देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याचा निर्णय मंजूर?



प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी सुनील पाटील 

 महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली यासाठी मागील दोन दिवसांपासून फडणवीस हे दिल्लीत ठाण मांडून होते. अखेरीस आज अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी शाह यांनी राजीनामा न देण्याचा सल्ला फडणवीसांना दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

आज नवी दिल्ली एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांच्या भेटीसाठी पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली. मिळालेल्या माहितीनुसार, तुर्तास फडणवीस यांच राजीनामा लांबणीवरच राहणार आहे. फडणवीस यांना आपलं काम सुरूच ठेवण्याचे निर्देश शाहांनी दिले आहे.

तुमचे काम सुरु ठेवा, शपथविधीनंतर सविस्तर बैठक घेऊ आणि बोलूया, तोपर्यंत तुम्ही काम करत राहा, असा सल्ला अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला. देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री आणि आज दुपारी अशा दोन वेळा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. गुरुवारी अपूर्ण चर्चा आजच्या दुसर्‍या भेटीत पूर्ण झाली.

फडणवीस यांचे संपूर्ण म्हणणं ऐकून घेतल्यानंतर अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की, सध्या तुम्ही तुमचे काम सुरु ठेवा. नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर आपण महाराष्ट्राबाबत सविस्तर चर्चा करुन निर्णय करु. महाराष्ट्रात काय करेक्टिव्ह उपाययोजना केल्या पाहिजेत, याचा आराखडा तयार करु. पण, तोवर तुम्ही आपले काम सुरु ठेवा, असं अमित शाह यांनी फडणवीस यांना स्पष्टपणे सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मला मोकळे करा, अशी विनंती केल्यानंतर आजच्या अमित शाहांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले होते. पण, आजच्या बैठकीनंतर फडणवीसांच्या विनंतीवरील निर्णय तुर्तास लांबणीवर पडला असल्याचं दिसतं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post