प्रेस मीडिया लाईव्ह :
पुण्यात दारुसाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा खून करण्यात आला. पुण्यातील परिहार चौकासारख्या उच्चभ्रू परिसरात ही घटना घडली. समीर रॉय चौधरी असे त्यांचे नाव आहे. आता या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आले असून त्यातील तीन अल्पवयीन आरोपी आहेत.
समीर रॉय चौधरी सकाळी घरुन मॉर्निंग वॉकसाठी निघाले. ते टाटा कंपनीतून सेवावृत्त झाल्यावर पुण्यातील औंध भागात स्थायिक झाले होते. गुरुवारी, १३ जून रोजी पहाटे ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले. परिहार चौकालगत असलेल्या फुटपाथवरून ते निघाले. त्यावेळी रात्रभर दारु पार्टी केलेले चार जणांचे टोळके बाहेर पडले होते. या टोळक्याला आणखी दारू हवी होती. त्यासाठी या टोळक्याने मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या व्यक्तींवर हल्ले सुरु केले.
दोन व्यक्तींवर हल्ला केल्यावर या टोळक्याने समीर रॉय चौधरी यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यांनी ते दिले नाही. त्यामुळे त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. यामध्ये समीर रॉय चौधरी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरु असताना शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. त्यात जय सुनील घेंगट (वय १९, रा. कस्तुरबा गांधी वसाहत, औंध) याचा समावेश आहे. इतर तीन आरोपी हे अल्पवयीन आहेत.