'आझम कॅम्पस ' चा पुढाकार ......
विद्यार्थ्यांना गुलाब पुष्पे ,अत्तरचे वाटप
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : दूरदेशातून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या विविध महाविद्यालयातील परदेशी विद्यार्थ्यांनी आज (रवीवारी ) सकाळी एकत्रितपणे बकरी ईद साजरी केली! डॉ पी ए इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली आझम कॅम्पस परिवाराने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना गुलाबपुष्पे ,अत्तर देऊन ईद साजरी केली .
आखाती आणि अरबी देशात चंद्रदर्शन झाल्यानंतर दहाव्या दिवशी तेथील रीतीप्रमाणे ईद साजरी करतात. पुण्यातही परदेशी विद्यार्थी त्यानुसार ईद साजरी करतात.
आझम कॅम्पस मध्ये या विद्यार्थ्यांना खास निमंत्रित करण्यात आले . आझम कॅम्पस (पुणे कॅम्प ) मधील मशिदीत या पुणेस्थित परदेशी विद्यार्थ्यांनी एकत्रित नमाजपठण केले . एकमेकांची प्रेमभरी गळाभेट घेतली ईदच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली आणि एकमेकांची वास्तपुस्त केली .
पुण्यात एकत्रित ईद साजरी करायला मिळाल्याची आनंदवार्ता आपल्या कुटुंबियांना परदेशात सोशल मीडियावरून लगेच कळवली !
आझम कॅम्पस परिवाराच्या वतीने या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्पे ,अत्तर देण्यात आली . महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तसेच डॉ पी ए इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. पी. ए. इनामदार,आझम कॅम्पस चे विश्वस्त ,पदाधिकारी, अवामी महाज संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते .
' ईद हा महत्वाचा दिवस असल्याने त्यात पुण्यात राहणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनाही आम्ही सामावून घेतले . घरापासून दूर असल्याची भावना प्रत्येक परदेशी विद्यार्थ्यांच्या मनात असते . एकत्रित ईद साजरी केल्याने त्यांच्या आनंदात भर पडते . पुण्याची सर्वसमावेशक आणि प्रेमळ संस्कृती दूरदेशापर्यंत जाऊन पोहोचते ,हाच या उपक्रमामागचा उद्देश आहे ',असे डॉ पी ए इनामदार यांनी यावेळी सांगितले .