जागतिक पर्यावरण दिनानिमित्त

       🌳🌳🌳🌳🌳🌳🌳


प्रेस मीडिया लाईव्ह :

डॉ. तुषार निकाळजे

आज जागतिक पर्यावरण दिन आहे. जागतिक पातळीवर होणारा पर्यावरणाचा ऱ्हास ही गंभीर समस्या झाली  आहे. याकरिता जगातील  व्यक्ती, संस्था आपापल्या परीने पर्यावरण सुरक्षेबाबत प्रयत्न करीत आहेत. पुण्यातील श्री. दुसाने हे स्वतः व आपल्या कुटुंबासोबत या पर्यावरणाची सुरक्षा करण्याचा वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करीत आहे. त्यांचा "होळी लहान करा,पोळी दान करा"  हा उपक्रम कौतुकास्पद आहे. 

भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होळी हा सण साजरा केला जातो.हा सण आनंदाचा, उत्साहाचा, चैतन्य देणारा आहे. मनामनात रंगांची उधळण करणारा हा सण आहे. या दिवशी घरोघरी होळी पेटवून तिला  पुरण पोळीचा नैवेद्य दिला जातो. ही पोळी होळी मध्ये टाकली जाते व ती जळून जाते. या पोळी बरोबर शेतकऱ्यांची मेहनत,ती बनविणाऱ्या महिलेची मेहनत व त्यातील आरोग्यासाठी हितकारी असणारे जीवनसत्वे जळून जातात. संपूर्ण देशामध्ये करोडो पोळ्या काही मिनिटात जळून जातात.  तर दुसऱ्या बाजुला असंख्य गरीब लोकांना या दिवशी उपासी राहावे लागत आहे. या होळीला आपणही पोळी न जाळता, आपल्या आसपास जे *गरीब, वंचित, शोषित जी माणसे आहेत त्यांना दान देऊ . ही पोळी त्यांच्या मुखात गेली तर त्यांचीही होळी गोड होईल व सर्वांची मेहनत कामाला येईल.  हीच खऱ्या अर्थाने होळी असेल, असे श्री दुसाने म्हणतात . तसेच आपल्या घरातील होळी जमेल तेवढी छोटी करूं. कारणं होळीसाठी लाकडे लागतात.. यांसाठी झाडे तोडावी लागतात, तसेच यातून निघणाऱ्या धुरामुळे हवेतील प्रदूषण वाढते.  यांसाठी सर्वांना आवाहन आहे की   होळी सर्वांनी छोटी करावी व पुरण पोळी गरिबांसाठी दान करावी.

परवा दिवशी मी माझ्या स्कूटरवरून चाललो होतो. रस्त्यावर नेहमीप्रमाणेच वाहनांची वरदळ होती. हॉर्नचे आवाज ऐकू येत होते. एके ठिकाणी समोर सायकल चलावीत जाणाऱ्या व्यक्तीकडे लक्ष गेले. माझी नजर त्याच्या सायकलला लावलेल्या 0% प्रदूषण या अक्षरांकडे गेली. त्या सायकल स्वाराला ओव्हरटेक करून मी थोडा पुढे गेलो. त्यांना ओव्हरटेक केल्यानंतर रस्त्याच्या कडेला पुढे जाऊन थांबलो . त्यांना हात करून थांबण्याची विनंती केली. त्यांना सायकल बाजूला घेऊन थांबण्यास विनंती केली. ते देखील बाजूला स्मितहास्य करून थांबले. मी त्यांना नमस्कार केला व दोन मिनिटे बोलावयाचे आहे असे सांगितले. त्यांनी देखील होकार दिला. मी त्यांना त्यांच्या सायकलच्या सीट खाली झिरो पोलूशन बोर्डबद्दल विचारले. त्यांनी त्याबद्दल पुढील गोष्टी सांगितल्या. मी पर्यावरणाचा पुरस्करता आहे. मी ऑफिसला जाताना व येताना सायकल चालवतो. माझे ऑफिस ते घर व घर ते ऑफिस हे २२ ते २५ किलोमीटर अंतराचे आहे. मी रोज सायकल वापरतो. त्यांना मी त्यांचे नाव विचारले. त्यांचे नाव श्री. भानुदास दुसाने आहे. ते घरामध्ये, ऑफिसमध्ये व इतरत्र प्लास्टिक, थर्माकोल , कॅरीबॅग वापरण्याचे टाळतात. श्री. भानुदास दुसाने हे नातेवाईकांच्या किंवा मित्र मंडळींच्या वाढदिवस, लग्न किंवा इतर समारंभाला गेल्यास स्वतःच्या बॅगमध्ये स्वतःचे स्टीलचे ताट घेऊन जातात. तेथे असलेले कागदाचे किंवा पेपर डिशेस किंवा प्लास्टिक डिशेस वापरत नाहीत. स्वतः त्या ताटामध्ये जेवतात. यामध्ये त्यांना कोणताही कमीपणा वाटत नाही. श्री. भानुदास दुसाने यांच्या आईचे काही वर्षापूर्वी निधन झाले, त्यांच्या आईच्या अस्ती त्यांनी नदीमध्ये विसर्जित केल्या नाही. त्यांनी गावातील एका टेकडीवर खोलवर खड्डा खोदून त्यामध्ये त्या अस्ती विसर्जित केल्या व त्या परिसरामध्ये ११ झाडे लावली.नदीचे प्रदूषण रोखण्याचा हा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद म्हणावा. त्यांची मुले देखील दिवाळीच्या वेळी फटाके वाजवण्याचे टाळतात. श्री. दुसाने म्हणाले, "मला जमेल तेवढा पर्यावरणाचा समतोल राखण्याचा मी प्रयत्न करीत आहे व भविष्यातही करणार आहे".अशा व्यक्तींची व त्यांच्या कार्याची नोंद प्रत्येकाने घ्यावी.

गेल्या वर्षभरापासून भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये, शहरांमध्ये, ग्रामीण भागांमध्ये G- 20 च्या नावाखाली विद्युत रोषणाईचा झगमगाट चालू आहे. भारतास इतर २० देशांमध्ये प्रतिनिधित्व मिळाले ही कौतुकाची गोष्ट. आनंद साजरा करावा याबाबत दुमत नाही परंतु काही शिष्टाचार लक्षात ठेवणे गरजेचे आहे. दुसऱ्या बाजूला जागतिक स्तरावर चालू असलेल्या झिरो कार्बन एमिशन या संकल्पनेचा विसर पडला असावा. दिवसेंदिवस जागतिक स्तरावर वाढत चाललेली लोकसंख्या व त्यामुळे निसर्गावर व पर्यावरणावर होत असलेला दुष्परिणाम याचे गांभीर्य लक्षात घेऊन जगातील सर्व देशांनी कंबर कसली आहे आणि आपआपल्या परीने पृथ्वीवर भविष्यात येणारी संकटे, जीवित हानी, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु जी 20 च्या धामधूमीत याचा विसर पडला असावा. रस्त्यांवर, शासकीय इमारतींवर रोषणाईचा झगमगाट गेल्या आठ ते दहा महिन्यापासून चालू आहे. यामुळे किती कार्बनडाय ऑक्साईड तयार झाला असेल आणि त्याचा पर्यावरणावर दुष्परिणाम झाला असेल? याचा शोध घेणे आवश्यक आहे आणि अशा गोष्टी भविष्यात घडू नये याची दखल घेणे आवश्यक आहे. किमान पुढच्या पिढीचं भविष्य उज्वल होईल. या गंभीर प्रकरणाचा जगातील बऱ्याच पर्यावरण प्रेमी, तज्ञ, अभ्यासक यांनी ध्यास घेतला आहे. परंतु काही पर्यावरण शास्त्रातील तज्ञ मंडळींनी कोणतीतरी खुर्ची किंवा पद मिळाल्यामुळे झिरो कार्बन एमिशन या विषयाकडे दुर्लक्ष केले आहे. काही व्यक्तींनी व संस्थांनी झाडे लावणे, रोपे वाटप करणे असा फार्स करून पुरस्कारही मिळविले, परंतु आता झिरो कार्बन एमिशनचा यांना विसर पडला आहे त्यांनी देखील यामध्ये सहभाग घेणे अपेक्षित आहे. ऑस्ट्रेलिया अमेरिका यासारख्या देशांनी झिरो कार्बनचे उद्दिष्ट वर्ष २०३० पर्यंत ठेवले आहे तर आपल्या भारताने हे उद्दिष्ट वर्ष २०७० पर्यंत ठेवले आहे वरील सर्व घटनांचा मागोवा घेतल्यास त्यावर स्वयंस्फूर्तीने मर्यादा (बंधने नव्हे) आणल्यास हे उद्दिष्ट किमान २०६० पर्यंत तरी शक्य होईल.

या सर्वांपेक्षा वेगळी आणि विरोधाभास घडविणाऱ्या घटना देखील घडत असतात. एका नामांकित विद्यापीठामध्ये झाडांची रोपे लावण्याचा जागतिक विक्रम झाला, या कार्यक्रमाला मंत्री व प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रण देण्यात आले होते व ते उपस्थित होते व या उपक्रमाची नोंद जागतिक स्तरावर घेतली गेली. वर्ल्ड रँकिंग करिता व NAAC मूल्यांकनाकरिता या विद्यापीठाने याचा फायदा देखील घेतला. याचा फायदा घेणाऱ्या स्वार्थिनी पदोन्नत्या व काही खुर्च्या मिळविल्या. अशा प्रकारांमुळे खऱ्या अर्थाने कष्ट करणारे संशोधक संशोधन संस्था व शासकीय संस्था व्यक्ती समूह वंचित राहिले आहेत हे सर्वजण इमाने इतबारे आपले काम करीत आहे. विद्यापीठांमध्ये या जागतिक विक्रमाच्या वेळी रोपे लावण्यात आली , सध्या त्या ठिकाणी कोणतीही रोपे अथवा झाडे अस्तित्वात नाहीत. परंतु त्या जागी खड्डे खोदून मोठमोठ्या केबल्स टाकण्यात आल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post