्यरत राहिले आणि वृद्धापकाळाने तेथेच ते कालवश झाले .कबीर हे वैचरिक क्रांती घडवू पाहणारे परिवर्तनवादी संतकवी होते .संपूर्ण बाह्यचारांचा आणि जंजाळांचा विध्वंस करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांची ही परिवर्तनवादी भूमिका त्यांच्या रचनांमधून आणि जीवनसरणी तून ठायी ठायी प्रगट होते. 


डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कबीर यांना गुरू मानले ते या क्रांतिकारकत्वामुळेच. डॉ.बाबासाहेबांनी बुद्ध कबीर आणि फुले यांना आपले गुरु मानले आहे . त्यांनी एके ठिकाणी लिहिले आहे, ‘ प्रत्येकाला गुरू असतात तसे मलाही गुरू आहेत. माझे जेष्ठ गुरु बुद्ध आहेत ,दुसरे गुरु कबीर आहेत आणि तिसरे फुले आहेत. माझे वडील कबीरपंथी होते. त्यामुळे कबीरांच्या जीवनाचा व तत्वांचा माझ्यावर फार मोठा परिणाम झाला .माझ्या मताप्रमाणे कबिराला बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचे खरे रहस्य कळले होते. कबीर म्हणतात, ‘ मनुष्य अपुऱ्या विद्येमध्ये गुरफटून जात दुःखी होतो .जेव्हा त्याला ज्ञान प्राप्त होईल तेव्हा तो दुःखातून मुक्त होईल. केवळ अज्ञानामुळेच अविद्या, अहंकार ,कुल प्रतिष्ठेत गुंतून वृथा अभिमान बाळगतो.कबीरांच्या जीवनाचा आलेख एका लढवय्या क्रांतिकारकांचा असल्याचे स्पष्ट दिसते .त्यांना इथल्या व्यवस्थेविरुद्ध लढा देऊन समाजाला सुदृढ करण्याचा पुनर्निर्मितीचा ,मुल्यांच्या रक्षणाचा प्रयत्न करायचा होता. तो त्यांनी जीवनभर केला. धर्माच्या चौकटीतून बाहेर पडून, बंडखोरी करून कबीरानी जे काम केले ते अतुलनीय मानावे लागेल .त्यांच्या वैचारिक लढाईला सत्याची धार होती.


 कबीरांनी संस्कृत भाषेचा त्याग केला आणि जन भाषा स्वीकारली हीसुद्धा त्यांच्यातील क्रांतिकारत्वाची खुणच म्हणावी लागेल. कबिरांचे कार्य प्रबोधनाला आणि परिवर्तनाला बळकटी देणारे होते .कबीर सर्वसामान्यांतून आले होते .आपल्या क्रांतिकारत्वामुळे ते सर्वसामान्यांचे लोकप्रतिनिधी बनले होते. लोकप्रतिनिधीची व समाज शिक्षकाची भूमिका जोपासण्यासाठी कबीरांनी अतिशय बारीक सारीक गोष्टींचा सखोल विचार केला होता. मुळातून बदलाची जेव्हा गरज निर्माण होते तेव्हा अशा लहानसहान गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे असते.कबीरांनी वर्णव्यवस्थेला विरोध केला. देव आणि धर्म कल्पनेकडे व्यापक भूमिकेतून पाहिले. त्याआधारे येणाऱ्या कर्मकांडांना आणि अंधश्रद्धांना कडाडून विरोध केला कर्मकांडे आणि व्रतवैकल्यांच्या पलीकडे जाणार ‘सहज समाधी भली ‘हा विचार कबीरानी मांडला .कारण सर्वसामान्य माणूस दैनंदिन जीवन कंठत असतांना श्रमत होता. राबत होता. राब राब राबूनही त्याच्या परिश्रमाला योग्य किंमत मिळत नव्हती . ‘सिद्ध समाधी योग ‘साधण्यासाठी त्याला मंदिरात, मशिदीत वा इतरत्र जायला वेळ नव्हता. सामान्य माणूस सहज जीवन जगतानाही त्याला जीवनाचा अर्थ कळावा यासाठी कबीरांनी तत्कालीन परिस्थितीला योग्य असा ‘ सहज समाधी भली ‘ हा विचार मांडला.


सहज समाधी योगामुळे सत्य-असत्याची माहिती त्वरित कळते. समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता .ही चित्ताची एकाग्रता मंदिरात, मशिदीत नाही तर आपण करतो त्या कामात साधायची आहे. सांसारिक जीवन जगताना अनुभवायची आहे .मनाला स्थायी स्वरूपाचे वळण लावण्याचे सामर्थ्य या समाधीत आहे असे कबीर मानतात. म्हणूनच मनाच्या सतत जागृतीचे महत्व कबीर साहित्यात सातत्याने अधोरेखित झालेले दिसतात.प्रेम ,करूणाआणि मैत्रीचेही अतिशय सुरेख विवेचन कबीर करतात . जीवनात प्रेम अतिशय महत्त्वाचे आहे .प्रेम जमिनीतून अंकुरत नाही .अथवा बाजारात विकत मिळत नाही .एकमेकांच्या भेटीतच मनांची गुंफण होऊन प्रेम निर्माण होते .या प्रेमाचेच गाढ मैत्रीत रूपांतर होते. प्रेमामुळेच मनात धैर्य निर्माण होते आणि म्हणूनच धैर्य हे प्रेमाचे प्रतीक आहे असे कबीर म्हणतात. कबीर विवेक, विचार ,बुद्धी ,ज्ञान, शिक्षण,मानवता या साऱ्याचा अतिशय गांभीर्याने विचार आपल्या साहित्यातून करताना दिसतात.


कबीरानी कर्म विचार आणि नीती विचारांची आग्रही मांडणी केली .सक्रियता आणि सत्यक्रिया यांचेही महत्त्व त्यांनी सांगितले .आपली व्यक्तिगत परिपूर्ती झाली तरी स्वस्थ बसण्यात अर्थ नाही .आपल्या इच्छापूर्ती नंतरही आपण इतर लोकांसाठी झटावे असा संदेश कबीर देतात. सतर्क व सकर्म राहूनच जीवनाचा आनंद उपभोगायचा .आणि आलेल्या संकटांची सामना करायचा ही शिकवण कबीरांनी दिली. जीवनाच्या बहुतेक क्षेत्रांमध्ये उपयुक्त ठरतील आणि व्यक्ती व समष्टीला बळकटी आणतील असे विचार कबीरांनी मांडले.


 त्यांच्या एकूण जीवन कार्याचा आणि साहित्याचा आढावा घेतला तर त्यांचे क्रांतिकारत्व आजच्या काळात यात अतिशय महत्त्वाचे आहे.हिंदू आणि मुस्लिम सनातन्यांनी जिवंतपणी कबीरांना कमालीचा विरोध केला .पण कबीरांना या दोन्ही समाजातील सर्वसामान्य माणूस आपले मानत होता .खरेतर धर्म, कर्मकांडे वगैरे बाबी त्याज्य मानणाऱ्या कबीरांना हिंदू ‘हिंदु’ मानत आणि मुसलमान ‘मुस्लीम ‘ मानत.त्यामुळेच कबीरांच्या मृत्यूनंतर त्यांचे ‘दहन ‘करायचे की ‘दफन ‘याबाबत मोठा वाद झाला.काशीचा राजा वीरसिंह बधेल यांनी काशीमध्ये कबीरांचा हिंदु रूढी रिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केला. गोरखपूर चा नवाब अलीखान पठाण याने मगहर येथे त्यांचे सुंदर स्मारक ( थडगे )बांधले …मगहर येथिल हिंदूंनी त्यांची समाधी बांधली .तर मुसलमानानी कबर बांधली. आज दोन्ही धर्मीयांची ती पवित्र स्थळे आहेत. तीर्थक्षेत्रे आहेत .संत कबीर हे असे प्रभावी, लोकमान्य व लोकोत्तर व्यक्तिमत्व होते.त्यांचे विचार आजच्या अस्वस्थ भवतालात अतिशय महत्वाचे आहेत.



(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post