अग्निशामक दल वेळेत पोचल्याने मोठी दुर्घटना टळली.
प्रेस मीडिया लाईव्ह :
फकीरमोहम्मद बागवान
पुणे : सदाशिव पेठे येथील एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यालय व वसतिगृहाला लागलेल्या भीषण आगीत वसतिगृह व्यवस्थापकाचा होरपळून मृत्यु झाला. अग्निशामक दल वेळेत पोचल्याने मोठी दुर्घटना टळली.सदरची घटना गुरूवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.
सदाशिव पेठेतील वाणिज्य विषयक अभ्यासक्रमाचे शिक्षण देणारी संस्था आहे. या संस्थेची तीन मजली इमारत आहे. तेथेच विद्यार्थीनींना राहण्यासाठी वसतिगृहाची सुविधा देण्यात आली आहे. दरम्यान, गुरूवारी मध्यरात्री दीड वाजता संबंधित संस्थेला आग लागली. काही वेळातच आगीच्या झळा वसतिगृहाच्या खोल्यांपर्यंत पोचल्या. आगीच्या झळा व धुरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, या घटनेची माहिती अग्निशामक दलास मिळताच, दलाचे तीन बंब, टँकर, रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी पोचले. तर वसतिगृहामध्ये विद्यार्थीनी अडकल्याची माहिती अग्निशामक दलास मिळाली.
जवानांनी आगीच्या ठिकाणी पाण्याचा मारा सुरू करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. त्याचवेळी ४० विद्यार्थीनींची सुखरूप सुटका केली. आग नियंत्रणात आल्यानंतर शोध घेताना संस्थेच्या कार्यालयातच झोपलेले व्यवस्थापक राहूल कुलकर्णी यांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याचे जवानांना आढळून आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्ण्लयात पाठविला. अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख संजय रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी ही आग आटोक्यात आणली. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम, विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपाली भुजबळ यावेळी उपस्थित.
आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप समजू शकले नाही. मात्र त्याबाबतचा अहवाल महावितरणकडून (एमएसईबी) मागविला आहे. अहवाल आल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया केली जाईल. - दीपाली भुजबळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विश्रामबाग पोलिस ठाणे.