प्रेस मीडिया लाईव्ह :
पुण्याच्या राजकारणातून एक मोठी अपडेट समोर येत आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेल्या रुपाली ठोंबरें बाबत केलेल्या भाष्यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये रुपाली ठोंबरे यांचा फोटो देखील आहे.
यासह सुषमाअंधारे यांनी म्हटलं आहे की “निष्कलंक चारित्र्य, उत्तम जनसंपर्क, निडरता, रोखठोक, नेत्यांच्या मागे पुढे करून नाही तर लोकांमध्ये मिसळून काम करणाऱ्या लढाऊ कार्यकर्त्या… तरीही अजून किती दिवस उपेक्षित राहणार..? रुपालीताई, अजून किती मुस्कटदाबी सहन करणार..? निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ…”
दरम्यान, सुषमा अंधारे यांच्या या पोस्टनंतर त्यांनी अप्रत्यक्षपणे रुपाली ठोंबरे यांना अजित पवार गट सोडून ठाकरे गटात येण्याची साद घातल्याची चर्चा रंगू लागली आहे.आगामी काळात विधानसभा निवडणूका होऊ घातल्या आहेत. या बाबत रुपाली ठोंबरे काय निर्णय घेणार हे पाहणे फारच महत्वाचे ठरणार आहे.