भाजपा युवा मोर्चा, विद्यार्थी विभागाची मागणी
प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी, पुणे (दि. ७ जून २०२४) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा अंतर्गत शालेय अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रासह, महाराष्ट्रातील विविध संतांच्या साहित्याचा समावेश करावा अशी मागणी भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर, विद्यार्थी विभाग, जिल्हा संयोजक अनिकेत ज्ञानेश्वर शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अनिकेत शेलार यांनी तसे पत्र बालभारतीच्या संचालक आणि पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त यांना दिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा दैदीप्यमान इतिहास सर्वांना प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे. महाराष्ट्र ही अनेक थोर संत, समाज सुधारक आणि महात्म्यांची भूमी आहे. यामध्ये प्रामुख्याने संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, शाहू महाराज,
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महान व्यक्तींचे
देशाच्या स्वातंत्र्यात आणि विकासात अतुलनीय योगदान आहे. देशाच्या स्वातंत्र्यात हजारो स्वातंत्र्यसेनानींनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. याविषयींचा शालेय अभ्यासक्रमात समावेश अत्यल्प आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमात एसएससी बोर्ड, सीबीएससी बोर्ड, आयसीएससी बोर्ड च्या अंतर्गत भाषा व इतिहास विषयात विद्यार्थ्यांची काठीण्य पातळी विचारात घेऊन समावेश करावा. तसेच उच्च माध्यमिकच्या अभ्यासक्रमात सैन्य भरती आणि एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग क्षेत्रात भरतीच्या स्पर्धा परीक्षां विषयांची माहितींचा समावेशही केला जावा अशीही मागणी या पत्रात अनिकेत शेलार यांनी केली आहे.