प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे महानगरपालिकेच्या आयटी विभागातील तांत्रिक सहायक अभियंत्यांचीच लूट होत असल्याचे प्रकरण समोर आले आहे ही लूट करणारे दुसरे-तिसरे कोणी करत नसून कंत्राटदाराकडूनच अभियंत्यांच्या पगारावर डल्ला मारला जात आहे. विशेष म्हणजे या लुटीची तक्रार महानगरपालिकाचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले तसेच अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांच्याकडे ई-मेलवर तक्रार करूनही अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप अभियंत्यांनी केला आहे . एखाद्या खासगी कंपनीकडून नोकरी मिळाल्यानंतर पहिल्या महिन्याचा पगार कापून घेतला जातो. नियमाप्रमाणे त्या कंपनीला मोबदला मिळावा, असे गृहित धरून कर्मचारी त्यासाठी तयार सुद्धा होतात. आता महानगरपालिकेच्या कंत्राटदार कंपनीचा गोलमाल समोर आला आहे.
गेल्या चार वर्षांपासून यातील काही अभियंते नोकरी करत आहेत. त्यांना पगारवाढ दिली नाही. परंतु त्यांच्याच पगाराचा निम्मा हिस्सा कंपनीकडून वसूल केला जात आहे. त्यामुळे हे अभियंते हवालदिल झाले आहेत. कंपनीकडून होणारे शोषण थांबायला हवे, असे अभियंत्यांचे म्हणणे आहे. परंतु समोर येऊन कोणी बोलायला तयार नाही. कोणाचे नाव समजले तर नोकरी गमविण्याची वेळ येईल. त्यामुळे या अभियंत्यांच्या वतीने एका सामाजिक कार्यकर्त्याने महापालिका आयुक्तांकडे निनावी ई-मेलवरून तक्रार केली आहे.
ई-मेलमध्ये अभियंते म्हणतात...
पोलेस्टार कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी गेली ४ वर्षे पालिकेमध्ये एफएमएस आयटी सपोर्टचे कामकाज पाहते. या कंपनीमधे तांत्रिक साहाय्यक अभियंता या पदावर कार्यरत असणाऱ्या अभियंत्यांना पाहिजे असा मोबदला मिळत नाही. पुणे महापालिका २१ हजारहून अधिक वेतन देते. ही कंपनी अभियंत्यांचा पूर्ण पगार त्यांच्या खात्यावर जमा करते. परंतु त्यातील निम्मा पगार रोखीने वसूल करून घेते. रोख पैसे वसूल करण्यासाठी महापालिकेच्या एका कार्यालयाचा वापर केला जातो. ही गोष्ट अत्यंत चुकीची असून कामगारांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळायला हवा. तसेच ही महापालिकेचीही फसवणूक आहे. निविदेमध्ये नमूद केल्याप्रमाणे अभियंत्यांना पगार मिळत नाही. अभियंत्यांचे वेतन घेऊन एक प्रकारचा उघड भ्रष्टाचारच केला जात आहे. याची पूर्ण जाणीव महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आहे. मात्र कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे आयुक्तांनी यामध्ये लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीदेखील या ई-मेलद्वारे अभियंत्यांनी केली आहे
अभियंत्यांना पूर्ण पगार मिळणे कायद्याने आणि नियमाने बंधनकारक आहे. पण इथे कायदा व नियम दोन्ही धाब्यावर बसवले दिसत आहे , गेल्या चार वर्षांपासून हीच कंपनी महानगरपालिकेकडून कंत्राट घेत आहे. महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब माहिती आहे पण तरीही यावर कोणीही काही बोलत नाहीत सर्वजण मूग गळून गप बसलेले दिसत आहेत
याबाबत तांत्रिक साहाय्यक अभियंत्यांच्या वतीने निनावी नावाने तक्रार प्राप्त झाली आहे. या तक्रारीचा विचार करण्यात आला असून त्याप्रमाणे कंत्राटी कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कंपनीचे उत्तर आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.
- राहुल जगताप, आयटी विभागप्रमुख, पुणे महापालिका